चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 ऑगस्ट 2023

Date : 26 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘स्मार्ट सिटी’ पुरस्कारांत महाराष्ट्राची पाटी कोरी; मध्य प्रदेशातील इंदूर शहर देशात सर्वोत्कृष्ट
  • केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची पाटी कोरीच राहिली. महाराष्ट्रातील आठ शहरे स्पर्धेत होती, मात्र पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर यांना मिळालेले दुय्यम पुरस्कार वगळता अन्य मोठय़ा शहरांनी मात्र निराशा केली. महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, पुणे, सोलापूर, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांच्या महानगरपालिकांनी स्वच्छता, सुशोभीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च केला होता. राज्य सरकारनेही त्यांना मुक्त हस्ते निधी दिला होता.
  • मात्र, सुशोभीकरणावर मोठा खर्च करूनही सर्व शहरे ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत मागे पडली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्मार्ट सारथी अ‍ॅप’साठी प्रशासन या विभागात दुसरा क्रमांक मिळाला, तर सोलापूरने पश्चिम विभागात ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कार पटकावला. मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशातील पहिल्या क्रमांकाची ‘स्मार्ट सिटी’ ठरले तर गुजरातमधील सुरत आणि उत्तर प्रदेशातील आग्रा या शहरांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने सन २०२२च्या ‘राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारां’ची घोषणा शुक्रवारी केली. इंदूर येथे २७ सप्टेंबरला होणाऱ्या सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
  • विविध विभागांसाठीच्या ६६ विजेत्यांमध्ये मध्य प्रदेशने ‘सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार’ पटकावला, तर तमिळनाडूने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली. केंद्रशासित प्रदेश’ या विभागात चंडीगडला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ‘सर्वोत्कृष्ट प्रशासन विभागा’त चंडीगड ‘ई-गव्हर्नन्स’ सेवांमुळे विजेते ठरले आहे. मोदी सरकारच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या १०० शहरांमध्ये इंदूर अव्वल, सुरत दुसऱ्या आणि आग्रा तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंदूरला सलग सहाव्यांदा देशातील सर्वात ‘स्वच्छ शहर’ घोषित करण्यात आले होते.
  • ‘बिल्ट एन्व्हायर्नमेंट’ या गटात कोईम्बतूर शहर हे रस्ते तसेच तलावांची दुरुस्ती आणि त्यांचे पुनरुज्जीवीकरणात सर्वोत्कृष्ट ठरले. या विभागात दुसरा क्रमांक इंदूरने मिळवला. तिसरा क्रमांक न्यू टाऊन कोलकाता आणि कानपूर यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयची उपांत्य फेरीत धडक
  • भारताच्या एच.एस. प्रणॉयने जबरदस्त झुंज देत डेन्मार्कचा अव्वल मानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनवर तीन गेममध्ये १३-२१, २१-१५, २१-१६ असा विजय मिळवून जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या द्वितीय मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
  • प्रणॉयने शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कमालीचा संयम बाळगताना अ‍ॅक्सेलसेनचे आव्हान १ तास ८ मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणले. व्हिक्टरने पहिल्या गेमला निर्विवाद वर्चस्व राखताना २-२ अशा बरोबरीनंतर ९-२ अशी आघाडी १६-१३ अशी वाढवली. या स्थितित सलग पाच गुण मिळवत अ‍ॅक्सेलसेनने पहिला गेम जिंकला.
  • दुसऱ्या गेमला कमालीचा चुरस सुरुवातीपासून दिसून आली. रॅलीजच्या बहारदार खेळाने ही गेम ८-८ अशी बरोबरीत होती. तेव्हा प्रणॉयने सलग पाच गुणांची कमाई करताना १३-१० अशी आघाडी घेतली आणि ती १७-१० अशी वाढवत दुसरा गेम सहज जिंकला. तिसऱ्या निर्णायक गेमला आणखी चुरस अपेक्षित होती. पण, प्रणॉयने ४-४ अशा बरोबरीनंतर ७-६ अशी आघाडी सलग पाच गुण मिळवत १२-६ अशी वाढवली आणि कधीच मागे वळून बघितले नाही. प्रणॉयने २०-१५ अशा आघाडीवर मिळविलेल्या सहा मॅचपॉइंटपैकी एक गमावला. मात्र, पुढच्याच गुणाला प्रणॉयने विजयावर शिक्कामोर्तब केले.
  • दरम्यान, दुहेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीची जागतिक स्पर्धेतील वाटलाच उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली. डेन्मार्कच्या किम अस्ट्रप-आंद्रेस स्कार्प रॅस्मुसेन जोडीने भारतीय जोडीचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला. डेन्मार्क जोडीला ११वे मानांकन होते. ही लढत ४८ मिनिटे चालली. डेन्मार्कच्या जोडीसमोर भारतीय जोडी आपली आक्रमकता दाखवू शकली नाही. भारतीय जोडीने गेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
चांद्रयान ३ मोहिमेबाबत बोलताना मोदी भावुक; म्हणाले, “जेव्हा यान उतरलं…!”
  • २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर भारताचं चांद्रयान उतरलं आणि अवघ्या देशानं एकच जल्लोष केला. यावेळी इस्रोच्या वैज्ञानिकांचं देशभरातून कौतुक होत होतं. त्याचवेळी भारतावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. त्यावेळी विदेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि कौतुक ऑनलाईन केलं. आज विदेश दौऱ्यावरून परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूला इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी दाखल झाले. यावेळी इस्रोच्या वैज्ञानिकांसमोर बोलताना मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाले नरेंद्र मोदी इस्रोमध्ये?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोमध्ये बोलताना सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. तसेच, असे प्रसंग फार दुर्मिळ असतात, असंही मोदी म्हणाले. “तुम्हा सर्वांमध्ये येऊन आज मला वेगळाच आनंद होत आहे. असा आनंद फार दुर्मिळ प्रसंगी मिळतो”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“इच्छा माझी, अडचण तुमची”

