इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार असून अनुक्रमे आरपीएसजी समूह आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी विक्रमी बोली लावत या संघांचे मालकी हक्क प्राप्त केले.
‘आयपीएल’मधील नव्या संघांवर मिळून १० हजार कोटी रुपयांपर्यंतची बोली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात आरपीएसजी आणि सीव्हीसी यांनी मिळून तब्बल १२,७१५ कोटी रुपये (साधारण १.७ बिलियन डॉलर) खर्ची करत दोन नवे संघ खरेदी केले. या संघांची लिलाव प्रक्रिया सोमवारी पार पडली.
संजीव गोएंका यांच्या आरपीएसजी समूहाने तब्बल ७,०९० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत लखनऊ संघाची मालकी मिळवली. तसेच सीव्हीसी कॅपिटलने ५,६२५ कोटी रुपयांच्या बोलीसह दुसऱ्या संघाची मालकी मिळवताना घरचे मैदान म्हणून अहमदाबादला पसंती दिली.
दुबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात एकूण १० समूहांनी संघांच्या खरेदीसाठी आपली दावेदारी सांगितली. इंग्लंडमधील फुटबॉल संघ मँचेस्टर युनायटेडच्या मालकांसह अदानी समूहानेही या संघांसाठी बोली नोंदवली. लिलावात भाग घेतलेल्या समूहांना अहमदाबाद, लखनऊ, कटक, धरमशाला, गुवाहाटी आणि इंदूर यांच्यापैकी एका शहराची निवड करण्याची मुभा देण्यात आली होती.
इंधनदरात झालेली भरमसाट वाढ, टायरसह गाडय़ांच्या सुटय़ा भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटीच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महामंडळाने सोमवारी मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली.
महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना भाडेवाढ लागू होईल. ही वाढ किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत आहे.
भाडेवाढीमुळे दादर ते स्वारगेट शिवनेरीचे तिकीट दर ४५० रुपयांवरून ५२५ रुपये झाले आहे. मुंबई ते दापोली साध्या बसचे दर २९० रुपयांवरून ३४० रुपये, मुंबई ते विजयदुर्गपर्यंत साध्या बसच्या दरात १०५ रुपयांनी वाढ असून, आता ७३० रुपये मोजावे लागतील. मुंबई ते औरंगाबाद साध्या बसचा प्रवासही १२० रुपयांनी महागला असून ७४० रुपयांवरून तिकीट ८६० रुपये झाले आहे.
गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. वाढत्या इंधनदराचा बोजा सहन करत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. मात्र, महामंडळाच्या तिजोरीवर त्याचा परिणाम जाणवू लागल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी बहुतेक परदेशी राष्ट्रीय हवाई प्रवाशांसाठी नवीन लसीची आवश्यकता लादण्याच्या आणि चीन, भारत आणि युरोपमधील बर्याच भागांवरील गंभीर प्रवास निर्बंध उठवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली, असे व्हाईट हाऊसने सांगितले. कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी २०२० च्या सुरुवातीला अमेरिकेकडून प्रवासी निर्बंध प्रथम लादण्यात आले होते. यावेळी ब्रिटनसह युरोपातल्या २६ देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या विदेशी नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला होता.
“कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान पूर्वी लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणे आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी प्रामुख्याने लसीकरणावर अवलंबून असलेले हवाई प्रवास धोरण स्वीकारणे हे युनायटेड स्टेट्सच्या हिताचे आहे”, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले.
व्हाईट हाऊसने पुष्टी केली की काही वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांप्रमाणेच १८ वर्षाखालील मुलांना नव्या लसीकरणाच्या आवश्यकतांमधून सूट देण्यात आली आहे.
लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी निमंत्रक प्रमुख कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, सह कार्यवाहक मुकंद कुलकर्णी, कार्यवाह प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, सह कार्यवाह किरण समेळ, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, अमोल जोशी आदी उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियात मुलांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाइन जाहिरातींना आळा घालण्यासाठी यापुढे फेसबुकसारख्या समाजमाध्यमांना त्यांची सेवा १६ वर्षांखालील मुलांना उपलब्ध करून देण्याआधी या मुलांच्या पालकांची संमती घेणे आवश्यक ठरणार आहे. तशा कायद्याचा मसुदा सोमवारी ऑस्ट्रेलिया सरकारने जाहीर केला. या अटीची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीस १० दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण विधेयकामुळे नागरिकांना ऑनलाइन माध्यमांत संरक्षण मिळणार असूून व्यक्तिगततेचे कायदे डिजिटल युगाशी सुसंगत केले जात असल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात सेवा पुरविणाऱ्या समाजमाध्यम व्यासपीठांना या बंधनकारक संहितेनुसार त्यांच्या वापरकर्त्यांची वयोमानानुसार नोंद ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी लागेल.
