चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ मे २०२१

Updated On : May 27, 2021 | Category : Current Affairs


‘आयपीएल’ परदेशी खेळाडूंविना :
 • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामन्यांत परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी संभ्रम कायम आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज वगळता अन्य देशांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये व्यग्र असल्याने त्यांच्याविनाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ‘आयपीएल’ खेळवावी लागणार, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

 • संयुक्त अरब अमिराती येथे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘आयपीएल’चा उर्वरित हंगाम खेळवण्यात येईल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी मंगळवारी दिली. ‘आयपीएल’चे अद्याप ३१ सामने शिल्लक असून भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीचा अखेरचा दिवस १४ सप्टेंबर असेल. ऑक्टोबरमध्ये विश्वचषक होणार असल्याने इंग्लंड क्रिकेट मंडळ, न्यूझीलंड क्रिकेट मंडळ यांनी यापूर्वीच त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकांना प्राधान्य देतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता ‘बीसीसीआय’ परदेशी खेळाडूंबाबत कोणते धोरण स्वीकारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 • ‘‘आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखांविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यानच्या काळात प्रामुख्याने २१ दिवसांत सर्व सामने खेळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे. परदेशी खेळाडू उपलब्ध नसल्यास त्यांच्याविनाच ‘आयपीएल’चे आयोजन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

एमजीएम स्टुडिओची अ‍ॅमेझॉनकडून खरेदी :
 • हॉलीवूडमध्ये मोठी घडामोड होऊ घातली आहे. ऑनलाइन शॉपिंगमधील अव्वल नाव असलेली अ‍ॅमेझॉन कंपनी मेट्रो गोल्डविन मेयर (एमजीएम) हा चित्रपट व टीव्ही स्टुडिओ विकत घेणार आहे. आपली व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा आणखी प्रेक्षणीय व्हावी यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

 • या व्यवहारासाठी अ‍ॅमेझॉन एमजीएमला ८.४५ अब्ज डॉलर मोजणार आहे. यापूर्वी या कंपनीने किराणा व्यवसायात असलेली ‘होल फूड्स’ ही कंपनी २०१७ साली १४ अब्ज डॉलरला विकत घेतली होती. त्यानंतर ही दुसऱ्या सर्वात मोठ्या क्रमांकाची खरेदी असणार आहे.

 • नेटफ्लिक्स व डिस्ने प्लस यांच्या स्पर्धेत आपली स्ट्रीमिंग सेवा वाढवण्यासाठी होत असलेला माध्यम उद्योगातील हा सर्वात अलीकडचा व्यवहार आहे. आपली प्राइम व्हिडीओ सेवा किती लोक पाहतात, याची माहिती अ‍ॅमेझॉनने दिलेली नाही. मात्र २० कोटींहून अधिक लोकांनी अधिक जलद शिपिंग व इतर फायदे देणारे त्याचे प्राथमिक सदस्यत्व घेतलेले असल्यामुळे एवढ्या लोकांना ती पाहता येऊ शकते. अ‍ॅमेझॉनची ‘आयएमडीबी टीव्ही’ नावाची मोफत स्ट्रीमिंग सेवाही असून, यात चित्रपट व इतर शोदरम्यान जाहिराती दाखवून अ‍ॅमेझॉन पैसे मिळवते.

“योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा”; आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र :
 • योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्यची चिन्हं दिसत नाही. अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आयएमएने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयएमएनं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीलं आहे. योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

 • “योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हिडिओत त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”, अशी मागणी आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

 • आयएमएच्या उत्तराखंड शाखेनेही योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल, असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.

भारताच्या शेऊलीला रौप्यपदक :
 • भारताचा वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने बुधवारी कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. १९ वर्षीय शेऊलीने ७३ किलो वजनी गटात एकूण ३१३ किलो (स्नॅच १४१, क्लीन अँड जर्क १७२) वजन उचलले. इंडोनेशियाच्या जुनियान रिझकीने (३४९ किलो) सुवर्णपदक जिंकले, तर रशियाच्या सेरोबिन गेव्होर्गने (३०८) कांस्यपदक मिळवले.

 • राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या शेऊलीने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत त्याने स्नॅचमध्ये १३९, तर क्लीन अँड जर्कमध्ये १७० किलो वजन उचलले होते. यावेळी त्याने त्या कामगिरीला मागे टाकले. जागतिक स्पर्धेत स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारासाठी वैयक्तिक वेगळे पदक देण्यात येते.

 • ऑलिम्पिकमध्ये मात्र दोन्ही प्रकाराचे मिळून एकच पदक विजेत्याला दिले जाते. मंगळवारी ६७ किलो वजनी गटात भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने स्नॅच प्रकारात कांस्यपदक जिंकले.

व्हॉट्सअ‍ॅप न्यायालयात :
 • केंद्र सरकारने डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेल्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या नियमामुळे गोपनीयतेचा भंग होईल, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे.

 • समाजमाध्यमे, डिजिटल वृत्तसंकेतस्थळे, ओटीटी माध्यमे यांवरून प्रसारित मजकुराबाबतच्या तक्रारींचे निवारण आणि कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठीची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. या नियमावलीमुळे एखाद्या संदेशाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा निर्माणकर्ता कोण, याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपला द्यावी लागेल.

 • व्हॉट्सअ‍ॅपवरील दोन व्यक्तींमधील संवाद गोपनीय ठेवला जातो. ती गोपनीयताच नव्या नियमावलीमुळे भंग होणार असून, घटनेने दिलेल्या गोपनीयतेच्या हक्काचे ते उल्लंघन ठरेल़, अशी भूमिका घेत व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी संध्याकाळी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली.

 • मूळ संदेशकर्ता शोधून काढायला सांगणे हे या समाजमाध्यमावरील प्रत्येक संदेशावर नजर ठेवण्यासारखे आहे. अर्थात, गोपनीयतेच्या अधिकाराचे ते उल्लंघन ठरेल. वापरकत्र्याच्या गोपनीयतेच्या अधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आम्ही सातत्याने ठामपणे उभे राहिलो आहोत, असे व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र, याबाबत व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२७ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)