  • दरम्यान, यावेळी मोदींनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर समोरच्या वैज्ञानिकांमध्ये हास्याची लकेर उमटली. आज भल्या सकाळीच आपण इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्यामुळे तिथल्या सर्वांची अडचण झाली असावी, असं मोदी म्हणाले. “कधीकधी वाटतं की मी तुमच्यावर अन्याय करतोय. इच्छा माझी आणि संकट तुमच्यावर. सकाळी-सकाळी तुम्हा सर्वांना इथे या वेळी यावं लागलं. पण माझी फार इच्छा होती की तुम्हाला भेटून आभिनंदन करावं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केलं.

बोलताना मोदींना भावना अनावर…

  • दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. “तुमची अडचण झाली असेल. पण मला भारतात येताच लवकरात लवकर तुमच्या दर्शनासाठी यायचं होतं”, असं म्हणताना मोदींचा कंठ दाटून आला. “तुम्हाला सर्वांना सॅल्यूट करायचा होता.तुमच्या श्रमांना सॅल्युट आहे. तुमच्या धैर्याला सॅल्युट आहे. तुमच्या निष्ठेला सॅल्युट आहे.. तुमच्या हिंमतीला सॅल्युट आहे”, असं मोदी म्हणाले.
  • “तुम्ही देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात, हे कुठलं साधं यश नाहीये. अंतराळात भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे. भारत चंद्रावर पोहोचला आहे. जिथे आत्तापर्यंत कुणीही पोहोचू शकलं नव्हतं, तिथे आपण पोहोचलो आहोत. आपण ते केलं जे आधी कुणी कधी केलं नव्हतं. २१व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठमोठ्या समस्यांचं निराकरण करेल”, असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला.
भारत-ग्रीस संबंध मजबुतीवर भर; ‘ब्रिक्स’नंतर मोदी ग्रीसच्या दौऱ्यावर
  • भारत आणि ग्रीसने आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करून धोरणात्मक भागीदारी वाढवणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. तसेच २०३० पर्यंत दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचे आणि स्थलांतरासंबंधी करार करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्यामध्ये विविध मुद्दय़ांवर व्यापक चर्चा झाली.
  • नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षांत ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. बैठकीनंतर संयुक्त निवेदनामध्ये मोदी यांनी सांगितले की, संरक्षण आणि सुरक्षा, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण आणि नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर संस्थात्मक चर्चा करण्यासंबंधी दोन्ही देशांदरम्यान सहमती झाली आहे.
  • बदलत्या जागतिक परिस्थितीत, विशेषत: युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ग्रीस यांनी एकत्रितरित्या विविध आव्हानांना सामोरे जाण्याचे ठरवले आहे असे ग्रीसचे पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी सांगितले. याबरोबरच, डिजिटल देयक पद्धती, जहाज वाहतूक, औषधनिर्माण क्षेत्र, पर्यटन, संस्कृती आणि लोकांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क या मुद्दय़ांवरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी हे ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. परिषद पार पडल्यानंतर ते शुक्रवारी ग्रीसच्या दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी ग्रीसचे अध्यक्ष कॅटेरिना सॅकेलारोपुलो यांचीही भेट घेतली.

