चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ ऑगस्ट २०२१

Date : 28 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लसीकरणाचा विक्रम : देशात एकाच दिवशी कोटींच्यावर लसीकरण :
  • करोना महामारी सोबत लढण्यासाठी देशाला मोठे यश मिळाल्याचे समजत आहे. करोना लसीकरणामध्ये भारताने शुक्रवारी नवा विक्रम केला आहे. देशात शुक्रवारी एक कोटी पेक्षा जास्त लसीकरणाचा मोठा उच्चांक आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे .

  • शुक्रवारी उत्तर प्रदेश या ठिकाणी 28.62 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. कर्नाटकमध्ये देखील 10 लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याचे समजत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात सुद्धा 9 लाखाहून अधिक लसीकरण झाले.  अजून पर्यंत कोणत्याही देशाला लसीकरणाचा इतका मोठा आकडा गाठता आला नाही. या वर्षअखेरीस डिसेंबर पर्यंत 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी भारताची वाटचाल सुरु आहे. भारताने एक कोटी पेक्षा अधिक डोस वितरित करण्याचा मोठा यशस्वी टप्पा पार केला आहे.

  • लसीकरण मोहीम सुरळीत पार पाडण्यासाठी तयार केलेल्या कोविन अॅपच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी रात्री 10 वाजता भारताने करोना लसीचे एक कोटी 64 हजार डोस नागरिकांना दिले . करोनाचे डोस हे 63,342 लसीकरण केद्रांवर देण्यात आले. या आधी भारतात 16 ऑगस्ट रोजी 92.39 लाख करोना लसीकरण यशस्वी झाले होते. कोविन अॅप च्या आकडेवारी नुसार शुक्रवारी उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्वांत जास्त लसीकरण झाले आहे .

दिल्लीतील शाळा १ सप्टेंबरपासून  :
  • दिल्लीत १ सप्टेंबरपासून पुन्हा शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या, आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष भरू लागतील. मात्र, या वर्गांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. पहिल्या टप्प्यातील शाळा सुरू झाल्यानंतर सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांबाबत विचार केला जाणार आहे.

  • दिल्लीतील शाळा सुरू करण्याआधी लोकांचा कल जाणून घेण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या सर्व्हेक्षणात ७० टक्के पालकांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्याबाबत अनुकूलता व्यक्त केली होती. शुक्रवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. आत्ता शाळांमध्ये प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिकवले जाणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.  दिल्लीतील करोनाचा संसर्गदर ०.१ टक्के आहे.

  • शिवाय, ९८ टक्के शालेय शिक्षकांनी किमान एक लसमात्रा घेतली असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही विद्याथ्र्याला शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. नववी ते बारावीचे खासगी शिकवणी वर्ग, अन्य शैक्षणिक संस्थाही सुरू केल्या जातील. दिल्ली विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयेही नियमितपणे सुरू होतील.

‘मेड इन इंडिया’ ग्रेनेड भारतीय लष्कराला सुपूर्द :
  • भारतातील एका खासगी कंपनीने प्रथमच ग्रेनेड तयार केले असून त्याची पहिली बॅच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे. हे मल्टी-मोड हँड ग्रेनेड (MMHG) नागपूरमधील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने डीआरडीओच्या मदतीने तयार केले आहेत. भारतीय लष्करासाठी भारतात दारुगोळा तयार होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मालकीची असलेल्या कंपनीने मागील महिन्यापासून सशस्त्र दलांना शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे.

  • कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख MMHG च्या पहिल्या खेपीची गुणवत्ता तपासणी यशस्वी झाली असून ती लष्कराचा सोपवण्यात आली आहे.

