चालू घडामोडी आणि दिनविशेष - 27 जानेवारी 2024

Date : 27 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सर्वात जलद त्रिशतक झळकावत रिचर्ड्स-सेहवागचा विक्रम मोडणारा, कोण आहे तन्मय अग्रवाल?
 • भारतीय फलंदाजांचा दबदबा जगभर पाहायला मिळतो. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज काही ना काही विक्रम करत राहतात. त्याच्यामागे तरुणांची फौज तयार केली जात आहे जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शुक्रवार २६ जानेवारीला अशीच एक खेळी पाहायला मिळाली, ज्याने विश्वविक्रम मोडला. तन्मय अग्रवाल जगातील सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या फलंदाजाने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना अनेक दिग्गजांना मागे टाकले.

सर्वात जलद त्रिशतक -

 • २६ जानेवारी २०२४ रोजी अरुणाचल प्रदेश आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्याची इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली आहे. अवघ्या एका दिवसाच्या खेळात तन्मय अग्रवालने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्रिशतक झळकावले. हे स्फोटक त्रिशतक झळकावून तन्मयने विश्वविक्रम आपल्या नावावर केला. या फलंदाजाने अवघ्या १४७ चेंडूत २१ षटकार आणि ३३ चौकारांच्या मदतीने ३२३ धावा केल्या.

कोण आहे तन्मय अग्रवाल?