 

नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये खेळणार :
  • लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी स्नायूंच्या दुखापतीतून सावरलेल्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

  • या स्पर्धेत चांगली कामगिरी करून नीरजला पुढील महिन्यात झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. नीरज सध्या चौथ्या स्थानावर आहे.

  • नीरजला दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. स्पर्धेच्या दोन दिवस आधी त्याने माघारीचा निर्णय घेतला. त्याला चार आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.

  • डायमंड लीग आयोजकांनी १७ ऑगस्ट रोजीच जाहीर केलेल्या स्पर्धकांच्या यादीत नीरजच्या नावाचा समावेश होता. फक्त, त्यावेळी आयोजकांनी त्याच्या नावापुढे तंदुरुस्तीवर नीरजचा सहभाग अवलंबून असल्याचे नमूद केले होते. नीरजनेच तंदुरुस्त असल्याचे जाहीर करून स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.

अबू धाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : अर्जुन एरिगैसीला जेतेपद :
  • भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीने गुरुवारी स्पेनच्या डेव्हिड अँटोन गुइजारोला हरवून अबू धाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळवले. नवव्या फेरीअखेरीस १८ वर्षीय अर्जुनने ७.५ गुणांसह बाजी मारली. अर्जुन सर्व नऊ फेऱ्यांमध्ये अपराजित राहिला आणि उझबेकिस्तानच्या जाव्होखिर सिंदारोव्हपेक्षा अध्र्या गुणांची आघाडी मिळवत अजिंक्यपद पटकावले. सिंदारोव्हने इराणच्या एम अमिन तबाताबाइैला पराभूत करत दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.

  • ‘लाइव्ह रेटिंग्ज’ यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अर्जुनने गेल्या काही स्पर्धामध्ये आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले आहे. भारतात नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्याने ३४ एलो गुणांची कमाई केली होती. अबू धाबीत अर्जुनने सहा विजयांसह तीन गेममध्ये बरोबरी साधली आणि जगातील आघाडीच्या ग्रँडमास्टर्स खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

  • अर्जुनने रोहित कृष्णा, दीप सेनगुप्ता, रौनक साधवानी, चीनचा अग्रमानांकित वांग हाओ, अलेक्सांद्र इनडिच (सर्बिया) आणि गुइजारोला यांना पराभूत केले, तर एवगेने टॉमशवके (रशिया), जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट आणि राय रॉबसन यांच्याशी सामने बरोबरीत सोडवले. भारताचे ग्रँडमास्टर्स निहाल सरिन, एस पी सेतुरामन, कार्तिकेयन मुरली, आर्यन चोप्रा आणि ‘फिडे’मास्टर आदित्य सामंत यांनी ६.५ गुणांची नोंद केली.

भुतियाचा अध्यक्षपदासाठी नव्याने अर्ज :
  • भारताना नामांकित फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाने २ सप्टेंबरला होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी गुरुवारी नव्याने उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • ४५ वर्षीय भारताचा माजी कर्णधार भुतियाचा अर्ज हा आंध्र फुटबॉल संघटनेने प्रस्तावित केला, तर राजस्थान फुटबॉल संघटनेचे अनुमोदन लाभले आहे. ‘‘भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज भरला असून, हे पद सांभाळण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे. मी देशासाठी आणि नामांकित क्लब्जसाठी अनेक सामने खेळलो आहे. याचप्रमाणे क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक समितीवर असल्याने प्रशासनाचाही अनुभव आहे. भारतीय फुटबॉलला नव्या उंचीवर देण्याची माझी इच्छा आहे,’’ असे भुतियाने सांगितले.

