चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मे २०२१

Updated On : May 26, 2021 | Category : Current Affairs


करोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे - नरेंद्र मोदी :
 • करोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आाभार मानले आहेत. तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

 • बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं सांगितलं.

समजून घ्या - कोठे आणि कसं पाहणार चंद्रग्रहण, ग्रहणासंबंधित संपूर्ण माहिती :
 • वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आज (बुधवार) २६ मे रोजी होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाची घटना घडते. ग्रहण हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नसते तर त्याला धार्मिक महत्त्व देखील आहे.

 • विज्ञानाच्या मते, ग्रहण एक खगोलीय घटना आहे, जी विशेष परिस्थितीत उद्भवते. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. म्हणूनच, या काळात बरीच कामे करण्यास मनाई आहे. चंद्र ग्रहण केव्हा, कोठे, कोणत्या वेळी आणि कसे दिसेल हे समजून घेऊया.

 • चंद्रग्रहणाचा दिवस आणि वेळ : या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आज बुधवार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ या वेळेत होणार असून ते आपल्याला दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ  येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

 • नासाच्या म्हणण्यानुसार, २६ मे म्हणजे आज लोकांना आकाशात एक भिन्न दृश्य पहायला मिळेल. यात वर्षातील पहिले  चंद्रग्रहण, सुपरमून आणि तिसरे ब्लड मून असेल.

‘या’ देशात राजकीय संकट गहिरं; राष्ट्रपती, पंतप्रधान लष्कराच्या ताब्यात :
 • आफ्रिकेतील माली या देशात पुन्हा एकदा राजकीय संकट गहिरं झालं आहे. अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर लष्कराने बंडाचा पवित्रा घेतला आहे. बंडखोर लष्कराने राष्ट्रपती बाह दाव, पंतप्रधान मोक्टर यान आणि संरक्षणमंत्री सोलोमेन डोकोर यांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांना राजधानी बमाकोच्या बाहेर असलेल्या लष्करी मुख्यालयात ठेवलं आहे.

 • लष्कारातील दोन अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने लष्काराने हे बंड पुकारलं आहे. त्यामुळे असंतोषाचा वणवा भडकण्याची चिन्हं आहेत.

 • मालीमध्ये लष्कराने दुसऱ्यांदा बंडखोरी केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लष्कराने बंड पुकारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता यांना पदावरून हटवत सत्ता मिळवली होती. त्यानंतर राष्ट्रपती बाह दाव आणि पंतप्रधान मोक्टर यान यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला होता.

सुबोधकुमार जयस्वाल सीबीआय संचालकपदी :
 • ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने सोमवारी या पदासाठी सुबोधकुमार यांची निवड केली.

 • त्यांची सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. सुबोधकुमार यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले.

इमारत तयार, परवानगीची प्रतीक्षा :
 • पालघर जिल्ह्य़ाच्या नवीन मुख्यालय संकुलातील जिल्हाधिकारी  तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतींना सिडकोने भोगवटा प्रमाणपत्रही (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) दिले आहे. मात्र इमारतीचा ताबा घेण्याचे अधिकृत पत्र अद्याप सिडकोकडून न मिळाल्याने स्थलांतराची प्रक्रिया रखडली आहे.

 • राज्य शासनाच्या दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर सुमारे १०३ हेक्टरवर नवीन जिल्हा मुख्यालय संकुल उभारण्यात येत आहे. यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. तर जिल्हा परिषद कार्यालय इमारतीचे अग्निपरीक्षण तसेच भोगवटा प्रमाणपत्राचे काम शिल्लक आहे.

 • संकुलाचे काम नोव्हेंबर २०१७ मध्ये हाती घेण्यात आले होते. कार्यालय संकुल उभारणीचे काम दोन वर्षांत पूर्ण करायचे असले तरी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी आल्याने मुख्यालय उभारणीचे काम रेंगाळले. पुढे नव्याने बांधण्यात येणाऱ्या आलिशान वास्तूंमध्ये इंटिरियर अर्थात दालनातील फर्निचरचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सिडकोला त्याबदल्यात पुन्हा एकदा शासनाने जागा दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. करोनाकाळामध्ये या प्रकल्पाचे काम पुन्हा काही काळ बंद राहिले.

‘आयपीएल’चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून :
 • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येऊ शकतात, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी मंगळवारी दिली.

 • जैव-सुरक्षा परिघात राहूनही काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे ४ मे रोजी ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आली. त्यामुळे उर्वरित ३१ सामने खेळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ने अमिरातीचा पर्याय निवडल्याचे समजते.

 • ‘‘बीसीसीआयने सर्व भागधारक आणि प्रक्षेपणकर्त्यांशी केलेल्या संवादानंतर १८ ते २० सप्टेंबरपैकी कोणत्याही एका दिवशी ‘आयपीएल’ सुरू होईल. १० ऑक्टोबर किंवा त्यापूर्वीच अंतिम सामना खेळवण्यात येईल. यादरम्यान तीन आठवडे उपलब्ध असल्याने जवळपास १० दिवशी प्रत्येकी दोन सामने होतील,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. याविषयी लवकरच अंतिम घोषणा करण्यात येईल, असेही त्याने नमूद केले.

‘खेलो इंडिया’ची सात राज्यांत १४३ केंद्रे उभारणार :
 • देशाच्या पायाभूत पातळीवरील क्रीडापटूंचा मोठय़ा संख्येवर शोध घेण्याच्या हेतूने क्रीडा मंत्रालयाकडून सात राज्यांत १४३ खेलो इंडिया क्रीडा केंद्रे उभारण्यात येणार आहेत, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी जाहीर केले.

 • गेल्या काही वर्षांत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमुळे भारताला किशोर आणि कुमार गटातून असंख्य प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत. त्यामुळे या वयोगटातील खेळाडूंवर शासनाने अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र, मिझोराम, मध्य प्रदेश, मणिपूर, कर्नाटक, गोवा आणि अरुणाचल प्रदेश या सात राज्यांत ही केंद्रे बांधण्यात येणार आहेत.

 • ‘‘२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला अव्वल १० देशांत समावेश असावा, असे आम्हाला वाटते. या ध्येयप्राप्तीसाठी आतापासूनच तयारीला लागण्याची गरज आहे. त्यामुळे युवा गटातील कौशल्यवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा मंत्रालय प्रयत्नशील आहे,’’ असे रिजिजू म्हणाले.

मोहालीतील स्टेडियमला दिले जाणार दिवंगत महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे नाव :
 • मोहालीतील आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला दिवंगत माजी हॉकी खेळाडू आणि पद्मश्रीप्राप्त बलबीर सिंग सीनियर यांचे नाव दिले जाणार आहे. २५ मे रोजी बलबीर सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सन्मान त्यांना दिला जाईल.

 • पंजाब ट्रिब्यून डॉट कॉमच्या वृत्तानुसार, क्रीडा विभागाचे प्रवक्ते म्हणाले, की पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमीतसिंग सोधी यांनी मोहालीच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमच्या नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

 • तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या बलबीर सिंग सीनियरचा आतापर्यंत ऑलिम्पिक फायनचा प्रवास अजिंक्य असा आहे. बलबीर सिंग १९४८, १९५२ आणि १९५६  साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण १३ गोल केले. यातील तब्बल ९ गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे.

 • नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी ५ गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूंने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना ६-१ ने जिंकला होता.

२६ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)