चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 जानेवारी 2024

Date : 26 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताने जागतिक पातळीवरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे- नीरज चोप्रा
 • भारतीय अ‍ॅथलेटिक्सला नव्या उंचीवर पोहोचायचे झाल्यास आपण पुढील दोन-तीन वर्षांत जागतिक स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे मत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने व्यक्त केले.
 • भारत २०२९च्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी करणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताने आणखी काही छोटय़ा स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे असे नीरजला वाटते.
 • ‘‘भारताला २०२९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद मिळाले तर उत्तमच. मात्र, दरम्यानचा काळ खूप मोठा आहे. या काळात भारताने जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या काही अन्य स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे,’’ असे चोप्रा म्हणाला. ‘‘छोटय़ा स्तरावरील स्पर्धामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अ‍ॅथलेटिक्सविषयीची गोडी वाढेल. जगभरातील आघाडीचे अ‍ॅथलेटिक्सपटू भारतात आले आणि भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळले, तर ते देशाच्या अ‍ॅथलेटिक्ससाठी खूप मोठे यश असेल,’’ असे नीरज म्हणाला.

दिग्गजांची भेट..

 • नीरजला गुरुवारी स्वित्र्झलडचा २० ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीनंतर फेडररने नीरजचे कौतुक केले. ‘‘वैयक्तिक पातळीवर आणि देशासाठी नीरजने जितके यश मिळवले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे,’’ असे फेडरर म्हणाला.
सहपोलीस आयुक्तांसह निकेत कौशिक, मधुकर पांडे, दिलीप सावंत यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक गुरूवारी जाहीर झाले. त्याशिवाय मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्यासह राज्यातील ४० पोलीस जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ तर नक्षलप्रभावीत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यासह १८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदके’ जाहीर झाली आहेत. तसेच कारागृह, नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाला १६ पदके जाहीर झाले आहेत.
 • महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके जाहीर झाली असून राज्यातील १८ पोलिस जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस कमलेश नैतम, शंकर बाचलवार, मुन्शी मडवी, सुरज चौधरी, मोहन उसेंडी, देवेंद्र आत्राम, संजय वाचमी, विनोद मडवी, गुरुदेव धुर्वे, दुर्गेश मेश्राम, हिराजी नेवरे, ज्योतिराम वेलाडी, माधव मडवी, जीवन नरोटे, विजय वड्डेटवार, कैलास गेडाम यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलातील कायदा व सुव्यस्थेचे सत्यनारायण चौधरी, नागपूर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासह ४० जणांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. देशात पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील एकूण एक हजार १३२ कर्मचार्यांना शौर्य, सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पोलीस दलासाठी एकूण एक हजार ३८ पदकांचा समावेश आहे.

राज्यातील गृहरक्षक दल,नागरी संरक्षण व कारागृह विभागाला १६ पदके

 • उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण विभागात कार्यरत ७ जणांना पोलीस पदके मिळाली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रश्मी करंदीकर, नागरी संरक्षण विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय जाधव, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) राजेश्व्ररी कोरी, प्लाटून कमांडर रवींद्र चर्डे, कमांडर अरुण परिहार, गृहरक्षक दलाचे अमित तिंबाडे आणि योगेश जाधव यांचा समावेश आहे. कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगाधिकारी (अहमदनगर जिल्हा कारागृह) रुकमाजी नरोड, तुरुंगाधिकारी (तळोजा मध्यवर्ती कारागृह) सुनील पाटील, सुभेदार (मुंबई मध्यवर्ती कारागृह) बळीराम पर्वत पाटील, सुभेदार (येरवडा मध्यवर्ती कारागृह) सतीश बापूराव गुंगे, हवालदार (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह) सूर्यकांत पांडूरंग पाटील, हवालदार (येरवडा मध्यवर्ती कारागृह) नामदेव संभाजी भोसले, हवालदार (छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह) संतोष रामनाथ जगदाळे, हवालदार (येरवडा मध्यवर्ती कारागृह) नवनाथ सोपान भोसले, हवालदार (अकोला जिल्हा कारागृह) विठ्ठल श्रीराम उगले यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्वक सेवेबाबत पदक जाहीर झाले आहे.
“२०३० पर्यंत फ्रान्सच्या विद्यापीठांत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट”, प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितली योजना
 • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आले आहेत. आजच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. भारतात येताच त्यांनी मोठं लक्ष्य जाहीर केलंय. यामध्ये त्यांनी २०२३ पर्यंत फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये ३० हजार विद्यार्थी असतील, असा विश्वसा व्यक्त केला आहे.
 • भारतात येताच इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक्सवर पोस्ट केली. भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये आमंत्रित करणे ही योजना भारतासोबतचे फ्रान्सचे संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक भाग आहे, असं इमॅन्यएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. जुलै २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर त्यांनी लक्ष्य जाहीर केले होते.
 • “आम्ही सर्वांसाठी फ्रेंच, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर या उपक्रमासह सार्वजनिक शाळांमध्ये फ्रेंच शिकण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करत आहोत. आम्ही फ्रेंच शिकण्यासाठी नवीन केंद्रांसह Alliance françaises चे नेटवर्क विकसित करत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय वर्ग तयार करत आहोत. ज्या विद्द्यार्थ्यांना फ्रेंच भाषा येत नाही, त्यांना आमच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकेल”, असं मॅक्रॉन म्हणाले.
 • “फ्रान्समध्ये शिकलेल्या माजी भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुव्यवस्थित केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना फ्रान्समध्ये परतणं सोपं होईल. २०२५ पर्यंत २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना प्रथम आकर्षित करण्याचे फ्रान्सचे उद्दिष्ट असून, २०३० पर्यंत ३० हजारच्या मोठ्या उद्दिष्ट असल्याचंही मॅक्रॉन यांनी सांगितलं. “हे एक अतिशय महत्वाकांक्षी लक्ष्य आहे, परंतु मी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कटिबद्ध आहे,” मॅक्रॉन म्हणाले.
 • भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी फ्रान्स सरकारने आधीच पावले उचलली आहेत. २०१८ मध्ये त्यांनी “कॅम्पस फ्रान्स” नावाचा एक कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमातून फ्रान्समध्ये शिकण्यास इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माहिती मिळू शकेल. फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर

