चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ ऑक्टोबर २०२१

Date : 25 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लसीकरणातील कामगिरीने देशाला नवी ऊर्जा! ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन :
  • करोना लसीकरण मोहिमेतील भारताच्या यशातून देशाची क्षमता दिसून आली असून; १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केल्यानंतर देश नव्या ऊर्जेसह वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

  • देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीतांची स्पर्धा आयोजित करण्याची तयारी सांस्कृतिक मंत्रालयाने केली असल्याचेही पंतप्रधानांनी रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले. यासाठी नव्या भारताचा विचार प्रतिबिंबित करणाऱ्या, देशाच्या सध्याच्या यशाने प्रेरित झालेल्या आणि भविष्यासाठीचा संकल्प व्यक्त करणाऱ्या रचनांची निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

  • अंगाई गीते पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. नागरिकांकडून सूचना मिळाल्यानंतर, या गीतांशी संबंधित स्पर्धा आयोजित करण्याचे मंत्रालयाने ठरवले आहे. देशभक्तीपर अंगाई गीते, कविता व गाणी यांसारखे असे काही लिहावे, जे प्रत्येक घरातील माता  मुलांसाठी गाऊ शकतील, असे ते म्हणाले.

राज्यभरातील १ हजार ५० केंद्रांवर पार पडली, आरोग्य विभागाची ‘गट क’ संवर्गातील विविध पदांसाठीची भरती परीक्षा :
  • महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा आज(रविवार), २४ ऑक्टोबर रोजी पार पडली. राज्यभरातील तब्बल १,०५० केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली.

  • पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडले असून दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडले. साडेतीन लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी या दोन स्वतंत्र सत्रांमध्ये परीक्षेस सामोरे गेले. राज्य शासनाच्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण पालन करून ही परीक्षा घेण्यात आली.

  • करोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची ही भरती परीक्षा राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी ठरली आहे. सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेद्वारे गट क संवर्गातील शस्त्रक्रिया गृह साहाय्यक, कनिष्ठ/वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक, दंत आरोग्यक, दूरध्वनीचालक, लघुटंकलेखक, वाहनचालक इत्यादी, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेद्वारे अभिलेखापाल, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन आदी पदांसाठी भरती होणार आहे.

  • चार लाखांहून अधिक परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी ३,५७,३३१ परीक्षार्थींनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले.

कोणत्याही ठिकाणाहून मतदानाची सुविधा असलेले यंत्र विकसित :
  • मतदार नोंदणी कुठेही झाली असली आणि मतदानाच्या दिवशी देशातील मतदार कोणत्याही शहरात असेल तरीही बोटांचे ठसे आणि आधार लिंक्ड इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमुळे मतदानाचा हक्क बजावता येणे शक्य होईल, असे मतदान यंत्र (ईव्हीएम) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आनंद मिश्रीकोटकर या युवकाने तयार केले आहे. हे यंत्र पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यात वापरण्यात यावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

  • अंजनगाव सुर्जी येथील मूळ रहिवासी असलेल्या आनंद मिश्रीकोटकर याने कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच २०१८ मध्ये त्याने हा प्रकल्प तयार केला.  

  • राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांना हा प्रकल्प आवडला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-व्होटिंग करता येईल, असे आश्वासन सनस यांनी दिले. त्यावेळी आनंदच्या प्रकल्पाला आवश्यक ते आर्थिक सहाय्य मिळू न शकल्यामुळे प्रकल्प मागे पडला. दरम्यान, अशाच प्रकारचा प्रकल्प केंद्रीय निवडणूक आयोगाने आयआयटी मद्रासला आर्थिक सहाय्य देत तयार करण्यास सांगितले.

  • अद्याप आयआयटी मद्रासचा प्रकल्प अंतिम झालेला नाही. त्यामुळे आजपासून तीन वर्षांपूर्वी आनंद याने तयार केलेला ई-व्होटिंगचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवणे शक्य असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आनंद सध्या पुणे येथे नोकरीला आहे.

स्मार्ट वॉचच्या मदतीने ठेवणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नजर; ‘या’ राज्याचा महत्त्वाचा निर्णय :
  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी घोषणा केली आहे की, राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना स्मार्ट वॉच घालावे लागतील जे कार्यालयीन वेळेत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील. तसेच उपस्थिती चिन्हांकित करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतील.

  • “राज्यातील सर्व सरकारी अधिकारी स्मार्ट वॉच घालतील जे कार्यालयीन वेळेत त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतील. तसेच उपस्थिती चिन्हांकित करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतील,” शनिवारी सोहना येथील सर्मथला गावात ‘विकास’ रॅलीदरम्यान खट्टर यांनी जाहीर केले.

  • मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल मागील रोस्टर आणि त्यानंतरच्या बायोमेट्रिक सिस्टीममधील त्रुटी दूर करून प्रगती दर्शवेल. नवीन प्रणालीमुळे “कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येईल, आणि बनावट, डुप्लिकेट आणि खोटी उपस्थिती दूर होईल”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • ते म्हणाले, “आम्ही स्मार्टवॉच सादर करणार आहोत जे फक्त ज्या अधिकाऱ्याला नेमले आहेत त्याचा मागोवा घेतील. इतर कोणी ते घातल्यास घड्याळ काम करणे बंद करेल. अशा प्रकारे हरियाणातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला जाईल.”

इंधन दरांत सलग पाचव्या दिवशी वाढ :
  • पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये रविवारी सलग पाचव्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. यामुळे या दोन्ही इंधनांचे दर देशभरात आजवरच्या विक्रमी पातळीवर पोहचले आहेत.

  • एक लिटर पेट्रोल भरण्यासाठी आता मुंबईत ११३.४६ रुपये द्यावे लागणार असून, दिल्लीत हेच दर १०७.५९ रुपये झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर लिटरमागे १०४.३८ रुपयांवर, तर दिल्लीत ९६.३२ रुपयांवर पोहचले आहेत. देशातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली असून,  अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिझेलनेही ही पातळी ओलांडली आहे.

  • डिझेलचे दर १०० रुपयांहून अधिक होणारे पश्चिम बंगाल हे रविवारी अलीकडचे राज्य ठरले.  इंधनदरांत तीन आठवडे काही बदल न होण्याची प्रक्रिया संपल्यानंतर २८ सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर २१ वेळा वाढवण्यात आले आहेत. तेव्हापासून पेट्रोलचे दर लिटरला ६.४० रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या दरांत २४ सप्टेंबरपासून २४ वेळा मिळून लिटरला ७.७० रुपयांनी वाढ झाली आहे.

२५ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.