चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ ऑक्टोबर २०२०

Date : 27 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“नऊ तासांच्या चौकशीत मोदींनी चहादेखील घेतला नव्हता” :
  • २००२ गुजरात दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची सलग नऊ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान नरेंद्र मोदींनी तपास अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या १०० पैकी एकही प्रश्न टाळला नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान ते अत्यंत शांत होते. नऊ तासांच्या या चौकशीत त्यांनी साधा चहादेखील स्वीकारला नाही असा खुलासा त्यावेळी तपासाचे प्रमुख असणारे आर के राघवन यांनी आपल्या नव्या पुस्तकातून केला आहे. विशेष तपास समितीकडून गुजरात दंगलीचा तपास करण्यात आला होता.

  • आर के राघवन यांनी “A Road Well Travelled” हे आपलं आत्मचरित्र पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं आहे. यावेळी त्यांनी तपासासाठी नरेंद्र मोदींना गांधीनगरमधील एसआयटी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली तसंच सोबत पाण्याची बाटली आणली होती अशी माहिती दिली आहे.

  • नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना चौकशीसाठी बोलावण्यासंबंधी सांगताना त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटी कार्यालयात यावं लागेल असं कळवलं होतं.इतर कोणत्या ठिकाणी ही चौकशी करणं चुकीचा संदेश देणारं ठरलं असतं. मोदींनी आमच्या निर्णयाचं महत्व समजलं आणि ते एसआयटी कार्यालयात येण्यास तयार झाले”.

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा :
  • चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे. या पाण्याचा साधन संपत्ती समजायचं का? हे अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेलं नाही.

  • मात्र चंद्रावर पाणी सापडणं महत्त्वाचं मानलं जातं आहे असंही नासाने म्हटलं आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट काही वेळापूर्वीच करण्यात आलं आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.

  • अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही २०२४ पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.

द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे दोन मंत्री भारतात :
  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर यांचे ‘दोन अधिक दोन’ संवादासाठी दिल्लीत आगमन झाले. दोन अधिक दोन संवादाची ही तिसरी वेळ असून इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य तसेच संरक्षण व सुरक्षा या दोन क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधात सुधारणा हे या संवादाचे दोन मुख्य उद्देश असणार आहेत. मंगळवारी पॉम्पिओ व एस्पर हे त्यांचे समपदस्थ परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत.

  • प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर सहकार्य हा त्यांच्या भेटीचा एक हेतू आहे. चीन बरोबर पूर्व लडाखमध्ये संघर्ष सुरू होत असताना अमेरिकेच्या दोन मंत्र्यांची ही भारत भेट महत्त्वाची ठरणार आहे. जयशंकर व राजनाथ सिंह यांच्याशी अमेरिकेचे दोन्ही मंत्री स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेणार आहेत.

  • गेल्या आठवडय़ात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, द्विपक्षीय प्रश्नांवर दोन्ही देशात सांगोपांग चर्चा होणार असून प्रादेशिक व जागतिक मुद्दय़ांचाही समावेश असणार आहे. ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘बीइसीए’ला मान्यता देण्यासाठीही प्रयत्न होणार असून त्यामुळे दोन्ही देशातील संरक्षण संबंध वाढणार आहेत. ‘बीइसीए’मुळे उच्च लष्करी तंत्रज्ञान, काही भौगोलिक नकाशे व रसद यांच्या आदानप्रदानाची प्रक्रिया सोपी होणार आहे. २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून दर्जा दिला आहे. त्यावर्षी ‘एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट’ (एलइएमओए) करार दोन्ही देशात झाला होता.

रिगोचेस बुद्धिबळ महोत्सव - लेऑन मेंडोसाला विजेतेपद :
  • भारताचा युवा आंतरराष्ट्रीय मास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथील रिगोचेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाचे विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह ग्रँडमास्टर किताब मिळवण्याच्या दिशेने त्याने पहिला टप्पा पार केला.

  • १४ वर्षीय मेंडोसाने सहा डाव जिंकत, दोन बरोबरी आणि एका पराभवासह नऊ फे ऱ्यांमध्ये सात गुण मिळवून जेतेपद मिळवले. या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टरसह १० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. गोव्याच्या मेंडोसा (एलो २४९९ रेटिंग गुण) याने विलियम पाश्चलविरुद्धचा पहिला डाव जिंकल्यानंतर त्याला अ‍ॅलेक्स क्रूटूलोव्हिककडून पराभूत व्हावे लागले.

  • तिसरा डाव बरोबरीत सोडवल्यानंतर त्याने सलग पाच डाव जिंकत अग्रस्थान पटकावले. त्याने गुयेन हून मिन्ह हाय आणि डेव्हिड बेरके झ या दोन ग्रँडमास्टर्सवर मात केली. नवव्या डावात त्याला हंगेरीचा ग्रँडमास्टर अ‍ॅडम कोझाकविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. कोझाकला अर्ध्या गुणाने मागे टाकत मेंडोसाने जेतेपद पटकावले.

  • ‘‘ही स्पर्धा जिंकल्याने तसेच ग्रँडमास्टर किताबासाठीचा पहिला टप्पा पार केल्याने मी खूश आहे,’’ असे मेंडोसाने सांगितले.

२७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.