चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ एप्रिल २०२१

Date : 26 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुगल भारताला करणार १३५ कोटींची मदत; सुंदर पिचाईंनी केली घोषणा : 
  • भारतामधील करोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील काही दिवसांपासून रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरु झालाय.

  • अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. असं असतानाच माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे.

  • गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केलीय.

ऑस्कर २०२१ पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी, सर्वोत्कृष्ट सिनेमासह, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार :
  • सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘नोमडलँड’सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत 2021 सालातील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

  • लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडतोय. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पर पडतोय. युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर इथं हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’,  ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

  • यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर दक्षिण कोरियाच्या अभिनेत्री युन यू जंग यांना ‘मिनारी’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता डॅनियेल कालूया याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

पद्मभूषण राजन मिश्र यांचं निधन :
  • प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचे आज(रविवार) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. करोना संसर्गाबरोबरच हृदयविकाराशी संबंधित त्रास उद्भवल्याने आज सकाळी त्यांची तब्येत खालवली होती, यामुळे त्यांना दिल्लीतील सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सलीम मर्चंट यांनी ट्विटरवर राजन मिश्र यांच्या निधनाची माहिती दिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजन मिश्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “ शास्त्रीय गायनाच्या जगात आपली ठसा उमटवणाऱ्या पंडित राजन मिश्र यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. बनारस घराण्याशी जुडलेल्या मिश्र यांचे जाणे संगीत व कला विश्वाचे मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या व चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे.” असं मोदींनी ट्विट केलं आहे.

  • तर, ”पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांनी आपल्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध केले. त्यांच्या निधनामुळे देश एका महान शास्त्रीय गायक, संशोधक व गुरुला मुकला आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली..” असं ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस; ठाकरे सरकारची मोठी घोषणा :
  • राज्यातील वाढता करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू केला आहे. इतर उपाययोजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केलं असून, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. मात्र, १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली.

  • राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली. मलिक म्हणाले,”केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे वय वर्ष ४५ खालील लोकांना केंद्र लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.

  • कोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : भारतीय महिलांना सुवर्णपदक :
  • भारतीय महिलांच्या रिकव्र्ह संघाने रोमहर्षक लढतीत मेक्सिकोचा ५-४ असा पाडाव करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कोमालिका बारी यांच्या भारतीय संघाने शूट-ऑफमध्ये ४-४ अशी कामगिरी केली होती. मात्र या तिघींनी अखेरच्या क्षणी भारताला २७-२६ असे गुण मिळवून देत सुवर्णपदक मिळवून दिले. विश्वचषक स्पर्धेत भारताने तब्बल सात वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक मिळवले. दीपिकाचे हे विश्वचषक स्पर्धेतील पाचवे सांघिक सुवर्णपदक ठरले.

  • दीपिकाने शूट-ऑफ फेरीत १० गुण मिळवत २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या आयडा रोमन हिच्यावर दबाव आणला. अखेर आयडाला नऊ गुणांची आवश्यकता असताना फक्त आठ गुण मिळवता आले.

  • भारताचे हे रिकव्र्ह प्रकारातील पाचवे सुवर्णपदक ठरले. याआधी भारताने शांघाय (२०११), मेडेलिन (२०१३), क्रोक्लॉ (२०१३, २०१४) सुवर्णपदक पटकावले होते.

गव्हर्नर्स चषक बॉक्सिंग स्पर्धा - अमितला कांस्यपदक :
  • भारताचा अव्वल बॉक्सिंगपटू अमित पांघल (५२ किलो) याला उपांत्य फेरीत जगज्जेत्या शाखोबिदिन झोइरोव्ह याच्याकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे अमितला गव्हर्नर्स चषक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमितवर उझबेकिस्तानच्या झोइरोव्हने ०-५ असा सहज विजय मिळवला. विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या झोइरोव्हकडून अमितला दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. २०१९च्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झोइरोव्हने अमितला हरवले होते.

  • झोइरोव्हने या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या दीपक कुमारला पराभूत केले होते. गव्हर्नर्स चषक बॉक्सिंग स्पर्धेत आशीष कुमार (७५ किलो) आणि सुमित संगवान (८१ किलो) यांचे आव्हान लवकर संपुष्टात आल्याने अमितकडूनच पदकाच्या अपेक्षा होत्या. अमित पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असला तरी पदकासाठी निश्चित दावेदार मानला जात आहे.

  • २३ वर्षीय अमितने आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

२६ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.