चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ एप्रिल २०२१

Date : 27 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातील करोना स्थितीवर WHO ने पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले :
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील करोना स्थितीवर भाष्य केलं आहे. भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचं म्हटलं आहे. भारतात करोना संकट गहिरं होत असतानाच जागतिक आऱोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आलं आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर यांसाठी धावपळ करावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राह दिल्ली, कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत.

  • “जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे,” अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. करोना संकटाशी सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून २६०० तज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

‘एमबीबीएस’ परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार :
  • एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे.  या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.

  • वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता या परीक्षा जून मध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, असं अमित देशमुख यांनी या अगोदर बोलून दाखवलं होतं.

  • “परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणं शक्य असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला.” असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : दीपिका, अतानूला सुवर्णपदक :
  • भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकासह आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

  • गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीतील तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले. दीपिकाचा पती अतानू याने पुरुषांच्या रिकव्र्ह प्रकाराच्या अंतिम फेरीत बाजी मारत विश्वचषकातील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. हे दोघेही आता विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी थेट पात्र ठरले आहेत.

  • तिसऱ्या मानांकित दीपिकाने अंतिम फेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित मॅकेन्झी ब्राऊन हिचा शूट-ऑफमध्ये ६-५ असा पराभव करत जेतेपद संपादन केले. दीपिकाने उपांत्य फेरीत मेक्सिकोच्या अलेक्जांड्रा व्हॅलेन्सिया हिला ७-३ असे हरवले होते.

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा - नेपोमनियाचीला जेतेपद :
  • रशियाच्या इयान नेपोमनियाची याने १३व्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वचिएर-लॅग्रेव्हविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवत कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.

  • एक फेरी शिल्लक राखत नेपोमनियाचीने ८.५ गुणांसह अग्रस्थान पटकावले. आता दुबई येथे वर्षअखेरीस होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीत तो नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर असेल.

  • नेपोमनियाचीने वचिएर-लॅग्रेव्हविरुद्ध बरोबरी पत्करल्यानंतर नेदरलँड्सच्या अनिश गिरी याला रशियाच्या अलेक्झांडर ग्रिशुककडून पराभूत व्हावे लागल्याने नेपोमनियाचीचे जेतेपद निश्चित झाले. नेपोमनियाचीने ८.५ गुण मिळवत अग्रस्थान पटकावले तर गिरीला ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या अनिश गिरीला सोमवारी चांगली कामगिरी करता आली नाही. २००२मध्ये १० वर्षांखालील गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनला मागे टाकून नेपोमनियाचीने विजेतेपद मिळवले होते. आता दोन दशकानंतर जगज्जेतेपदाचा मुकुट कार्लसनकडून हिरावून घेण्याची संधी नेपोमनियाचीला मिळणार आहे.

स्टरलाइट प्रकल्पातून केवळ प्राणवायू निर्मितीला मान्यता :
  • करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याच्या पाश्र्वभूमीवर तुतिकोरीनमधील वेदान्तच्या स्टरलाइट प्रकल्पातून चार महिन्यांसाठी प्राणवायूची निर्मिती करण्यास मान्यता देण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी तमिळनाडू सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती, तेव्हा हा प्रकल्प अंशत: सुरू करण्यास अनुमती देण्यात आली. मात्र स्टरलाइट प्रकल्पातून केवळ प्राणवायूची निर्मिती करण्यात येणार असून अन्य विभाग बंदच ठेवले जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या विरोधात हिंसक निदर्शने करण्यात आली होती आणि पोलीस गोळीबारात १३ निदर्शकांचा मृत्यू झाल्यानंतर स्टरलाइट प्रकल्प सरकारने मे २०१८ मध्ये बंद केला होता.

  • राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. त्याला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकसह अन्य पक्षांचे सदस्य हजर होते. त्या बैठकीत स्टरलाइट प्रकल्पातून केवळ प्राणवायूची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत वेदान्तने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, वेदान्तच्या स्टरलाइट उद्योगसमूहाला प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी आणि संबंधित उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठीच केवळ चार महिन्यांसाठी विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे बैठकीत मान्य करण्यात आले.

  • याला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याही स्थितीत या प्रकल्पात अन्य उत्पादन आणि सहवीज प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली जाणार नाही आणि चार महिन्यांनंतर विजेचा पुरवठा खंडित केला जाणार आहे.

दिल्लीकरांना मिळणार मोफत लस; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा :
  • देशातील करोना संकट पाहता दिल्ली सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे.

  • १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून टीकेची झोड उठवली. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो.मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचनाही केली.

२७ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.