 • २८ वर्षीय तन्मयचा जन्म ३ मे १९९५ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. लहान वयातच जेव्हा त्याचा क्रिकेटकडे कल वाढला तेव्हा त्याच्या पालकांनी त्याला या खेळासाठी प्रोत्साहन दिले. तन्मयच्या स्फोटक खेळाच्या जोरावर तो हैदराबादच्या अंडर-१४ संघात पोहोचला. अंडर-१६, अंडर-१९, अंडर-२२ आणि अंडर-२५ मध्ये टीममध्ये स्थान मिळवण्यात तो यशस्वी झाला. २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तन्मयने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी संघ सनरायझर्स हैदराबादमध्येही स्थान मिळवले. ५६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३५०० हून अधिक धावा केल्या आहेत.
 • तन्मय अग्रवालने आता दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराइसने १९१ चेंडूत झळकावलेल्या त्रिशतकाचा विक्रम मोडला. त्याने हा पराक्रम अवघ्या १४७ चेंडूत केला. हा पराक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्सने २४४ चेंडूत केला होता. एका दिवसात ३०० धावा करून तन्मयने भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागलाही मागे टाकले. २००९ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या ब्रेबॉर्न कसोटीत एका दिवसात २८४ धावा केल्या होत्या.
‘एमपीएससी’च्या परीक्षेसाठी अर्ज करता, शुल्क भरताना अडचण आल्यास या सूचनांचे पालन करा
 • महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण १७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील. सामान्य प्रशासन विभाग -राज्य सेवा गट-अ व गट-ब-एकूण २०५ पदे आहेत. मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करणे सुरू झाले आहे.
 • हा अर्ज करताना विद्यार्थ्यांच्या खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही ‘इनव्हॅलीड कोर्स रिक्वेस्ट’ किंवा ‘फीस नॉट पेड’ असा शेरा येत असल्यास ‘चेक पेमेंट स्टेटस’ या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची अद्यावत स्थिती कळणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांच्या ट्विटरवर देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’साठी विविध पदांसाठी अर्ज काढण्यात आले आहेत. यामध्ये जाहिरातीत पदांची पात्रताही देण्यात आली आहे. त्यानुसार वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी, रसायन, स्थापत्य/ ऑटोमोबाईल/संगणक/ पॉवर/ प्रोडक्शन/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स/ यंत्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/संगणक विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, पशुवैद्याकीय विज्ञान यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
 • राज्य सेवा मुख्य परीक्षा – ८०० गुणांसाठी मुलाखतीचे गुण – १००
 • इतर संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा ४०० गुणांसाठी, मुलाखतीचे गुण – ५०.
 • परीक्षा शुल्क – अमागास – रु. ५४४/-; मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत). भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक २८ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २९ जानेवारी २०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).
मल्लखांबासाठी संस्मरणीय दिवस! पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरण्याबाबत उदय देशपांडे यांची प्रतिक्रिया
 • पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरणे हे माझ्यासाठी खूप खास आहे. मल्लखांब या खेळासाठी हा दिवस संस्मरणीय असून या पुरस्कारामुळे मल्लखांबाला राजमान्यता मिळेल आणि देशाबाहेर मल्लखांबाचा प्रसारास ती उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया मल्लखांबातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी व्यक्त केली.
 • ‘‘मी जेव्हा या खेळामध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा केंद्र शासनाची मल्लखांबाला मान्यताही नव्हती. यानंतर आम्ही अनेक राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले. अनेक राज्य संघटना स्थापन करून त्या नोंदणीकृत करून मल्लखांब महासंघाला संलग्न केल्या. एवढे करूनही मान्यता मिळण्यास अडचणी येत होत्या. प्रत्येक देश आपापल्या खेळाला पुढे आणण्यासाठी पुढाकार घेत असतो, पण आपल्याकडून मल्लखांबासाठी तसे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत नव्हते. मात्र, आता मल्लखांबाला चांगले दिवस आले आहेत. खेलो इंडियामध्ये मल्लखांबाचा समावेश झाला. मल्लखांबाच्या राष्ट्रीय विजेत्यांणा दरमहा दहा हजारप्रमाणे वर्षांला एक लाख २० हजारांची शिष्यवृत्ती सुरू केली. मल्लखांबाची १०० केंद्रे उभी केली. मल्लखांबाचे साहित्य देण्यासोबतच प्रशिक्षकांचीही नियुक्ती केली. आता मुले विमानाने खेलो इंडियाच्या स्पर्धेला जातात. आम्ही मुलींचा मल्लखांबही सुरू केला व आज देशभरात मुलींचा सहभाग वाढलेला दिसतो,’’ असे देशपांडे यांनी सांगितले.
 • ‘‘मला पुरस्कार मिळाल्याच्या बातमीने खूप आनंद झाला आहे. मात्र, माझ्या यशात अनेक जणांचे योगदान आहे. श्री समर्थ व्यायाममंदिराचे संस्थापक व्यायाममहर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी यांनी मला मल्लखांबाची गोडी लावली. तसेच मला येथे पाठविणारे माझे आई-वडील, तसेच मला कायम पािठबा देणारी माझी पत्नी सुखदा व माझी दोन्ही मुले ओंकार व अदिती यांचे माझ्या यशात खूप मोठे योगदान आहे. माझी दोन्ही मुले राष्ट्रीय विजेती होती. अदितीला शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. माझे सहकारी ज्यांनी मला सहकार्य केले व त्यांच्यामुळेच इतकी वर्षे मी सातत्याने काम करू शकलो. सध्या एक सशक्त व समर्थ भारत स्थापन करण्यासाठी आपल्याला मल्लखांबाचा उपयोग करायचा आहे,’’ असेही देशपांडे म्हणाले.
अनाथ, दिव्‍यांगांच्या सेवेला ‘पद्मश्री’चे कोंदण! वझ्झरच्या शंकरबाबा पापळकर यांचा पद्म पुरस्‍काराने गौरव
 • रस्‍त्‍याच्‍या कडेला सोडून दिलेल्‍या बेवारस, दिव्‍यांग मुलांना पितृछत्र देऊन त्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी आयुष्‍यभर धडपड करणारे ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे. या निमित्‍ताने अचलपूर तालुक्‍यातील वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्‍यांग, बेवारस बालगृहात आनंदोत्‍सव साजरा केला जात आहे. या पुरस्‍काराने दिव्‍यांग, बेवारस मुला-मुलींच्‍या पुनर्वसनाच्‍या चळवळीला बळ मिळेल, अशा भावना शंकरबाबा पापळकर यांनी व्‍यक्‍त केल्‍या आहेत.
 • अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. या ठिकाणच्या १२३ मुला-मुलींच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर यांचे नाव लागते. या सर्व मुला-मुलींचे ते पिता आहेत.
 • या मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावरील उपचार आणि त्यांचे विवाह लावून देण्याची जबाबदारीदेखील शंकरबाबा यांनीच सांभाळली. आजवर ३० मुला-मुलींचे लग्न करून देताना त्यांच्या योग्य पुनर्वसनाचे यशस्वी ‘प्रारूप’ शंकरबाबा यांनी तयार केले आहे. या मुलांची ते गेल्या दोन तपापासून अहोरात्र सेवा करतात. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि एवढेच नव्हे तर वयाची २१ वर्षे झालेल्या या अंध, मुकबधीर तरुण मुलामुलींना नोकरी देऊन त्यांचे संसारही या शंकरबाबा यांनी स्वबळावर उभे केले आहे. अशाच काही कुटुंबात सुदृढ बालकेसुद्धा जन्माला आली आहेत.
 • वझ्झर येथील आश्रमात अनेक मुले मानसिकदृष्ट्या विकलांग, शारीरिक व्याधीग्रस्‍त आहेत, काही अंध, मूक-बधीर आहेत. या अनाथ मुलांना मायेची ऊब देणारा एक अवलिया अशी शंकरबाबा पापळकर यांची ओळख आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु अपंग, मतिमंद, दृष्टिहीन मुले व मुली कुठे जाणार, असा सवाल करून या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कायदा करावा, अशी शंकरबाबांची मागणी आहे.
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा ऐतिहासिक सोहळा पाहिलात का? १९५० च्या आठवणींना देऊ उजाळा
 • प्रजासत्ताक दिन हा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपाला आला. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी विविध ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ७५ वा असल्याने सोहळा आणखीनच खास होणार आहे. आज याच निमित्ताने आपण, भारताच्या पहिल्या वहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या काही खास आठवणी पाहणार आहोत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले हे काही खास क्षण आपल्याला पुन्हा एकदा १९५० व्या वर्षात घेऊन जातील, अशी आशा..
 • १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ ६ मिनिटे २८ सेकंदाचा असून यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. तसंच सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहेत.
 • तर अजून एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये प्रजासत्ताक दिन कशाप्रकारे साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देताना दिसत आहेत.

