चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ नोव्हेंबर २०२२

Date : 26 November, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील नऊ दिगज्जांचा सन्मान :
  • संगीत नाटक अकादमीने गेल्या तीन वर्षांचे (२०१९, २०२० आणि २०२१) पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. त्यांत महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांचा समावेश आहे. अकादमीने देशभरातील ७५ कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’ही जाहीर केला आहे. वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांत महाराष्ट्रातील  सहा कलाकारांचा समावेश आहे. 

  • अकादमीच्या पुरस्कारविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मालिनी राजुरकर (सहअध्यायी), आरती अंकलीकर-टिकेकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), प्रशांत दामले (अभिनय), उदय भवाळकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), शमा भाटे (नृत्य), पांडुरंग घोटकर (लोकसंगीत), माजिद गुलाबसाहेब सतारमेकर (वाद्यनिर्माण), नंदकिशोर कपोते (समग्र योगदान), मीना नायक (कळसूत्री बाहुल्या) यांचा समावेश आहे.

  • ‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’विजेत्यांमध्ये वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या सहा मराठी कलाकारांचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांचा या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे.

  • या कलाकारांत आंध्र प्रदेशातील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन आणि महाराष्ट्रातील सहा कलाकारांचा यात समावेश आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश व पंजाबमधून प्रत्येकी तीन कलाकारांची निवड करण्यात आली आहे. बिहार, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि मणिपूरमधील प्रत्येकी चार, तर कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू व केरळमधील प्रत्येकी पाच कलाकारांचा समावेश आहे.ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही गुरुजनांकडून मिळालेली विद्या, परमेश्वरी कृपा आणि आई-वडिलांच्या कष्टाला मिळालेली दाद आहे. त्यामध्ये माझी मेहनत निमित्तमात्र आहे. श्रोत्यांची वेळोवेळी मिळालेली दाद यामुळे मी घडले. त्यामुळे हा पुरस्कार श्रोत्यांचाच आहे.

१५ वर्षांपेक्षा जुनी सरकारी वाहनं भंगारात जाणार, नितीन गडकरींची घोषणा :
  • रस्त्यावर धावणारी १५ वर्षे जुनी सर्व सरकारी वाहने मोडीत काढावी लागणार असून त्यासाठी स्क्रॅपिंग युनिट लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या संदर्भात सर्व राज्यांना निर्देश देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  • नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी - भारत सरकारची किंवा भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व सरकारी वाहने १५ वर्षांनंतर मोडीत काढावी लागणार आहेत. १५ वर्ष जुने कोणतेही सरकारी वाहन रस्त्यावर धावू शकणार नाही. यासंदर्भातील निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले असून या गाड्या मोडीत काढण्यासाठी लवकरच स्क्रॅपिंग युनिट लावण्यात येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. तसेच सर्व राज्यांनी त्यांच्या डेपोमधील १५ वर्ष जुन्या बस, ट्रक आणि इतर वाहनेसुद्धा मोडीत काढावी, असेही ते म्हणाले.

  • दरम्यान यापूर्वी सरकारने दिल्ली आणि एनसीआरमधील १० वर्ष जुन्या डिझेल आणि १५ वर्ष जुन्या पेट्रोलवरील वाहनांवर बंदी घातली घालण्याचा निर्णय घेतला होता.

शौर्याचा इतिहास लपवल्याच्या चुकीची दुरुस्ती -मोदी :
  • भारताचा इतिहास गुलामीचा नव्हे तर, योद्धय़ांचा, त्यांच्या शौर्याचा, विजयाचा आहे. देशाचा इतिहास अत्याचारी राज्यकर्त्यांविरोधातील अभूतपूर्व पराक्रमांचा आहे. पण, हा वीरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला. आता ही चूक दुरुस्त केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मुघलांविरोधात लढलेल्या आसाममधील अहोम साम्राज्याचे सेनापती लाचित बरफुकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्या वेळी मोदी बोलत होते

  • भारताचा इतिहास यशाचा, युद्धाचा, त्यागाचा, वीरता, बलिदानाचा, महान परंपरांचा आहे. पण, स्वातंत्र्यानंतरही आपल्याला गुलामीच्या काळात मुद्दामहून रचलेला इतिहास शिकवला गेला. लाचित बरफुकन यांचे शौर्य महत्त्वाचे नाही का? आसामच्या लोकांनी मुघलांच्या अत्याचाराविरोधात दिलेला लढा महत्त्वाचा नाही का, असा प्रश्न उपस्थित करत मोदींनी डाव्या विचारांच्या इतिहासकारांवर तीव्र टीका केली.  छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे ‘जाणता राजा’ हे  महानाटय़ अत्यंत प्रभावी आहे. दीडशे-दोनशे कलाकारांचा संच, हत्ती-घोडे यांचाही महानाटय़ात समावेश असतो. लाचन बरफुकन यांच्या आयुष्यावरही असेच महानाटय़ निर्माण करून देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे नाटय़प्रयोग झाले पाहिजेत, अशी सूचनाही मोदींनी केली.

  • गेले वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या बरफुकन यांच्या चौथ्या शतकमहोत्सवी जयंती महोत्सवाचा समारोप होत असून त्यानिमित्त दिल्लीत तीन दिवस कार्यक्रम होत आहेत. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयंती समारंभ आयोजित केला होता. ‘इतिहासकारांनी भारताचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला असे मी नेहमी ऐकतो पण, आता इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे आणि पुनर्लेखनापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही’, या मताचा शहा यांनी पुनरुच्चार केला.

यजमान कतारचा सलग दुसरा पराभव; सेनेगलचा विजय :
  • यजमान कतारला शुक्रवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अ-गटातील या सामन्यात आफ्रिकन चषक विजेत्या सेनेगलने कतारचा ३-१ असा पराभव केला. कतारला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गोलखाते उघडण्यात यश आल्याचाच दिलासा मिळाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंनी स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या दृष्टिने प्रयत्न केले. कमालीच्या वेगाने चाली रचून एकमेकांच्या बचाव फळीवर दडपण आणण्याचे त्यांचे तंत्र होते. या नादात अनेकदा खेळाडूंकडून चुका झाल्याचे पाहायला मिळाले. 

  • पूर्वार्धात ४१व्या मिनिटाला सेनेगलने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. बचाव फळीकडून झालेली चूक कतारला चांगलीच महागात पडली. चेंडूला पास देताना बचाव फळीचा अंदाज चुकला आणि याचा फायदा उठवत बुलाये डियाने सेनेगलचे खाते उघडले. त्यापूर्वी डियाला कतारच्या अफिफला धोकादायक पद्धतीने अडवण्याच्या नादात पिवळे कार्ड मिळाले होते. 

  • सेनेगलकडे मध्यंतराला १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच फमारा डिएधिओयूने जबरदस्त हेडर मारून गोल करत सेनेगलची आघाडी वाढवली. उत्तरार्धात बदली खेळाडूंचा बोलबाला राहिला. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मोहम्मद मुन्तारीने (७८व्या मिनिटाला) कतारसाठी विश्वचषक स्पर्धातील पहिला गोल केला. मात्र, त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले. ८४व्या मिनिटाला सेनेगलचा बदली खेळाडू बाम्बा डिएंगने सॅब्ली-एन्डीआयेची चाल सार्थकी लावताना सेनेगलचा तिसरा गोल केला.

२६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.