  • भुतियाने याआधी भरलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जासाठी दीपक मंडलने प्रस्तावित केले होते, तर माजी महिला फुटबॉलपटू मधू कुमारीने अनुमोदन दिले होते. मोहन बागान, ईस्ट बेंगालचे माजी गोलरक्षक आणि पश्चिम बंगालमधील भाजप नेते कल्याण चौबे यांनीसुद्धा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

विश्लेषण: ‘Land For Jobs’ प्रकरण काय आहे? लालू आणि तेजस्वी यादव अडचणीत येणार का? : 
  • केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रेल्वे नोकरी घोटाळा प्रकरणी बुधवारी तब्बल दोन डझन ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये गुरुग्राममधील एका बांधकामाधीन मॉलचाही समावेश आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मालकीच्या कंपनीकडून हा मॉल उभारला जात असल्याची माहिती आहे. तेजस्वी यादव यांच्याबरोबरच राष्ट्रीय जनला दलाचे आमदार सुनील सिंह, खासदार अश्फाक करीम, फैयाज अहमद आणि माजी आमदार सुबोध राय यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

  • दिल्ली, गुरुग्राम, पटना, मधुबनी आणि कटिहार अशा एकूण २५ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले. गुरुग्राममधील सेक्टर ७१ मध्ये व्हाईटलँड कंपनीकडून अर्बन क्युब्स मॉल उभारला जात आहे. या मॉलमध्ये यादव कुटुंबाची मालकी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  • महत्वाची बाब म्हणजे, बिहारमध्ये नवे सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात असतानाच सीबीआयने राजद नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. राजदने सीबीआयच्या कारवाईवर टीका केली असून गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांच्या आई राबडी देवी यांनी केंद्र सरकारला महागठबंधन सरकारची भीती वाटत असल्याची टीका केली आहे.

जागतिक बॅडिमटन स्पर्धा : प्रणॉयचा मोमोटावर सनसनाटी विजय ; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात; लक्ष्य उपउपांत्यपूर्व फेरीत :
  • भारताच्या एचएस प्रणॉयने बुधवारी जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत जपानच्या द्वितीय मानांकित केंटो मोमोटावर सनसनाटी विजयाची नोंद केली. प्रणॉयसह राष्ट्रकुल विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. परंतु  गतउपविजेत्या किदम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले.

  • दुसऱ्या फेरीत बिगरमानांकित प्रणॉयने अनपेक्षित कामगिरीचे प्रदर्शन करताना दोन वेळा माजी विश्वविजेत्या मोमोटावर २१-१७, २१-१६ असा विजय नोंदवला. आतापर्यंतच्या आठ सामन्यांपैकी प्रणॉयला प्रथमच मोमोटाला पराभूत करण्यात यश आले आहे. याआधीच्या सात सामन्यांमध्ये प्रणॉयला फक्त एकच गेम जिंकता आला होता.

  • लक्ष्यने स्पेनच्या लुइस पेनाल्व्हवरचा सहज पराभव करून पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्यने ७२ मिनिटे लढत देत हा दुसऱ्या फेरीचा सामना २१-१७, २१-१० अशा फरकाने जिंकला. सुरुवातीला ३-४ अशा पिछाडीवर पडलेल्या नवव्या मानांकित लक्ष्यने सहा गुण मिळवत १३-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र लक्ष्यने वर्चस्वपूर्ण खेळ करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी उत्तम लढत दिली. परंतु २१ वर्षीय लक्ष्यने नऊ गुणांच्या आघाडीसह नंतर गेम आणि सामनाही जिंकला.

  • जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकावरील चीनच्या झाओ जून पेंगने ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात श्रीकांतला २१-१८, २१-१७ असे हरवले.  पहिल्या गेममध्ये २९ वर्षीय श्रीकांतचा निभाव लागला नाही. फक्त १२ मिनिटांत पेंगने १-० अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने शर्थीने प्रयत्न करीत १६-१४ अशी आघाडी मिळवली. परंतु नंतर अनेक न टाळता येण्याजोग्या चुका केल्यामुळे पेंगने विजय मिळवला.

२६ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.