 

महिला आयपीएलसाठी पाच संघ! पहिल्याच लिलावात BCCI ला मिळाले तब्बल ४६६९ कोटी रुपये; पुरुषांच्या आयपीएलचे सर्व रेकॉर्ड मोडले
 • बहुप्रतिक्षित असेलल्या भारतातील पहिल्या महिला आयपीएलसाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. यावेळी बीसीसीआयने नवीन पाच फ्रेंचायझीची घोषणा केली. या लिलावात पाच संघ खरेदी करण्यासाठी एकूण १७ कंपन्यांनी बोली लावली होती. दरम्यान, यावेळी पुरुषांच्या पहिल्या आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
 • नेमकं काय म्हणाले जय शाह - ”आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनसाठी लिलाव पार पडला. या लिलावाने पहिल्या पुरुष आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत”, अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली. तसेच या लिलावाद्वारे बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले असल्याचेही ते म्हणाले.
 • बीसीसीआयकडून नवीन पाच फ्रँचायझींची घोषणा - दरम्यान, पहिल्या महिला आयपीएलसाठी बीसीसीआयकडून पाच संघांसाठी फ्रेंचायझींची घोषणा करण्यात आली. यावेळी अहमदाबाद संघासाठी अदानी स्पोर्ट्सलाइनने यशस्वी बोली लावली. त्यांनी अहमदाबाद संघ विकत घेण्यासाठी तब्बल १२८९ कोटी रुपये मोजले. तर मुंबई संघासाठी इंडियाविन स्पोर्टस् ने ९१२.९९ कोटी रुपये, बंगळुरू संघासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटी रुपये, दिल्ली संघासाठी जेएस डब्लू जीएमआर क्रिकेट लि.ने ८१० कोटी रुपये, तर लखनऊ संघासाठी कॅपरी ग्लोबल होल्डिंगने ७५७ कोटी रुपये मोजले.

