चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 फेब्रुवारी 2024

Date : 26 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गोपीने मॅरेथॉन जिंकली, पण ऑलिम्पिक पात्रतेपासून दूरच
  • मॅरेथॉनमधील माजी आशियाई विजेता गोपी थोनाकलने रविवारी अपेक्षितपणे दिल्ली मॅरेथॉन जिंकली. पण, तो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेपासून मोठय़ा फरकाने दूरच राहिला.गोपीने २०१७ मध्ये आशियाई मॅरेथॉन जिंकली होती. त्यानंतर आता दिल्ली मॅरेथॉन जिंकताना गोपीने २ तास १४ मिनिटे ४० सेकंद अशी वेळ दिली. मात्र, तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी निश्चित करण्यात आलेली २ तास ८ मिनिट १० सेकंद ही पात्रता वेळ गाठू शकला नाही.
  • गोपीने यापूर्वी २०१७ मध्येदेखील ही शर्यत जिंकली होती. त्या वेळेस त्याने २ तास १३ मिनिट ३९ सेकंद ही आपली वयैक्तिक सर्वोत्तम वेळ दिली होती. या दोन्ही विजयात त्याची धाव राष्ट्रीय विक्रमाच्या तुलनेत संथच राहिली. त्यामुळे शिवनाथ सिंहचा १९७८ मध्ये नोंदवलेला २ तास १२ मिनिटाचा राष्ट्रीय विक्रम आबाधित राहिला. तीन वर्षांप्रू्वी विजेतेपद मिळवणारा श्रीनु बुगाथा (२तास १४ मिनिट ४१ सेकंद) दुसऱ्या, तर अक्षय सैनी (२ तास १५ मिनिट २७ सेकंद) तिसऱ्या स्थानावर राहिला.
  • शर्यतीच्या पूर्व संध्येलाच गोपीने पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा पात्रता निकष गाठणे भारतीय धावपटूच्या आवाक्यात नसल्याचे मत मांडले होते. ते शर्यतीनंतर खरे ठरले. महिला विभागात आश्विनी जाधवने २ तास ५२ मिनिट २५ सेकंद वेळ देताना विजेतेपद पटकावले. निरंबन भारतजी दुसरी, तर दिव्यांका चौधरी तिसरी आली.
‘सामाजिक न्याय’ परीक्षेला मुहूर्त कधी? तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत
  • तब्बल बारा वर्षांनी पदभरती होणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील ८१ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) जाहिरात देण्यात आली. यासाठी राज्यातील लाखो उमेदवारांनी अर्जही केले. मात्र, दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही आयोगाकडून सामाजिक न्याय विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी  आणि पालक चिंतेत आहे.   
  • ‘एमपीएससी’कडून साहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या गट अ, ब आणि गृहप्रमुख गट ब या पदांच्या ८१ रिक्त जागांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली होती. तब्बल १२ वर्षांनी या विभागातील रिक्त पदांसाठी नोकरभरती होत आहे. ५ ते १५ जून २०२३ या दरम्यान परीक्षेच्या अर्जाची मुदत होती. या वेळी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी पदभरतीसाठीही अर्ज केले. यासाठी आवश्यक शुल्कही भरले आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयोगाकडून परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दहा महिने उलटूनही आयोगाकडून सामाजिक न्याय विभागातील पदांच्या परीक्षेबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही.
  • विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याने ते एमपीएससीच्या मदत केंद्रावर संपर्क  करीत आहेत. परंतु, येथूनही त्यांना कुठलाही दिलासा मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागात आधीच अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आहे. त्यामुळे या विभागात पदभरती होणे आवश्यक आहे. मात्र, ‘एमपीएससी’कडून परीक्षेसंदर्भात कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. परीक्षेसंदर्भात एमपीएससीच्या सचिवांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
  • ‘एमपीएससी’ने सप्टेंबर महिन्यात समाजकल्याण अधिकारी पदासाठी अभ्यासक्रम जाहीर केला. मात्र, अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे. आयोगाने तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर करावी.
पोलिसांच्या रजेचे रोखीकरण २४ तासांत पुन्हा सुरु!
  • पोलिसांना वर्षभरात लागू असलेल्या १५ दिवसांच्या अतिरिक्त रजेचे रोखीकरण रद्द करण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला. पण ओरड होताच तो निर्णय तात्काळ रद्दही केला. एकीकडे पोलिसांना रजा घेण्याचे बंधन असताना रजेचे रोखीकरण रोखण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता आणि तो तात्काळ रद्द का करण्यात आला, याची चर्चा आता पोलीस दलात सुरु झाली आहे.
  • राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी परिपत्रक जारी करून सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिसांनी जाहीर सत्कार सोहळे स्वीकारून त्याच्या ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यावर बंधने आणली आहेत. असे सत्कार स्वीकारणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हे परिपत्रक ताजे असतानाच पोलिसांना लागू असलेल्या १५ दिवसांच्या अतिरिक्त रजेचे रोखीकरण रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी झाल्यामुळे पोलीस संतापले.