अशी नोंद ठेवणे समाजमाध्यम सेवा, डाटा ब्रोकर आणि अन्य मोठय़ा ऑनलाइन व्यासपीठांसाठी अनिवार्य असणार आहे. याशिवाय या सेवा पुरवठादारांना वापरकर्त्यां मुलांच्या वैयक्तिक माहितीचा वापर हा मुख्यत: या मुलांच्या हितासाठीच केला जाईल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
फेसबुकचे उत्पादन व्यवस्थापक फ्रान्सिस ह्य़ुगेन यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, ज्या ज्या वेळी जनहित आणि कंपनीचे हित यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येईल, त्या वेळी आम्ही कंपनीच्या हिताला प्राधान्य देऊ. त्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या या मसुद्याकडे पाहिले जात आहे.
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये भयंकर संकट आलं आहे. आधिच अफगाणिस्तान आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानात भूक आणि बेरोजगारीच्या समस्येचं मोठं आव्हान बनलं आहे. अफगाणिस्तानमधील २२ दशलक्षहून अधिक लोकांना या हिवाळ्यात तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागेल, असा इशाला संयुक्त राष्ट्राने दिला आहे.
या हिवाळ्यात, लाखो अफगाणींना स्थलांतर आणि उपासमार यापैकी एक पर्याय निवडण्यास भाग पाडले जाईल, असे वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हिड बीस्ले यांनी सांगितले. अशा परिस्थितीत, जीवन रक्षण सहाय्य वाढवण्याची गरज भासणार आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या अधिकाऱ्यांच्या मते, येमेन किंवा सीरियापेक्षा हे संकट मोठ्या प्रमाणावर आहे.
अफगाणिस्तानला आता जगातील सर्वात वाईट मानवतावादी संकटाचा धोका आहे. देशातील अन्नसुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. देश उध्वस्त होण्याच्या काउंटडाउनवर आहे आणि जर आत्ताचं कारवाई केली नाही तर अफगाणिस्तानला मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागेल, असे डेव्हिड बीस्ले यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
केरळमधील एका फेसबुक संशोधकाने तयार केलेल्या खात्यावर त्याला दोन वर्षांपूर्वी अनेक द्वेषमूलक संदेश व गैरमाहितीचा सामना आज्ञावली आधारित अलगॉरिदमिक शिफारशींमुळे करावा लागला होता. त्यामुळे आता फेसबुकला त्यांच्या भारतातील शिफारस प्रणालीचा सखोल व गंभीर विचार करावा लागणार आहे.
फेसबुकनेच या घटनेची माहिती दिली असून सुधारणा करण्याचा संकेत दिला आहे.
दी इंडियन एक्स्प्रेसने अमेरिकेतील दी न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तावर काही प्रश्न फेसबुककडे उपस्थित केले होते. त्यात समाजमाध्यमांचा भारतात होणारा परिणाम, विशेष करून २०१९ मधील लोकसभा निवडणुकांशी संबंधित व नंतरच्या काळातील परिणामांचा उल्लेख केला होता.
फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की एक चाचणी खाते या फेसबुक संशोधकाने सुरू केले होते, त्यात ज्या शिफारशी फेसबुककडून करण्यात आल्या त्यात व्देषमूलक भाषेतील आशयाचा समावेश होता. आता त्याची दखल घेऊन फेसबुक त्यांच्या शिफारस यंत्रणेत काही बदल करणार असून काही राजकीय गट, नागरी गट तसेच द्वेषमूलक या गटात मोडणारा आशय शिफारस प्रणालीतून काढून टाकणार आहे. यानंतर फेसबुकमध्ये कठोर छाननी लावून बदल केले जाणार आहेत. द्वेषमूलक आशय काढून टाकण्याचे आमचे प्रयत्न नेहमीच चालू राहणार आहेत. त्यामुळे अजून चार भारतीय भाषात असे आशय वर्गीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.