SAP तीन हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ, कंपनीने दिलं ‘हे’ कारण

 • जर्मनीची सॉफ्टवेअर कंपनी SAP वरही मंदीचा परिणाम झाला आहे. कंपनीने गुरूवारी ही घोषणा केली गेली आहे की कंपनीतून तीन हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. SAP ही कंपनी वाल्डोर्फ आधारित समूह आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर आणि क्लाऊड आधारित कॉम्प्युटर सेवा पुरवणारी कंपनी आहे.या कंपनीने आता असं म्हटलं आहे की आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आम्ही टारगेटेड रिस्ट्रक्चरींगची योजना तयार केली आहे.
 • AFP ने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीने २०२२ या वर्षाचा एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की SAP च्या अडीच टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. जगभरात SAP सोबत १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत.या सगळ्या संख्येची अडीच टक्के गृहीत धरली तर कंपनी साधारण ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे.
 • जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अशात ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेही मोठ्या कपातीची घोषणा केली. अॅमेझॉन जवळपास १८ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. कंपनीत या निर्णयाचा मोठा फटका ई कॉमर्स आणि एचआर या विभागांमध्ये काम करणाऱ्या लोकांना बसणार आहे असंही अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं.
 • अमेझॉनच्या सीईओने सांगितलं होतं की २०२३ च्या सुरूवातीपासून कपात होईल. याविषयी आम्ही चर्चा केली होती. अर्थात आम्ही जे कर्मचारी काढले जाणार असतात त्यांच्याशी चर्चा करत नाही. आमच्या एका सहकाऱ्याने ही माहिती बाहेर लिक केली होती असंही त्यांनी सांगितलं.

नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध; किती आहे किंमत

 • करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं असून नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. इन्कोव्हॅक (Incovacc) असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते आज वितरण करण्यात आलं.
 • इन्कोव्हॅकला २०२२ मध्ये मिळाली मान्यता : इन्कोव्हॅक या लसीसाठी भारत बायोटेकला डिसेंबर २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती. ही लस वर्धक मात्रा म्हणून देखील देता येणार आहे. यापूर्वी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड या लसींची मात्रा घेणारे सुद्धा वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅकचा वापर करू शकतात. तसेच १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना ही लस घेता येणार आहे.
 • किती असेल किंमत - भारत बायोटेकने विकसित केलेल्या या लसीची किंमत सरकारी रुग्णालयात प्रति मात्रा ३२५ रुपये, तर खाजगी रुग्णालयांत प्रति मात्रा ८०० रुपये असणार आहे. तसेच या लसीच्या नोंदणीसाठी कोविन ॲपवर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं

 • भारत देश आज आपला ७४ वा गणतंत्र दिवस साजरा करतो आहे. हेच औचित्य साधत दिल्लीतल्या कर्तव्य पथावर गणतंत्र दिवसाची कवायत पार पडली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतल अल सिसी हे या वर्षी गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे होते. या वर्षीचा गणतंत्र दिवस खास होता. राफेल या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं आजच्या सोहळ्यात पाहण्यास मिळाली.
 • काय काय घडलं आज दिवसभरात?
  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांच्यासह कार्यक्रमच्या ठिकाणी पोहचल्या. गणतंत्र दिवसाची कवायत सुरू करण्यासाठी त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर आपल्या देशाची शक्ती सगळ्या देशाने पाहिले. कर्तव्य पथ या पथाचं नाव आधी राजपथ असं होतं. आज याच ठिकाणी सैन्याच्या तिन्ही दलांचं संचलन पार पडलं.
 • या कवायतीची सुरूवात इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या एका कवायतीने झाली. यामध्ये इजिप्तच्या सशस्त्र दलांचं प्रतिनिधीत्व करणारे १४४ सैनिक सहभागी झाले होते. केंद्रीय राखी पोलीस दलाच्या महिलांच्या तुकडीनेही कवायत केली. एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात नौदलाच्या तीन महिला आणि सहा अग्नीवीर सहभागी झाले होते. न्यूज १८ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
 • परेडमध्ये रशियन बनावटीचा एकही टँक नव्हता
  आत्मनिर्भरता हाच आदर्श आहे हे वाक्य सार्थ ठरवण्यात आल्याचं कवायतीत दिसलं. आज कवायतीत रशियाचा एकही टँक नव्हता. भारतात निर्मिती करण्यात आलेले अर्जुन आणि आकाश या क्षेपणास्त्र या कवायतीत सहभागी झाली होती. तसंच भारतीय निर्मितीची अनेक शस्त्रही या परेडमध्ये दाखवली गेली
 • आजच्या दिवसाच्या औचित्याने संपूर्ण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा गणतंत्र दिवस विशेष आहे कारण आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि त्याच दरम्यान हा दिवस आपण साजरा करतो आहोत. माझी इच्छा आहे की आपल्या देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट केली पाहिजे.