  • शासनाने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले होते की, सातव्या वेतन आयोगानुसार पोलीस कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरीव वाढ झालेली आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप आणि ताण विचारात घेऊन २० दिवसांच्या नैमित्तिक रजा आणि १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीसह मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र या पद्धतीत आता बदल करण्यात येत असून पोलीस शिपाई ते निरीक्षक यांना दरवर्षी १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा अनुज्ञेय असेल. परंतु रजेचे रोखीकरण रद्द करण्यात येत आहे. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना फक्त आठ दिवसांची नैमित्तिक रजा आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  • मात्र हा शासन निर्णय जारी झाल्यामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता पसरली. मुळात आम्हाला साप्ताहिक सुट्टीही वेळेवर मिळत नाही वा रद्द होते, अशा वेळी १५ दिवसांची रजा कोण देणार? परंतु रोखीकरणाची सवलत असल्यामुळे आम्हाला आर्थिक लाभ तरी होत होता. परंतु तोही शासनाने बंद केल्याबद्दल तीव्र निषेध करण्यात आला. परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी या निर्णय रद्द करण्यात आल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु रोखीकरण रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याची चर्चा आता सुरु झाली आहे.
स्कूबा डायव्हिंग करत नरेंद्र मोदींनी घेतलं ‘प्राचीन द्वारके’चं दर्शन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील पंचकुई सागरकिनाऱ्यालगत ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, खोल समुद्रातील प्राचीन द्वारकेचे दर्शन घेणे हा आपल्यासाठी अत्यंत दिव्य अनुभव होता.पांढरे ‘डायव्हिंग हेल्मेट’ आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या नौदलाच्या पाणबुड्या जवानांच्या मदतीने सागरी पृष्ठभागी प्रार्थनेसाठी हात जोडून, मांडी घालत भगवान कृष्णाला अर्पण करण्यापूर्वी मोराची पिसांनी उपस्थितांनी अभिवादन केले. पाण्यातून डुबकी मारून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी म्हणाले की, यामागे माझ्या धाडसापेक्षाही श्रद्धेचा भाग जास्त होता.
  • याबद्दल आपला अनुभव सांगताना मोदी म्हणाले की, ‘‘जेव्हा आपण या प्राचीन शहराच्या अवशेषांना स्पर्श करत होतो, तेव्हा २१ व्या शतकातील भव्य भारताचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर तरळले आणि मी बराच काळ पाण्याखाली रेंगाळलो. सागरातील द्वारकेच्या दर्शनाने विकसित भारताचा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे’’.
  • द्वारका येथे अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘‘देशाऐवजी एकाच कुटुंबाची प्रगती कशी होईल, यावरच काँग्रेस आपली सर्व शक्ती खर्च करत आहे,’’ असे ते म्हणाले. ओखा आणि द्वारकेला जोडणाऱ्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल पुलाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी मोदी म्हणाले, की सर्व घोटाळे संपुष्टात आणण्याच्या आपल्या सरकारच्या कटिबद्धतेमुळेच आता देशाची प्रगती झाली आहे आणि बेट द्वारका आणि मुख्य भूमी ओखा यांना जोडणाऱ्या सर्वात लांब ‘सुदर्शन सेतू’सारख्या केबल पुलाच्या रुपाने भव्य पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णानेच आपल्यावर ही जबाबदारी सोपवली आहे असे त्याबद्दल ते म्हणाले.
‘मन की बात’ तीन महिन्यांसाठी स्थगित; पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता पंतप्रधानांकडून व्यक्त
  • दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या कार्यक्रमातून दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाचे प्रसारण तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येईल.
  • एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे मार्चपासून आचारसंहिता लागू होईल. याबाबतची घोषणा निवडणूक आयोग पुढील महिन्यात करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यानिमित्ताने त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा वर्गाला मोठय़ा संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
  • आपण यापुढे ‘मन की बात’च्या १११ व्या भागात भेटू. ही संख्या शुभ आहे, त्यामुळे या शुभ क्रमांकापासून सुरू करण्याहून आणखी चांगले काय असेल, अशा शब्दांत रविवारी ‘मन की बात’च्या ११० व्या मालिकेत पंतप्रधान मोदींनी जनतेसमोर आपण सत्तेत राहणार असल्याचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला.
  • ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होईल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ‘नारी शक्ती’चे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगतीची नवी उंची गाठत आहेत. येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, देशाच्या विकासात्मक प्रवासातील महिलांच्या सहभागाबद्दल त्यांना वंदन करण्याची संधी आहे, असे ते म्हणले. यावेळी त्यांनीमहाराष्ट्रातील कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. पाटील या सेंद्रीय शेतीत काम करतात.
देशातल्या सर्वात मोठ्या केबल ब्रिजचं मोदींच्या हस्ते उद्घाटन; वाचा काय आहेत वैशिष्ट्ये!

  • आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या आधी मोदींच्या या गुजरात दौऱ्यावरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात मोदींनी देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. त्याशिवाय, राजकोटमध्ये गुजरातमधील पहिल्या एम्सचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन या दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.

देशातला पहिला ‘सुदर्शन सेतू’!

  • गुजरातल्या द्वारकेमध्येम मोदींच्या हस्ते ‘सुदर्शन सेतू’चं उद्घाटन करण्यात आलं. हा भारतातला सर्वात लांब केबल ब्रिज आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ९७९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ओखा आणि बेयट येथील द्वारका बेटांदरम्यान हा पूल बांधण्यात आला आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी, अर्थात २०१७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाच्या बांधकामासाठीचं भूमिपूजन केलं होतं. जुन्या आणि नवीन द्वारकेमधील महत्त्वाचा धागा म्हणून हा ब्रिज काम करेल, असं मानलं जात आहे.

४.७७ किलोमीटर लांबीचा केबल ब्रिज!

  • आज उद्घाटन झालेल्या सुदर्शन सेतूची एकूण लांबी ४.७७ किलोमीटर तर रुंदी २७.२० मीटर इतकी असून हा चार पदरी रस्ता आहे. या रस्त्याच्याही दोन्ही बाजूला साधारणपणे अडीच मीटर लांबीचे पदपथ आहेत. यातील फुटपाथच्या बाजूला भगवद गीतेतील श्लोक आणि प्रभू श्रीकृष्णाची छायाचित्रं लावण्यात आली आहेत.
  • या पुलाला ‘सिग्नेचर ब्रिज’ असंही म्हटलं जायचं. आता त्याचं नाव ‘सुदर्शन ब्रिज’ ठेवण्यात आलं आहे. द्वारका शहरापासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर ओखा द्वीप असून या पुलामुळे ही दोन्ही ठिकाणं जोडली गेली आहेत. याच ठिकाणी प्रभू श्रीकृष्णाचं प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरही आहे.

 

अमेरिकेची पुतीन यांच्यावर मोठी कारवाई; कोषागार विभागाने लादले निर्बंध :
  • यूएस (अमेरिका) स्टेट डिपार्टमेंट ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल (ओएफएसी) ने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांवर बंदी घातली आहे. या कृतींमुळे रशियावर अभूतपूर्व राजनैतिक आणि आर्थिक दबाव निर्माण होईल, असे कोषागार विभागाने म्हटले आहे.

