चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ एप्रिल २०२०

Date : 28 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनाविरोधातील लढय़ाबरोबरच अर्थव्यवस्थेवरही लक्ष - पंतप्रधान :
  • टाळेबंदीमुळे देशभर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश आले असले, तरी या विषाणूविरोधातील लढय़ाबरोबरच अर्थव्यवस्थेलाही महत्त्व द्यावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोमवारी झालेल्या चित्रवाणीसंवादामध्ये स्पष्ट केले. या संवादाला उपस्थित बहुतेक मुख्यमंत्र्यांनी मात्र ३ मेनंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची विनंती केली.

  • अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मेनंतरही शाळा-महाविद्यालये, मॉल, धार्मिक सोहळे यांच्यावर र्निबध कायम राहण्याची चिन्हे आहेत. तीव्र संक्रमित (लाल श्रेणी) आणि बिगरतीव्र संक्रमित (भगवी श्रेणी) या दोन्ही विभागांमध्ये टाळेबंदी कायम ठेवली जाईल.

  • करोनामुक्त जिल्ह्य़ांमध्ये (हिरवी श्रेणी) मात्र टाळेबंदी उठवली जाऊ शकते. ३ मे रोजी टाळेबंदीचा दुसरा टप्पा संपत असून त्यानंतर केंद्राकडून अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल. योग्य वेळी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे बळींची संख्या आटोक्यात आणता आली. मात्र, करोनाचा धोका अजून टळलेला नाही, आपल्याला दक्ष राहावेच लागेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

आयआयटीची यंदा शैक्षणिक शुल्क वाढ नाही :
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) यांचे शैक्षणिक शुल्क २०२०-२१ या वर्षांत वाढवण्यात येणार नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

  • करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून  ते म्हणाले की, आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयआयटी संचालक यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • आयआयआयटी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमांसाठी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही. या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करू नये असे संचालकांना सांगण्यात आले आहे. ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) सरकारी खासगी भागीदारीत चालतात त्यांचीही शुल्क वाढ करू नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुन्हा कार्यरत :
  • करोना संसर्गातून बाहेर आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी पुन्हा सरकारच्या कोविड १९ विरोधी दलाची सूत्रे हाती घेतली.

  • लोकांनी टाळेबंदीबाबत संयम दाखवून ती उठवण्यासाठी लगेच आग्रह धरू नये असे मत त्यांनी  व्यक्त केले. देश सध्या कोविड १९ साथीच्या परमोच्च बिंदूकडे वाटचाल करीत असून अजूनही खूप मोठी जोखीम आहे, सरकार  कोविड १९ साथ आटोक्यात आणण्यासाठी जे निर्णय घेईल त्यात संपूर्ण पारदर्शकता असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • जॉन्सन यांना गेल्या महिन्यात करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना लंडन येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी ते १० डाऊनिंग स्ट्रीट येथील अधिकृत निवासस्थानी परत आले असून १२ एप्रिलला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जगभरात करोनामुळे दोन लाख सहा हजार ५६७ जणांचा मृत्यू :
  • करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत जगभरात दोन लाख सहा हजार ५६७ जणांचा मृत्यू झाला असून जगातील १९३ देशांमध्ये २९ लाख ६१ हजार ५४० नव्या बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी किमान आठ लाख नऊ हजार ४०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.

  • अमेरिकेत नऊ लाख ६५ हजार ९३३ बाधितांपैकी सर्वाधिक म्हणजे ५४ हजार ८७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये एक लाख ९७ हजार ६७५ बाधितांपैकी २६ हजार ६४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • स्पेनमध्ये दोन लाख नऊ हजार ४६५ बाधितांपैकी २३ हजार ५२१ जणांचा तर फ्रान्समध्ये एक लाख ६२ हजार १०० बाधितांपैकी २२ हजार ८५६ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एक लाख ५२ हजार ८४० बाधितांपैकी २० हजार ७३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

COVID 19 विरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती-WHO :
  • COVID 19 विरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे असं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे. “WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने इबोला सारख्या रोगावरही लस शोधण्याचा महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • आता त्याच प्रमाणे COVID 19 या व्हायरस विरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे कारण WHO आणि त्यांच्या मित्रांनी गेली अनेक वर्षे इतर करोना व्हायरसच्या लसींवर संशोधन केलं आहे. त्याचमुळे COVID 19 या व्हायरसविरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे” असं WHO ने म्हटलं आहे.

  • “जगभरात करोनाचा कहर आहे, जगभरातल्या लाखो लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे याची जाणीव जागतिक आरोग्य संघटनेला आहे. या व्हायरसचा जो परिणाम जगावर आणि इतर आरोग्य सेवांवर तो होतो आहे. त्यावरही जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष आहे” असंही घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

२८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.