चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मे २०२०

Updated On : May 26, 2020 | Category : Current Affairsगुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर :
 • देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांनी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या आहेत. गुजरातमधून ८५३ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक आहे.

 • गुजरातला ८५३ ट्रेन मिळाल्या असून महाराष्ट्रातून ५५० ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तर पंजाबमधून ३३३, उत्तर प्रदेशातून २२१ आणि दिल्लीमधून १८१ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांसाठी सर्वाधिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश (१२४५) पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे बिहार (८४६), झारखंड (१२३), मध्य प्रदेश (११२) आणि ओडिशाचा (७३) क्रमांक आहे.

 • राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे रेल्वे मंत्रालयकडून श्रमिक ट्रेन पुरवल्या जात आहेत. या ट्रेनसाठी येणारा ८५ टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकारं उचलत आहेत.

दहा सर्वाधिक करोनाबाधित देशांमध्ये भारत :
 • देशभरात करोना रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ झाली असून जगभरातील सर्वाधिक दहा करोनाबाधित देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. सलग चौथ्या दिवशीही रुग्णांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात ६,९७७ नव्या करोना रुग्णांची भर पडली.

 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ५७,७२० रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४१.५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,२८० रुग्ण बरे झाले. ७७,१०३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

 • एकूण मृत्यू ४,०२१ असून रविवारी दिवसभरात १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत अनुक्रमे ६०८८, ६६५४, ६७६७ आणि ६९७७ अशी वाढ झाली आहे. रुग्ण दुपटीचे प्रमाण १३ दिवस असून मृत्यूचा दर २.९ टक्के इतका आहे.

मधल्या आसनांवर प्रवासी बसवण्यास एअर इंडियाला परवानगी :
 • एअर इंडियाला परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना आणण्यासाठीच्या विमानांमध्ये  ६ जूनपर्यंत मधल्या आसनांवरही प्रवासी बसवू देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सरकारने हवाई वाहतूक कंपन्यांपेक्षा लोकांच्या आरोग्याची काळजी करणे महत्त्वाचे आहे असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत.

 • न्यायालयाने सांगितले की, सहा जूननंतर मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेल्या अंतरिम आदेशानुसार एअर इंडियाला त्यावेळी मात्र मधली आसने रिकामी ठेवावी लागतील. परदेशातील भारतीयांना घेऊन येण्यासाठी केल्या जाणाऱ्या उड्डाणांमध्ये दोन प्रवाशांमधील आसने रिकामी ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता त्यावर केंद्र सरकार व एअर इंडिया यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

 • सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील न्या. ए. एस. बोपन्ना, न्या. हृषीकेश रॉय यांच्या पीठाने या अपिलावर ईदची सुटी असतानाही दूरसंवादाने  घेतलेल्या सुनावणीत सांगितले की, मधल्या आसनांवर प्रवासी बसवण्यास एअर इंडियाला ६ जूनपर्यंत परवानगी देण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशात आम्ही सहसा हस्तक्षेप करीत नाही. अधिकाऱ्यांनी सामाजिक अंतर व इतर निकषांचे भान ठेवले पाहिजे. एकामेकांशेजारी प्रवासी  बसले तर त्यामुळे करोना संसर्ग वाढण्याचा धोका असतो.

एका वर्षांत दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक :
 • ऑस्ट्रेलियात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा प्रस्तावित ट्वेन्टी-२० विश्वचषक लांबणीवर टाकण्यात येणार की नाही याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

 • मात्र पुढील वर्षी भारतातही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक नियोजित आहे. या स्थितीत एकाच वर्षांत सहा महिन्यांच्या अंतराने दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषक कसा खेळवायचा हा मुख्य प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) आहे. याबाबत अर्थातच ‘आयसीसी’च्या सदस्यांचे एकमत होत नाही.

 • ‘आयसीसी’च्या आर्थिक आणि व्यापार विभागाच्या समितीची व्हिडीयोद्वारे झालेल्या बैठकीत ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी त्यासाठी उपस्थित होते. जर या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला तर सहाच महिन्यांच्या अंतराने भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक अशक्य आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

“करोनाचा दुसरा सर्वोच्च टप्पा येणं अजून बाकी”, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा :
 • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाउन हटवण्याचा निर्णय अनेक देश घेत असून जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर करोनाचा दुसरा सर्वोच्च टप्पा येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

 • जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी सांगितलं आहे की, “काही देशांमध्ये करोनाची प्रकरणं कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे ही संख्या वाढत आहे. सध्या जग करोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने ठाम राहणं गरजेचं आहे”.

 • हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ५० लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यांना इशारा देताना माइक रायन यांनी करोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका जिथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन करोनाची दुसरी लाट टाळता येईल असं ते म्हणाले आहेत.

२६ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)