झाकीर हुसेन, सुधा मूर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार जाहीर, एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा; पाहा यादी

 • भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

७ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार

 • केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कारांपैकी ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये १९ मान्यवर महिला आहेत. तर यामध्ये २ एनआरएय, परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

९ जणांना पद्मभूषण, ९१ जणांना पद्मश्री

 • एकूण ९ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. यामध्ये सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला या मान्यवरांचा समावेश आहे. तर ९१ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये आरआरआर चित्रपटाचे संगीतकार कीरावानी, अभिनेत्री रविना टंडन आदींचा समावेश आहे.

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर

मुलायमसिंह यादव (मरणोत्तर)
दिलीप महालनाबीस (मरणोत्तर)
झाकीर हुसेन
एसएम कृष्णा
श्रीनिवास वर्धन
बालकृष्ण दोशी

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जानेवारी २०२२
यंदा सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प होणार ‘पेपरलेस’; करोनामुळे सरकारचा निर्णय :

यंदा सलग दुसऱ्या वर्षी, वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी ‘पेपरलेस’ होणार आहे. करोनामुळे कामाच्या ताणामुळे तसेच सुरक्षिततेच्या कारणांमुळे सरकारने बजेटच्या प्रती छापणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्राने फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले. त्यामुळे बजेट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करवून दिले जाईल आणि फक्त काही हार्ड कॉपी छापल्या जाणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

अर्थसंकल्प सादर होईपर्यंत १०० हून अधिक लोकांना साधारणपणे पंधरा दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात (ज्यामध्ये वित्त मंत्रालय आहे) प्रिंटिंग प्रेसमध्ये राहावे लागते. सध्या करोनाचं संक्रमण होण्याची भीती आहे, त्यामुळे अर्थसंकल्प न छापण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतात प्रथमच, गेल्या वर्षी सरकारला अर्थसंकल्प छापण्याची ही प्रथा थांबवावी लागली. प्रिंटिंग प्रेसमध्ये जागा कमी असते आणि कामसाठी १०० पेक्षा जास्त लोक लागतात, त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं कठीण असतं. 

म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा अर्थसंकल्प मांडतील. त्या दिवशी संसदेच्या परिसरात या वेळी बजेट पेपरने भरलेले ट्रक दिसणार नाहीत. यापूर्वी सरकारने २०१६-१७ मध्ये अर्थसंकल्पाच्या हार्ड कॉपीची छपाई कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या वर्षी प्रथमच छपाई पूर्णपणे थांबवली.

सरकारने सुरुवातीला पत्रकार आणि विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रतींची संख्या कमी केली होती आणि नंतर खासदारांना उपलब्ध केलेल्या प्रती कमी केल्या होत्या. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बजेट पेपरलेस सादर केलं जाणार आहे.

५० कॅरेटच्या एका Blue Diamond मुळे ३० वर्षांपासून या दोन देशांमध्ये होतं वैर; आता मात्र :

सौदी अरेबिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये तब्बल ३० वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. सौदीने मंगळवारी थायलंडसोबतचे राजकीय संबंध पूर्णपणे नव्याने सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. एका हिऱ्याच्या चोरीवरुन (Thailand Saudi Arabia Blue Dimond Issue) या दोन देशांमधील राजकीय नातं पूर्णपणे संपुष्टात आलं होतं. या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही पद्धतीची चर्चा मागील ३० वर्षांमध्ये झाली नाही. मात्र आता या दोन्ही देशांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय.

सन १९८९ मध्ये राजा फैसल बिन फहद यांच्या राजवाड्यातून ९१ किलो वजनाचे दागिने आणि काही मौल्यवान रत्नं चोरीला गेले होते. या चोरीमध्ये थायलंडच्या एका नागरिकाचा हात होता. क्रिआंगक्राई टेकामोंग असं ही चोरी करण्याऱ्याचं नाव होतं. ही व्यक्ती राजवाड्यामध्ये नोकर म्हणून काम करायचीय. चोरी केल्यानंतर सर्व दागिने या व्यक्तीने एका व्हॅक्यूम क्लिनरच्या बॅगमध्ये लपवले. यामध्ये ५० कॅरेटचा मौल्यवान असा ब्लू डायमंडही होता.