  • तसेच रशिया जागतिक आर्थिक व्यवस्थेपासून आणि आंतरराष्ट्रीय समुदायापासून अलिप्त होईल. लोकशाही सार्वभौम राज्य असलेल्या युक्रेनवर रशियाच्या बेकायदेशीर आणि बेकायदेशीर आक्रमणासाठी पुतीन आणि लावरोव्ह थेट जबाबदार आहेत, असे अमेरिकेचे कोषागार सचिव जेनेट येलेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

  • “रशियाने युक्रेनवरील आक्रमणासाठी गंभीर आर्थिक आणि मुत्सद्दी किंमत मोजावी हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय सहयोगी आणि भागीदारांसोबत एकजुटीने उभे आहोत. पण रशियाच्या भयंकर वर्तनासाठी आम्ही आणखी निर्बंध लादण्यास तयार आहोत,” असे सचिव जेनेट येलेन यांनी म्हटले आहे.

तटरक्षक दलासाठी ‘जीएसएल’कडून प्रदूषण नियंत्रण जहाजांची निर्मिती :
  • भारतीय तटरक्षक दलात लवकरच प्रदूषण नियंत्रण जहाजे दाखल होणार आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) या जहाजांच्या निर्मितीला सुरुवात केली असून नुकतीच विशेष कार्यक्रमात ‘जीएसएल’ने याबाबत माहिती दिली.

  • तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक एस. परामेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘जीएसएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बी. बी. नागपाल यांच्यासह जीएसएल, तटरक्षक दलाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • २२ जून २०२१ रोजी जीएसएलने संरक्षण मंत्रालयाशी करार करून भारतीय तटरक्षक दलासाठी दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांची निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला. भारतीय संरक्षण जहाजबांधणी उद्योगासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या अभियानाला यामुळे चालना मिळणार आहे, असे बी. बी. नागपाल यांनी सांगितले.

  • प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ सागरी वातावरणासाठी या जहाजांवर प्रदूषण नियंत्रण उपकरणे व यंत्रणा बसवण्यात आली आहे.

हिजाब प्रकरणातील याचिकांवरील निर्णय राखीव :
  • कर्नाटकमधील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यास आव्हान दिलेल्या याचिकांवरील निर्णय शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला. या प्रकरणी आधी ११ दिवस सुनावणी झाली आहे.  

  •   कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे की, राज्यातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी ठरवून दिलेल्या गणवेशाच्या निकषांमध्ये राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे गुरुवारी न्यायालयाने कर्नाटक राज्य अल्पसंख्याक संस्था व्यवस्थापन संघाची याचिका निकाली काढली होती.  

  • बुधवारी न्यायालयाने स्पष्ट केले होते की, न्यायालयाचा १० फेब्रुवारीचा आदेश, ज्यात धार्मिक प्रतीके परिधान करण्यास मनाई केली होती, तो केवळ राज्य सरकारच्या त्या महाविद्यालयांसाठी लागू आहे, जेथे महाविद्यालयांनी गणवेश ठरवून दिलेला आहे.

कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा :
  • भारत दौऱ्यावर होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे, तर नव्या नावांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर टी-२० नंतर कसोटी मालिका खेळणार आहे. निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस संघात परतले आहेत. वांडरसेचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.

  • मेंडिस आणि डिकवेला या दोघांनीही श्रीलंकेची वेस्ट इंडीजविरुद्धची शेवटची मालिका घरच्या मैदानावर खेळली नाही, त्या दोघांवरही इंग्लंडमध्ये बायो-बबल ब्रीचमुळे बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मेंडिसला अलीकडेच आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरच्या मालिकेतही थिरिमाने संघाचा भाग नव्हता. फलंदाजीतील ताकदीसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

  • वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सुरंगा लकमलकडे असेल. या मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाही. लकमलने यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. ओशादा फर्नांडो, रोशन सिल्वा, सुमिंदा लक्ष, रमेश मेंडिस (फिटनेसच्या कारणास्तव), मिनोद भानुका, लक्ष संदाकन, असिथा फर्नांडो आणि चमिका गुणसेकरा हे खेळाडू संघात नाहीत. उभय संघांत ४ ते ८ मार्च दरम्यान पहिला तर १२ ते १६ मार्चदरम्यान दुसरा कसोटी सामना रंगणार आहे.

  • श्रीलंकेचा संघ – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसांका, लाहिरू थिरिमाने, धनंजय डी सिल्वा (उपकर्णधार), कुसल मेंडिस (फिटनेसवर आधारित), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चरित अस्लंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमिरा, विश्व फर्नांडो, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, लसिथ एम्बुल्डेनिया.

26 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.