चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 27, 2021 | Category : Current Affairs


सानियाला जेतेपद :
 • भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांगसोबत खेळताना ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले.

 • सानिया आणि शुआई या दुसऱ्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर ६-३, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. तिसऱ्या मानांकित क्रिस्टियन आणि रूटलिफ या जोडीला अंतिम सामन्यात फारशी झुंज देता आली नाही. सानियाचे हे कारकीर्दीतील ४३वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले.

 • यंदाच्या मोसमात अंतिम फेरीमध्ये खेळण्याची सानियाची ही दुसरी वेळ होती. याआधी डब्ल्यूटीए २५० क्लीव्हलंड स्पर्धेत अमेरिकेच्या क्रिस्टिना मकहेलसोबत खेळताना तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार :
 • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यावर्षी जिल्ह्यातील वरोरा येथील आदित्य जीवने, मूलचा सुबोध मानकर, सावली येथील देवव्रत मेश्राम व चंद्रपूरचा अंशुमन यादव या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे प्रथमच या जिल्ह्यातील चार विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याची टक्केवारी वाढल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चारही विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी दोन हात करत करोना महामारीच्या जीवघेण्या संकटात हे यश मिळविले आहे हे विशेष.

 • आदित्यने करोना महामारीच्या जीवघेण्या संकटात अक्षरश: मृत्युशी लढा देत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ३९९ व्या रँकने उत्तीर्ण होवून यशाला गवसणी घातली आहे. नागपुरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता होवून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करण्याचा त्याने निर्णय घेतला. विद्यार्थी दशेत वडील प्रा. चंद्रभान जीवने यांनी मुलगा आदित्य याला यूपीएससीचे पुस्तक भेट स्वरूपात दिले आणि तिथूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बांधले.

 • त्यानंतर २०१८ पासून वरोरा येथे स्वत:च्या घरी राहून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून अभ्यासाला सुरूवात केली. दुसऱ्या कुणाशी स्पर्धा न करता स्वत:ची स्वत:सोबतच स्पर्धा करून यूपीएससीचा नियोजित अभ्यास सुरू केला.

 • लेखी परीक्षेत यश मिळाले, परंतु मुलाखतीत यश प्राप्त झाले नाही. पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला म्हणून विचलीत न होता पून्हा नव्या जोमाने नियोजनानुसार अभ्यास सुरू ठेवला आणि त्याला यशाची प्राप्ती झाली. विशेष म्हणजे कुठलीही शिकवणी न लावता घरीच राहून अभ्यास केला. 

अमेरिकेत पंतप्रधानांच्या ६५ तासांत २० बैठका :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील ६५ तासांत किमान वीस बैठका घेतल्या आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. एकूण तीन दिवस ते अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिकेतून परतताना विमानातही त्यांनी चार प्रदीर्घ बैठका घेतल्या.

 • याबाबत सविस्तर माहिती देताना सूत्रांनी सांगितले,की मोदी यांनी बुधवारी अमेरिकेला जाताना विमानात दोन बैठका घेतल्या होत्या, त्यानंतर तेथे पोहोचल्यानंतर तीन बैठका घेतल्या. २३ सप्टेंबरला त्यांनी अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत पाच बैठका घेतल्या.

 • अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर जपान, ऑस्ट्रेलिया यांच्या पंतप्रधानांशी त्यांनी चर्चा केली, यानंतरही त्यांनी तीन अंतर्गत बैठकांचे अध्यक्षपद भूषवले. पुढच्या दिवशी त्यांची अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक झाली, त्यानंतर क्वाड देशांच्या बैठकीला ते उपस्थित होते.

 • २५ सप्टेंबरला चार अंतर्गत बैठकांना ते उपस्थित होते. मोदी हे २५ सप्टेंबरला अमेरिकेहून मायदेशी निघाले तेव्हाही त्यांनी दोन बैठका घेतल्या. परदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी हे अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये कार्यरत होते.

आज ‘भारत बंद’! तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची हाक :
 • केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) आज, सोमवारी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून, काही राज्यांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 • केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. तथापि, रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

 • ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल, अशी हमी संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. अनेक राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बंदला पाठिंबा असल्याचे सांगितले. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते, राजद नेते तेजस्वी यादव यांनी आपण या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

नक्षलग्रस्त भागांसाठी केंद्राकडे १२०० कोटींची मागणी :
 • नक्षलींविरोधात लढण्यासाठी, तसेच नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी केंद्राने राज्य सरकारला १२०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांनी रविवारी दिल्लीत बैठक बोलावली होती.

 • चंद्रपूर, गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील कारवायांचा बीमोड करण्यासाठी नवी पोलीस ठाणी उभारली पाहिजेत, तसेच दुर्गम भागांमध्ये संपर्क यंत्रणा बळकट केली पाहिजे, त्यासाठी अधिकाधिक मोबाइल टॉवर उभारले गेले पाहिजेत, असे दोन प्रमुख मुद्दे ठाकरे यांनी बैठकीत मांडले. या वेळी राज्याच्या वतीने नक्षल समस्येवर सादरीकरणही करण्यात आले.

 • राज्यातील नक्षलग्रस्त भागांतील विकासाचे प्रश्न, अन्य सोयीसुविधा आदींसाठी राज्य सरकारला करावा लागणाऱ्या खर्चाची बाबही मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांसमोर मांडली. दुर्गम भागांमध्ये नक्षलींप्रमाणे पुणे व मुंबईसारख्या शहरांमधील झोपडपट्टय़ांमध्येही नक्षलींचा प्रभाव वाढण्याचा धोका असू शकतो, अशी चिंताही ठाकरे यांनी व्यक्त केली. छत्तीसगढसारख्या नक्षलग्रस्त राज्यांकडून महाराष्ट्राला सहकार्याची अपेक्षा असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळ विस्तारात जितिन प्रसाद यांचा समावेश :
 • अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जितिन प्रसाद यांचा रविवारी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात इतर ६ जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

 • उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यातील पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकांची भाजप तयारी करत असतानाच हा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे.

 • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात झालेल्या एका समारंभात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. पलटू राम, छत्रपाल गंगवार, संगीता बलवंत बिंड, धर्मवीर प्रजापती, संजीव कुमार गौर व दिनेश खाटिक अशी नव्याने समावेश करण्यात आलेल्या राज्यमंत्र्यांची नावे आहेत. या विस्तारामुळे मंत्रिमंडळाच्या सदस्यसंख्येची ६० ही कमाल मर्यादा गाठली गेली आहे.

२७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)