हे सर्व मौल्यवान सामान क्रिआंगक्राईने थायलंडमधील लैम्पांग प्रांतामध्येही पाठवलं. मात्र एवढ्या महागड्या संपत्तीची विल्हेवाट लावणं त्याला जमलं नाही. त्यामुळे तो कमी किंमतीला हे दागिने विकू लागला. मात्र काही दिवसांमध्येच त्याच्याबद्दल शंका घेण्यात आल्या आणि तो तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला. रॉयल थाय पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आला. क्रिआंगक्राईला दोषी ठरवून त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

प्रजासत्ताक दिनी सिडकोकडून ५७३० घरांची लॉटरी जाहीर, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख :

करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची (CIDCO) ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली. या गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सिडकोचा हा गृहनिर्माण प्रकल्प तळोजा नोडमध्ये उभारण्यात येणार आहे.

घर खरेदी करण्यासाठी इच्छुकांना २४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. एकूण ५७३० घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १५२४ घरं उपलब्ध असणार आहेत. उर्वरित ४२०६ घरं साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध असणार आहेत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या माध्यमातून ५७३० घरांच्या निर्मितीचा शुभारंभ यावर्षीच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येतोय. सिडकोतर्फे सातत्याने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यात येतात. किफायतशीर दर, दर्जेदार बांधकाम आणि पारदर्शक व सुलभ ऑनलाईन प्रक्रियेमुळे सिडकोच्या आजपर्यंतच्या सर्व गृहनिर्माण योजना लोकप्रिय ठरल्यात.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल टॅम्परिंग; ICCनं सुनावणी कठोर शिक्षा :

दोहा येथे अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स (AFG vs NED) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. अफगाणिस्तानने सर्व सामन्यांमध्ये विजय नोंदवत ही मालिका सहज जिंकली.

पण गेल्या सामन्यात नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज व्हिव्हियन किंग्मा याने सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड (ball tampering) केली. तिसर्‍या सामन्याच्या ३१व्या षटकात व्हिव्हियन किंग्माने चेंडूशी छेडछाड केली आणि चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याला आयसीसीने चार सामन्यांची शिक्षा सुनावली.

आयसीसीने म्हटले, ”व्हिव्हियन किंग्माने खेळाडू आणि खेळाडूंच्या वैयक्तिक समर्थनासाठी आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.१४चे उल्लंघन केल्याचे आढळले. चार सामन्यांच्या बंदीसोबतच, किंग्माच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये पाच डिमेरिट गुण देखील जोडले गेले आहेत. २४ महिन्यांच्या कालावधीतील ही त्याची पहिली चूक होती.”

विराट पुन्हा कॅप्टन होणार? RCB प्रमुखांनी दिली ‘लक्ष्यवेधी’ प्रतिक्रिया; म्हणाले :

विराट कोहली पुन्हा एकदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद स्वीकारताना दिसू शकतो. आगामी हंगामात विराट संघाचे नेतृत्व करू शकतो. यापूर्वी श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल यांना आरसीबीचा कर्णधार बनवण्याची चर्चा होती. पण आरसीबीच्या अध्यक्षांनी विराटबाबत लक्ष्यवेधी विधान केले आहे.

आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, ”विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले. आम्ही त्याला कर्णधारपदी ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी विनंती करू. आयपीएल २०२२चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या वर्षी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

मिश्रा यांनी सांगितले, की जर विराट कोहली कर्णधारपदासाठी सहमत असेल तर तो आरसीबीचा कर्णधार असेल. अन्यथा लिलावाद्वारे कर्णधार शोधावा लागेल. विराट कोहलीने २०१३ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले होते.

कोहलीने ८ हंगामात आरसीबीचे नेतृत्व केले. मात्र तो संघाला एकदाही ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या आयपीएलमध्ये एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला होता.

27 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.