चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ फेब्रुवारी २०२१

Date : 26 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंधन दरवाढ हे धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य :
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे.

  • अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही संगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.

  • “यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं.

  • या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे.

माहितीच्या बदल्यात गूगलने मोबदला द्यावा :
  • भारतातील वृत्तपत्रांमध्ये येणारी माहिती गूगलकडून वापरण्यात येते त्यामुळे भारतीय वृत्तपत्रांना त्याचा मोबदला द्यावा आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसुलाचाही योग्य प्रमाणात वाटा द्यावा, अशी मागणी दी इंडियन न्यूजपेपर सोसायटीने (आयएनएस) गूगलकडे एका पत्राद्वारे केली आहे.

  • जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या महसुलातील वाटा ८५ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यात यावा, असे गूगल इंडियाचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांना आयएनएसचे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

  • वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना माहिती गोळा करण्याचा मोठा मोबदला द्यावा लागतो, ही माहिती मालमत्ता असून त्यामुळे गूगलला भारतात वैधता मिळते, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.

‘लव्ह जिहाद’ विरुद्ध गुजरातमध्ये लवकरच कायदा :
  • हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले.

  • राज्य विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडण्याच्या इराद्याचा रुपाणी यांनी पंचमहाल जिल्ह्य़ातील गोध्रा येथे पुनरुच्चार केला. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदू महिलांचे विवाहाच्या माध्यमातून धर्मातर करण्याच्या कथित कारस्थानाविरोधात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारांनी यापूर्वी कायदे केले आहेत.

  • ‘विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून, लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची माझ्या सरकारची इच्छा आहे. हिंदू मुलींच्या अपहरणाचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महिलांना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातर करण्यात येते. असे प्रकार थांबवणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे’, असे रुपाणी म्हणाले.

  • राज्यात २८ फेब्रुवारीला होत असलेल्या नगरपालिका, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी रुपाणी सध्या प्रचार करत आहेत. राज्यातील भाजप सरकार अशा प्रकारचा कायदा करणार असल्याचे त्यांनी १५ फेब्रुवारीला सर्वप्रथम जाहीर केले होते. भाजपचे आमदार शैलेश मेहता व पक्षाचे बडोद्याच्या खासदार रंजनाबेन भट्ट यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा करण्याची मागणी केली होती.

शस्त्रसंधीच्या करारांचे कटाक्षाने पालन करण्याबाबत भारत-पाकिस्तानचे मतैक्य :
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण समझोता झाला असून त्यानुसार दोन्ही देशांनी नियंत्रण रेषा आणि अन्य ठिकाणी शस्त्रसंधीबाबतच्या सर्व करारांचे कटाक्षाने पालन करण्याचे ठरविले आहे, असे गुरुवारी दोन्ही देशांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे.

  • शस्त्रसंधीबाबतचा निर्णय भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांच्या (डीजीएमओ) स्तरावर घेण्यात आला असून तो बुधवारी मध्यरात्रीपासून अमलात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००३ मध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला होता, मात्र गेल्या कित्येक वर्षांत त्याचे तंतोतंत पालन  झालेच नाही.

  • डीजीएमओने प्रस्थापित हॉटलाइन संपर्क यंत्रणेद्वारे चर्चा केली आणि नियंत्रण रेषा आणि अन्य ठिकाणांच्या स्थितीचा मुक्त आणि मोकळ्या वातावरणात आढावा घेतला. सीमेवर शांतता नांदण्यासाठी आणि दोन्ही देशांसाठी हितकारक ठरणाऱ्या बाबी साध्य करण्यासाठी दोन्ही डीजीएमओंनी एकमेकांना भेडसावणारे प्रश्न आणि चिंता सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले, शांततेचा भंग होणारे प्रश्न आणि त्यामुळे होणारा हिंसाचाराचा उद्रेक याबाबतच्या प्रश्नांवर एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे.

‘ग्रीन कार्ड’वरील बंदीचा निर्णय बायडेन यांच्याकडून रद्द :
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना साथीच्या काळात अनेक ग्रीन कार्ड अर्जदारांचा अमेरिकेतील प्रवेश रोखला होता, मात्र नवे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा हा धोरणात्मक निर्णय रद्द केल्याने आता अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या अनेक भारतीयांना बायडेन यांच्या निर्णयामुळे लाभ होणार आहे.

  • ग्रीन कार्ड हे अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यास मुभा असलेले अधिकृत कार्ड म्हणून ओळखले जाते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मुख्यत्वे एच-१बी व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात. मात्र सध्याच्या इमिग्रेशन पद्धतीचा त्यांना मोठा फटका बसत होता.

  • ग्रीन कार्ड अर्जदारांना देशात पुन्हा प्रवेश खुला करताना जो बायडेन यांनी म्हटले आहे की, माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या हिताची जपणूक होत नव्हती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील जे उद्योगसमूह जगभरातील गुणवत्तेचा वापर करून घेत होते त्यांचीही हानी होत होती, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

खरंच महाराष्ट्रात १ मार्चपासून लॉकडाउन लागणार आहे का :
  • महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारीला राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. म्हणजेच १ मार्चला लॉकडाउन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय़ जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर लॉकडाउनची अफवा सुरु झाली आहे.

  • सोशल मीडियावर सध्या एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या लोगोसहित असलेला उद्धव ठाकरेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण एकमेकांना फोन, मेसेज करुन यासंबंधी विचारणाही करत आहेत. मात्र हे वृत्त पूर्णपणे खोटं असून उद्धव ठाकरेंनी असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

  • हा बनावट फोटो फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर अशा अनेक ठिकाणी व्हायरल झाला आहे. राज्यातील रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत हे खरं आहे. मात्र लॉकडाउनसंबंधीची कोणताही निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तुमच्याकडे हा फोटो आला असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नकाच, पण तो पुढे कोणाला फॉरवर्डदेखील करु नका.

२६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.