चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ डिसेंबर २०२०

Date : 27 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नव्या वर्षात देशासाठी हा संकल्प करा; पंतप्रधान मोदी यांचं देशवासीयांना आवाहन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, करोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असं म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचं आवाहन केलं. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे.

  • वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले,”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं मोदी म्हणाले.

  • पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले,”व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे.

  • प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा,” असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. “देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हानं होती, संकटं पण आले. करोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण भारतानं प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशातील गुणवत्ताधारक परराष्ट्रांच्या सेवेत :
  • नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गेल्या २० वर्षांतील उच्च गुणवत्ताधारक (टॉपर्स) सध्या कुठे आहेत, असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर, ‘‘त्यापैकी निम्म्याहून अधिक परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर आहेत,’’ असे मिळते.

  • कोणी न्यू यॉर्कमध्ये कर्करोगतज्ज्ञ आहे, कोणी जगप्रख्यात मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) पीएचडी फेलो आहे, कोणी हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहे, तर कोणी सिंगापूरमध्ये निधी व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ११ गुणवत्ताधारक ‘गुगल’मध्ये कार्यरत आहेत.

  • ‘सीबीएसई’ आणि ‘सीआयएससीई’ या केंद्रीय शिक्षण मंडळांनी १९९६ ते २०१५ या काळात घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांत देशात प्रथम आलेल्या ८६ विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केले. त्यातील हे निष्कर्ष आहेत.

  • निम्म्याहून अधिक उच्च गुणवत्ताधारक सध्या परदेशात वास्तव्य करीत आहेत आणि अमेरिका हे त्यांनी निवडलेले ठिकाण आहे. त्यापैकी बहुतेकजण आयआयटीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधारक आहेत. त्यांच्यापैकी निम्मे गुणवत्ताधारक हे महानगरांबाहेर वाढलेले आहेत. त्यापैकी एक अल्पसंख्यांक समाजातील आहे, परंतु त्यांत दलित आणि आदिवासींमधील एकाचाही समावेश नाही. विशेष म्हणजे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींना परदेशात जाण्याची संधी कमी मिळते.

२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी; अव्वलस्थानी असेल ‘हा’ देश :
  • भारतीय अर्थव्यवस्था ही सन २०२५ पर्यंत जगातील पाचवी तर सन २०३० मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे. या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.

  • सीईबीआरच्या अहवालात म्हटलं की, करोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकलं होतं. पण भारत २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.

  • भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९ टक्के आणि २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन २०३५ मध्ये जीडीपीची वाढ ५.८ टक्के राहिल. यादरम्यान भारत सन २०३० मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

केरळमध्ये २१ वर्षीय युवतीचा महापौरपदाचा मार्ग मोकळा :
  • केरळमध्ये तिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय युवतीची निवड झाल्यात जमा आहे, कारण नगरसेवकांच्या बैठकीत  तिचे नाव मंजूर करण्यात आले असून आता केवळ माकपच्या राज्य शाखेचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

  • आर्या यांनी सहा दिवसांपूर्वी माकपच्या नगरसेविका म्हणून शपथ घेतली.  सर्व काही सुरळीत पार पडले तर त्या महापौर होणार आहेत. अजूनही त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून आता त्या  तिरुअनंतपुरमच्या सर्वात तरुण महापौर ठरतील. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार तिरुअनंतपुरम महापालिकेत माकपची सत्ता स्थापन झाली असून पक्षाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यात आर्या राजेंद्रन यांचे नाव महापौर पदासाठी सुचवण्यात आले.

  • महाराष्ट्रात भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते.

  • आर्या राजेंद्रन यांना अभिनंदनाचे अनेक संदेश आले असून त्या मुदावनमुक्कल या भागात भाडय़ाच्या घरात राहतात. त्यांनी सांगितले, की परिपक्वता व नेतृत्व गुण हे कुणाच्या वयावरून ठरवले जात नसतात. राजकारण पुढे नेणे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे ही आपली दोन उद्दिष्टे राहतील.

२७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.