चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ सप्टेंबर २०२०

Date : 26 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यूएफा सुपर चषक फुटबॉल - बायर्न म्युनिकला जेतेपद :
  • जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा २-१ असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

  • मोजक्या प्रेक्षकांसह रंगलेल्या या लढतीत बायर्न म्युनिकने अतिरिक्त वेळेत जेतेपद संपादन केले. मार्टिनेझने १०४व्या मिनिटाला गोल करत बायर्नच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. तब्बल सात वर्षांनंतर बायर्नने सुपर चषकाचे जेतेपद पटकावले.

  • डेव्हिड अलाबाने मारलेला फटका सेव्हियाचा गोलरक्षक यासिन बोऊनोऊ याने परतवून लावल्यानंतर मार्टिनेझने परतीच्या फटक्यावर गोल लगावला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.

  • युरोपा लीग विजेत्या सेव्हियाने सुरुवातीलाच सामन्यात आघाडी घेतली होती. डेव्हिड अलाबाच्या चुकीमुळे १३व्या मिनिटाला सेव्हियाला पेनल्टी-किक मिळाली होती. त्यावर लुकास ओकाम्पोस याने कोणतीही चूक न करता सेव्हियाचे खाते खोलले होते. त्यानंतर ३४व्या मिनिटाला लेऑन गोरेट्झका याच्या गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने बरोबरी साधली.

UN मध्ये भाषणादरम्यान इम्रान खान यांचे आरोप; भारतानं केलं बॉयकॉट :
  • जगभरात सध्या करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी संयुक्त राष्ट्राच्या महासभेचं आयोजन व्हर्च्युअल पद्धतीनं करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संबोधित केलं.

  • ज्यावेळी इम्रान खान यांनी संबोधित करण्यास सुरूवात केली त्यावेळी संयुक्त राष्ट्राच्या असेंबली हॉलमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय प्रतिनिधींनी वॉकआउट केलं. यादरम्यान इम्रान खान यांनी भारतावर आरोपही केले.

  • संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात इम्रान खान यांनीदेखील संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतावर अनेक आरोप केले. यावेळी त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यानंतर काश्मीरच्या मुद्द्यावर भारतावर आरोप केले.

  • पाकिस्तान आणि पाकिस्तानची जनता आपल्या काश्मिरी बंधू भगिनींनी सुरू केलेल्या संघर्षाचं समर्थन करते आणि त्यांच्यासोबत राहण्यास कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान सरकारद्वारे कोणत्याही हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाचं खंडन करत त्यांनी याचा खोटा प्रचार सुरू असल्याचंही म्हटलं.

‘संडे टाइम्स’चे माजी संपादक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन :
  • संडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

  • ब्रिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.  नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते. ते १४ वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते.

  • २००३ मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता. काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले. प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते  सर्वात महान पत्रकार ठरले होते.

सणासुदीच्या आधीच मोदी सरकार देणार ३५ हजार कोटींचं गिफ्ट; ‘या’ गोष्टींचा असणार समावेश :
  • करोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागलं आहे. लाखो लोकं बेरोजगार झाले आहेत. या आर्थिक वर्षामध्ये भारताचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) २३.९ टक्क्यांनी पडला आहे.

  • अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत निधीपासून पंतप्रधान गरीब कल्याण निधीपर्यंतची घोषणा केली. मात्र याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. याचमुळे आता केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वित्तीय उत्तेजन निधीची (Fiscal Stimulus Package) घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

  • मोदी सरकार या वित्तीय उत्तेजन निधीची घोषणा दसऱ्याच्या आधीच करणार आहे. हा निधी (पॅकेज) आत्मनिर्भर भारत आणि पीएम गरीब कल्याण योजनेच्या निधीपेक्षाही अधिक असणार आहे. या विषयाशी संबंधित एका विरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकार ३५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करु शकते.

  • शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करुन देणे हा या पॅकेजचा मुख्य उद्देश असणार आहे, असंही या अधिकाऱ्याने मनी कंट्रोलशी बोलताना सांगितलं.

ऑक्टोबरपासून सुरु होणार मेड इन इंडिया ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी :
  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी जाहीर केले.

  • “ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सी’न लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होईल” अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

  • भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती केली आहे. दरम्यान काँग्रेस नेते दीपक सिंह यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले व उत्तर प्रदेशात करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची विनंती केली.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, उत्तर प्रदेशात ६१,६९८ करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तीन लाख दोन हजार ६८९ रुग्ण करोनानुक्त झाले आहेत, तर ५,२९९ मृत्यू झाले आहेत.

२६ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.