 • दरम्यान, भारताचा आज ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या कार्यक्रमासाठी भारताने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन काल (२५ जानेवारी) रात्री भारतात दाखल झाले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्याबरोबर जयपूर येथील जंतर मंतर या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली.
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा ऐतिहासिक सोहळा पाहिलात का? १९५० च्या आठवणींना देऊ उजाळा
 • प्रजासत्ताक दिन हा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपाला आला. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी विविध ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ७५ वा असल्याने सोहळा आणखीनच खास होणार आहे. आज याच निमित्ताने आपण, भारताच्या पहिल्या वहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या काही खास आठवणी पाहणार आहोत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले हे काही खास क्षण आपल्याला पुन्हा एकदा १९५० व्या वर्षात घेऊन जातील, अशी आशा..
 • १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ ६ मिनिटे २८ सेकंदाचा असून यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. तसंच सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहेत.
 • तर अजून एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये प्रजासत्ताक दिन कशाप्रकारे साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देताना दिसत आहेत.
प्रजासत्ताक दिन सोहळय़ानिमित्त दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था; ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात
 • प्रजासत्ताक दिन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरात ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी १४ हजार कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या सुरक्षेसाठी संचलन पथाच्या (कर्तव्य पथ) आसपास तैनात केले जातील.दिल्लीत सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांनी शुक्रवारी एक सल्लावजा सूचना जारी केली असून, त्यात दिल्लीतील या दिवशीची वाहतूक व्यवस्था आणि निर्बंधांची माहितीही दिली आहे.
 • अधिकाऱ्यांनी सांगितले, की यंदाचे संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावर येणाऱ्या सुमारे ७७ हजार निमंत्रितांसाठी व्यापक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. विशेष पोलीस आयुक्त (सुरक्षा) दीपेंद्र पाठक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व जिल्हा शाखा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने काम करत आहेत. कमांडो, शीघ्र प्रतिसाद दल, ‘पीसीआर व्हॅन’, तोडफोड विरोधी पथक आणि ‘स्वॅट’ पथके विविध मोक्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिसांनी हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठीची यंत्रणाही सज्ज केली आहे.
 • सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ानंतर दिल्लीतील संवेदनशील भागात शांतता राखली जाईल, यासाठीची उपाययोजना पोलिसांनी केली असल्याचे पाठक यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिन संचलनासाठी सुमारे ७७ हजारांवर निमंत्रित उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
व्यंकय्या नायडूंना पद्मविभूषण, राम नाईक यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी
 • केंद्र सरकारने ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमाकांचे पुरस्कार आहेत. १९५४ साली हे पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. दरवर्षी २५ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारसाठी निवड झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली जातात.
 • यावर्षीही अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत ३० महिलांचा समावेश आहे. एकूण १३२ पैकी महाराष्ट्रातील १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सनदी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहेत. पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आणि एकूण महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी पाहू.

पद्मविभूषण (एकूण पाच)

 • वैजयंतीमाला बाली (कला / तमिळनाडू)
 • के. चिरंजीवी (कला / आंध्र प्रदेश)
 • एम. व्यंकय्या नायडू (राजकीय नेते / आंध्र प्रदेश)
 • बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (समाजसेवा / बिहार)
 • पी. सुब्रह्मण्यम (कला / तमिळनाडू)

पद्मभूषण (एकूण २२ / महाराष्ट्रातील ६)

 • हॉर्मुसजी एन. कामा (साहित्य व पत्रकारिता / महाराष्ट्र)
 • अश्विन बालचंद मेहता (मेडिसीन / महाराष्ट्र)
 • राम नाईक (सार्वजनिक व्यवहार / महाराष्ट्र)
 • दत्तात्रय अंबादास राजदत्त (कला / महाराष्ट्र)
 • प्यारेलाल शर्मा (कला / महाराष्ट्र)
 • कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता / महाराष्ट्र)

पद्मश्री (एकूण ११० / महाराष्ट्रातील ६)

 • उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा / महाराष्ट्र)
 • मनोहर डोळे (औषध / महाराष्ट्र)
 • झाकीर आय काझी (साहित्य व शिक्षण / महाराष्ट्र)
 • चंद्रशेखर मेश्राम (औषध / महाराष्ट्र)
 • कल्पना मोरपारिया (व्यापार व उद्योग / महाराष्ट्र)
 • शंकर बाबा पापळकर (समाज सेवा / महाराष्ट्र)

 

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय :
 • लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अ‍ॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

 • या अ‍ॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता. आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.

 • माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा गोळा करणं, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यांची उत्तर देण्यात कंपन्या असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री :
 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत २९ महिलांचा समावेश आहे.

 • सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, लोककलावंत परशुराम गंगावणे यांना कलाक्षेत्रातील आणि जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. पंजाबमधील उद्योजिका रजनी बेक्टर यांना पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला.

 • जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 • आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला.

देशाच्या सुरक्षेची सज्जता, शेतकऱ्यांच्या हिताची राष्ट्रपतींकडून ग्वाही :
 • भारत शांततेसाठी कटिबद्ध असला तरी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशाची सशस्त्र दले सुनियोजित पद्धतीने पुरेशी सुसज्ज आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चीनने लडाखमध्ये गेल्या वर्षी घेतलेल्या विस्तारवादी भूमिकेच्या अनुषंगाने सोमवारी येथे स्पष्ट केले.

 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येवर देशाला संबोधित करताना कोविंद यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन, कोविड-१९शी लढण्यासाठी देशाने केलेले प्रयत्न, आत्मनिर्भर भारत आदी मुद्दय़ांनाही स्पर्श केला.

 • कोणत्याही परिस्थितीत देशाच्या हिताचे रक्षण केले जाईल, असे स्पष्ट करतानाच कोविंद यांनी, तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. सुधारणांच्या मार्गावर सुरुवातीला गैरसमज होतील; परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधील आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

 • देशातील जनतेने बंधुत्वाच्या घटनात्मक मूल्यांची जोपासना केली, त्याविना कोविड-१९ शी परिणामकारक लढा देणे शक्य नव्हते. जगभर फैलाव झालेल्या करोनाचा मुकाबला करण्यासाठी भारताने अनेक देशांना औषधांचा पुरवठा केला आणि त्यामुळे भारत जगभराचे औषधालय बनला याचाही कोविंद यांनी अभिमानाने उल्लेख केला.

 • गेल्या जून महिन्यात पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले, त्यांना आदरांजली वाहताना कोविंद म्हणाले की, सरलेले वर्ष अनेक आघाडय़ांवर प्रतिकूल होते. सीमेवर विस्तारवादी भूमिकेचा सामना करावा लागला, परंतु आपल्या शूर जवानांनी तो हाणून पाडला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २० जवान शहीद झाले.

विशेष सेवेसाठी राज्यातील ५७ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले ‘राष्ट्रपती पोलीस पदक :
 • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

 • “शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

 • तसेच, “पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत त्यांनी पदक मिळवणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन देखील केलं आहे.

राष्ट्रीय बाल पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर :
 • शौर्य, संशोधन, कला, ज्ञानार्जन, क्रीडा या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारावर राज्यातील मुलांनी मोहोर उमटवली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने देशभरातील ३२ मुलांना हा पुरस्कार जाहीर केला असून त्यातील पाच मुले राज्यातील आहेत.

 • ‘महाराष्ट्राची माती ही गुणांची खाण आहे हेच या मुलांनी सिद्ध केले आहे. लढवय्येपणा, शौर्य यात महाराष्ट्र मागे हटत नाही. क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राने कायमच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर संशोधन, नवनिर्माण यांतही नवी पिढी उमेदीने पुढे जात आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुक केले आहे.

 • नागपूर  येथील बाल नवसंशोधक श्रीनभ अग्रवाल याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शेतात ‘येलो मोजॅक विषाणू’ने  पिकांचे मोठे नुकसान होते.‘येलो मोजॅक विषाणू’चा नाश करू शकणारा यशस्वी प्रयोग त्याने केला.

कसोटी मालिकेत इंग्लंडचे निर्भेळ यश :
 • भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध करताना इंग्लंडने श्रीलंकेला दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सहा गडी राखून धूळ चारली आणि मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.

 • चौथ्या दिवशी जॅक लीच आणि डॉमिनिक बेस या फिरकीपटूंनी प्रत्येकी चार बळी मिळवून श्रीलंकेचा दुसरा डाव १२६ धावांतच गुंडाळल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळाले.

 • कर्णधार जो रूट या डावात अपयशी ठरला असला तरी, सलामीवीर डॉम सिब्ले (नाबाद ५६) आणि यष्टीरक्षक जोस बटलर (नाबाद ४६) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचून इंग्लंडचा विजय साकारला. पहिल्या डावात १८६ धावांची खेळी साकारणारा रूट सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

26 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.