चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ नोव्हेंबर २०२१

Date : 26 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत :
  • इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतीय क्रीडापटूंसाठी लाभदायी ठरला. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, अनुभवी बी. साईप्रणीत आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठून जेतेपदाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली.

  • महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूने जर्मनीच्या योन ली हिला २१-१२, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. पुढील फेरीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्याशी मुकाबला होईल.

  • पुरुष एकेरीत साईप्रणीतने बल्गेरियाच्या ख्रिस्टो पोपोव्हवर २१-१७, १४-२१, २१-१९ अशी मात केली. साईप्रणीतची पुढील फेरीत किदम्बी श्रीकांत किंवा डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनशी गाठ पडेल.

  • पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित सात्त्विक-चिराग यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या कँग मिन्युक आणि सिओ सँगल यांना २१-१५, १९-२१, २३-२१ असे रोमहर्षक लढतीत नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यापुढे नूर इजुद्दीन आणि गोह से फेई या मलेशियन जोडीचे आव्हान असेल.

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून :
  • राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यानुसार ग्रामीण भागांतील पहिली ते चौथी आणि शहरी भागांतील पहिली ते सातवीचे वर्ग जवळपास पावणेदोन वर्षांनी १ डिसेंबरपासून गजबजणार आहेत.

  • करोना प्रादुर्भाव ओसरल्याने राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या. करोना रुग्णआलेखातील घसरण कायम असल्याने पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोरकसपणे मांडण्यात येत होती. त्यानुसार ग्रामीण भागांतील पहिली ते चौथी आणि शहरी भागांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने सुरू केला होता.

  • करोना नियंत्रणासंदर्भातील लहान मुलांसाठीचा तज्ज्ञ डॉक्टरांचा कृती गट, आरोग्य विभाग यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचे आणि मुख्य सचिवांचे अभिप्राय घेऊन हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता.

  • लहान मुले गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून शाळेत गेलेली नाहीत. ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते. मुलांची सुरक्षा, शिक्षण आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्यासाठी पुरेशी तयारी करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील, असे गायकवाड यांनी सांगितले.

‘तो’ पुन्हा आलाय; दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट :
  • भारतात करोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने देशवासियांना आत्ता कुठे दिलासा मिळत असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

  • करोनाचा एका नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला हा नवा व्हेरिएंट आढळला आहे.

  • दक्षिण आफ्रिकेतील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. “दुर्दैवाने आम्हाला करोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या करोना संक्रमणाचे कारण आहे.”

  • ओलिवेरा अधिक पुढे म्हणाले की, हा व्हेरिएंट B.1.1.1529 या नावाने ओळखला जातो. या विषाणूचे बोटस्वानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेत ६ तर हाँगकाँगमध्ये १ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारही सावध झालं असून आरोग्य मंत्रालयाने बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांच्या किंवा त्या मार्गे इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.

आर्थिक दुर्बल घटकाच्या उत्पन्न मर्यादेचा फेरविचार ; केंद्राचा निर्णय; ‘नीट’ समुपदेशन प्रक्रिया लांबणीवर :
  • पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या ‘नीट’ प्रवेश प्रकियेतील आर्थिक दुर्बल घटकाच्या (ईडब्ल्यूएस)आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

  • ‘ईडब्ल्यूएस’च्या उत्पन्न निकष निश्चितीसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. सूर्यकांत आणि न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाला सांगितले. या समितीस चार आठवडय़ांचा अवधी लागणार असल्याने ‘नीट’ समुपदेशन प्रक्रियाही चार आठवडे लांबणीवर जाणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले.

  • वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याबाबतच्या केंद्र व वैद्यकीय समुपदेशन समितीच्या २९ जुलैच्या नोटिशीविरोधातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय योग्य असून, सर्व राज्यांना त्यास पाठबळ द्यायला हवे, असे न्या. सुर्यकांत यांनी नमूद केले. मात्र, या घटकांसाठी निकषनिश्चिती योग्य पद्धतीने व्हायला हवी, असे नमूद करत न्यायालयाने या प्रवर्गासाठी आठ लाख या उत्पन्नमर्यादेचा फेरविचार करण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. या प्रकरणात आतापर्यंत बराच कालापव्यय झाल्याने सरकारने ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण पुढील वर्षांपासून लागू करावे आणि समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी केली.

  • मात्र, सरकारने याच शैक्षणिक वर्षांसाठी निर्णय लागू होईल, या उद्देशाने १०३ वी घटनादुरुस्ती केली असून, ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाची अंमलबजावणी लांबणीवर टाकणे योग्य होणार नाही, असे तुषार मेहता यांनी स्पष्ट केले. ही बाब न्यायालयाने मान्य केली.

देशात महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक :
  • भारतातील महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक झाली असून हे प्रमाण १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे झाले असल्याचे राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ (एनएफएचएस-५)मध्ये आढळून आले आहे. देशाच्या लोकसंख्याशास्त्रात झालेला बदल यातून प्रतिबिंबित झाला आहे.

  • ‘हे लक्षात घेता, लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) १ हजारांपलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत आला असल्याचे आपण म्हणू शकतो’ असे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग, तसेच लैंगिक भेदभाव आणि विषमता यांच्याशी लढा यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना याचे श्रेय असल्याचे ते म्हणाले.

  • जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे. यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या (पीसी अँड पीएनडीटी अ‍ॅक्ट) अंमलबजावणीसारख्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

  • २००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती :
  • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. यासंदर्भातील माहिती भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

  • संभाजीराजेंनी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भातील एक ट्विट केलं असून राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय.

  • संभाजीराजेंनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

  • तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असंही म्हटलंय.

२६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.