  • यानिमित्त मंगळवारी ईईएलच्या दोन हजार एकर संरक्षण उत्पादन केंद्रावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एमएमएचजीचे ग्रेनेड ईईएलचे अध्यक्ष एस एन नुवाल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केले. या कार्यक्रमात भारतीय लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, लेफ्टनंट जनरल एके सामंत्र, डीजी इन्फंट्री आणि डॉ. जी सतीश रेड्डी, डीआरडीओचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, पण :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अर्थात एमपीएससीचं (MPSC) अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्यात आलं आहे. शुक्रवारी (२७ ऑगस्ट) संध्याकाळी याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, अशी देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी सुरु केलेल्या या हँडलने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे, एमपीएससीचं हे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच टीकेचं धनी झालेलं पाहायला मिळत आहे.

  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी एमपीएससीकडून हा रिप्लायचा ऑप्शन बंद करण्यात आल्याची टीका होताना पाहायला मिळत आहे. “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तुम्ही घाबरताय का?”, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. करोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या परीक्षा आणि नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोठा रोष पाहायला मिळत होता.

  • ४ सप्टेंबरला होणार MPSC ची संयुक्त परीक्षा - येत्या ४ सप्टेंबर रोजी एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठीची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० ही परीक्षा खरंतर ११ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससीकडून ९ एप्रिल रोजी परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, आता ही परीक्षा ४ सप्टेंबर होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. परिपत्रक काढून याबाबत विद्यार्थ्यांना सूचित देखील केलं गेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या पर्वांगीमुळे या परीक्षेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मँचेस्टर युनायटेडमध्ये रोनाल्डोचे पुनरागमन :
  • ख्रिस्तियानो रानोल्डोचे मँचेस्टर युनायटेडमधील पुनरागमन शुक्रवारी निश्चित झाले आहे. रोनाल्डोने युव्हेंटस क्लबमधून स्थलांतरण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या वृत्ताला संबंधित क्लबकडून दुजोरा देण्यात आला आहे.

  • पोर्तुगालचा आक्रमक रोनाल्डाने २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टरला आठ महत्त्वाची जेतेपदे जिंकून दिली होती. याबाबत कराराचा आकडा स्पष्ट होऊ शकलेल नसला, तरी ब्रिटन आणि इटलीच्या प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोने दोन वर्षांसाठी दोन कोटी, ५० लाख युरोचा करार केल्याचे म्हटले आहे. २०१८मध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिदमधून युव्हेंटस क्लबमध्ये स्थलांतराचा करार केला होता. माद्रिदचे नऊ वर्षे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने ४३८ सामन्यांत ४५० गोल केले होते. याशिवाय चॅम्पियन्स लीग जेतेपदासह चार महत्त्वाची जेतेपदे पटकावली होती.

  • रोनाल्डो युव्हेंटस क्लब सोडण्याच्या तयारीत असल्याचे युव्हेंटसचे प्रशिक्षक मॅसिमिलिआनो अलेग्री यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. रोनाल्डोचा समन्वयक जॉर्ज मेंडीसनेही या वृत्ताला दुजोरा दिला होता.

सेतुरामनला विजेतेपद :
  • भारतीय ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामनने बार्सिलोना खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सेतुरामन (एलो २६४४) आणि रशियाच्या डॅनिल युफाने नऊ फेऱ्यांमध्ये प्रत्येकी ७.५ गुण मिळवले. परंतु सरस टाय-ब्रेक गुणांच्या बळावर सेतुरामनने बाजी मारली.

  • सेतुरामनने अखेरच्या तिन्ही फेऱ्यांमधील सामने जिंकले. गुरुवारी नवव्या आणि अखेरच्या फेरीत सेतुरामनने कॅटालन क्लोज्ड व्हॅरिएश पद्धतीने डावाला सुरुवात करून हॅकोबायनला नमवले, तर आठव्या फेरीत भारताच्या एन. आर. विशाखला हरवले होते.  कार्तिकेयन मुरलीला तिसरे स्थान मिळाले.पाचव्या फेरीत सेतुरामन आणि मुरली (एलो २६०६) यांच्यात बरोबरी झाली होती.

२८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.