चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ फेब्रुवारी २०२०

Date : 26 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस तयार : 
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरचा मुद्दा हा मोठा प्रश्न आहे. या दोन देशांदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार आहे, असा पुनरुच्चार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला.

  • दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत काश्मीर, सुधारित नागरिकत्व कायद्यासह इतर मुद्यांवर भाष्य केले. काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्याबाबत मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे नमूद करतानाच ट्रम्प यांनी मोदींसोबतच्या चर्चेत पाकिस्तानबाबतही चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी आपले चांगले संबंध असून, दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

  • धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावरही ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा झाली. देशातील जनतेचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहावे, अशी मोदी यांची इच्छा असल्याचे ट्रम्प म्हणाले. आपण देशातील मुस्लिमांना सोबत घेऊन काम करत असल्याचे मोदी यांनी चर्चेदरम्यान सांगितले असून, धार्मिक स्वातंत्र्याबाबत भारताने मोठे काम केल्याचे दिसून येते, असे ट्रम्प यांनी सांगितले.

भारत-अमेरिका यांच्यात ३ अब्ज डॉलरचा संरक्षण करार : 
  • भारत व अमेरिका यांच्यात मंगळवारी ३ अब्ज डॉलर्सचे संरक्षण करार व तीन सामंजस्य करारांना अंतिम रूप देण्यात आले. ऊर्जा क्षेत्रातही एक करार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सांगितले की, दोन्ही देशांनी त्यांच्यातील संबंध जागतिक भागीदारी पातळीवर नेण्याचे ठरवले आहे.

  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात अभूतपूर्व व ऐतिहासिक स्वागत  करण्यात आले, असे सांगून संयुक्त निवेदनावेळी मोदी म्हणाले की, दोन्ही देशातील संबंध हे केवळ सरकारपुरते मर्यादित नसून ते लोक पातळीवर वाढणार आहेत.

  • ट्रम्प यांनी असे जाहीर केले की, दोन्ही देशात ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर सहमती झाली आहे. आता यापुढे र्सवकष व्यापार करारावर भर दिला जाईल. दोन्ही देशातील संबंध आता आहेत इतके चांगले कधीच नव्हते. दोन्ही देशात चांगले करार झाले आहेत.

  • संयुक्त निवेदनाच्या प्रारंभी मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य हे भारत व अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी नवीन यंत्रणा सुरू करण्याचे मान्य करण्यात आले आहे. सहपरिवार भारताला भेट दिल्याबाबत मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.

चीनमध्ये संसर्गाला अटकाव; मृतांची संख्या २,६६३ :
  • चीनमध्ये करोना विषाणूने सोमवारी ७१ बळी घेतले असून मृतांची संख्या २६६३ झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून निश्चित रुग्णांची संख्या ५०८ ने वाढून ती ७७६५८ झाली आहे.

  • हुबेईत ६८ तर शांगडाँगमध्ये २  व ग्वांगडाँगमध्ये १  बळी गेला आहे. चायना डेलीने दिलेल्या माहितीनुसार हुबेईबाहेर नवीन रुग्णांची संख्या केवळ नऊ आहे. याचा अर्थ विषाणूचा प्रसार आता कमी होत आहे. लागोपाठ सातव्या दिवशी बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवलेल्यांची संख्या ही नवीन लागण झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. सोमवारी २५८९ रुग्ण उपचारानंतर घरी गेले. सोमवारअखेरीस बरे होऊन घरी गेलेल्यांची एकूण संख्या २७३२३ आहे.

  • संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याच्या वृत्ताला कॅनडाचे संसर्गरोगतज्ज्ञ ब्रुस आयलवर्ड यांनी दुजोरा दिला असून जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, चीन सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या कमी झाली असावी.

अभिमानास्पद! भारताच्या वैभवचा अव्वल मानांकित आर्टेमिएवला धक्का : 
  • एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धा : मॉस्कोत सुरू असलेल्या एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅँडमास्टर वैभव सुरीने सहाव्या फेरीत अव्वल मानांकित रशियाच्या व्लाडिस्लाव आर्टेमिएवला पराभवाचा धक्का दिला. वैभवने ७१ चालींमध्ये हा विजय मिळवला. या विजयामुळे २३ वर्षीय वैभवला स्पर्धेत चार गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान मिळाले.

  • अझरबैजानच्या राउफ मेमेडोवने आर्मेनियाच्या मॅन्युअल पेट्रोसिनविरुद्ध बरोबरी राखली. त्यामुळे मेमेडोव पाच गुणांसह अग्रस्थानी आहे. रशियाच्या सनन सुगिरोवने त्याच्याच देशाच्या वादिम झ्वागिन्सेवला नमवत ४.५ गुणांसह दुसरे स्थान राखले.

  • भारताच्या वैभव सुरीसोबत भरत सुब्रम्हण्यम, बी. अधिबान, अरविंद चिथमबरम, अर्जुन एरिगायसी यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. अधिबान, सुब्रम्हण्यम, चिथमबरम, कार्तिकेयन मुरली यांच्या लढती बरोबरीत सुटल्या. आर. प्रागनंधाने सर्जी ग्रिगोरियांट्सविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला.

२६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.