चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2023

Date : 25 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत
  • भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या आघाडीच्या जोडीने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला मात्र पराभव पत्करावा लागल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
  • पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित सात्त्विक-चिराग जोडीने आक्रमक खेळ करताना इंडोनेशियाच्या १३व्या मानांकित लिओ रॉली कार्नाडो-डॅनिएल मार्टिन जोडीचा २१-१६, २१-१४ असा पराभव केला. भारतीय जोडीने या वर्षी इंडोनेशिया, कोरिया आणि स्विस स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.
  • आता उपांत्य फेरीत भारतीय जोडीसमोर चीनच्या हे जी टिंग-रेन शिआंग यू जोडीचे आव्हान असेल. टिंग-यू जोडीने आपल्याच देशाच्या आठव्या मानांकित लियू यू शेन-ओऊ शुआन यी जोडीला २१-१५, २१-१५ असे पराभूत केले.पुरुष एकेरीत भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाकडून ९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.
दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघ ओडिशात
  • महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वाघ तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ओडिशात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाघांचे स्थलांतरण, त्यांचा कॉरिडॉर आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
  • ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील महेंद्र परिवनक्षेत्रात हा वाघ वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिसला. तो नवीन असल्याचे त्यांना जाणवल्याने त्यांनी वाघाची छायाचित्रे व इतर तपशील डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला पाठवले. संस्थेच्या वैज्ञानिकांनी ओडिशातील या वाघाच्या प्रतिमा इतर वाघांशी जुळवून पाहिल्या. त्यानंतर त्यांना हा वाघ महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील असल्याचे आढळले. या वाघाने दोन हजार किलोमीटरचा पल्ला गाठताना चार राज्ये पालथी घातली. तर या प्रवासादरम्यान त्याने नदीनाले, शेत, महामार्ग आदी पार केले. या भागात वाघ पहिल्यांदाच दिसल्याने, त्यांनी वाघाची छायाचित्रे आणि इतर तपशील भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठवून त्याचा मूळ प्रदेश शोधला.
  • महाराष्ट्रात यापूर्वी ‘वॉकर’ नावाने प्रसिद्ध झालेल्या वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर गाठले. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरमधील हा वाघ नंतर ज्ञानगंगात स्थिरावला. मात्र, आता या वाघाचा काहीच थांगपत्ता नाही. दरम्यान, ओडिशात स्थलांतरित झालेल्या या वाघाबाबत ताडोबाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर व ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
  • यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर कोंढाळी भागातील ‘नवाब’ वाघ अनुक्रमे १०० व १३० किमी प्रवास करून अमरावती जिल्ह्यातील पोहरा मालखेड राखीव जंगलात आला. उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘बली’ नावाच्या वाघाने सुमारे १५० किलोमीटरहून अधिक एरियल अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले. नागझिरा अभयारण्यातील अल्फा, जय या वाघांनी देखील स्थलांतरण केले आहे.
दादर स्थानकात मध्य मार्गावरील फलाट क्रमांक बदलणार, गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या नवे बदल!
  • मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक आता बदलणार आहेत. दादर स्थानकातून पश्चिम आणि मध्य मार्गावर लोकल धावते. दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ९ डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने २७ सप्टेंबर रोजी एक्स पोस्टद्वारे दिली होती. आता ९ डिसेंबरची तारीख जवळ आली असल्याने आयत्यावेळी गोंधळ उडण्याआधी तुम्ही दादर स्थानकावर झालेले बदल जाणून घ्या आणि सर्वांना शेअर केला.
  • दादर स्थानकावर एकूण १५ फलाट आहेत. त्यापैकी ८ फलाट मध्य रेल्वे मार्गावर, तर ७ फलाट पश्चिम मार्गावर आहेत. दोन्ही मार्गांवर सारखेच क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. मुंबईत नव्याने आलेल्या प्रवाशांना दादर स्थानकातील मध्य आणि पश्चिम मार्गावरील फरक कळत नाही. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने फलाटांचे क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम मार्गावर १ ते ७ क्रमांक फलाट तसेच राहणार आहेत. तर, मध्य मार्गावरील १ ते ८ क्रमाकांच्या फलटांना ८ ते १४ असे क्रमांक देण्यात येणार आहेत.
  • सध्या दादर स्थानकावर फलाट क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन सध्या बंद आहे. नव्या बदलामध्ये फलाट क्रमांक दोन उपलब्ध नसेल. त्यामुळे फलाट क्रमांक १ नव्या बदलानंतर फलाट क्रमांक ८ म्हणून ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांक ३ हा ९, फलाट क्रमांक ४ हा १०, फलाट क्रमांक ५ हा ११, फलाट क्रमांक ६ हा १२, फलाट क्रमांक ७ हा १३ आणि फलाट क्रमांक ८ हा १४ म्हणून ओळखला जाणार आहे.
जुने फलाट क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8
नवे फलाट क्रमांक 8   9 10 11 12 13 14

 

करोनानंतर चीनमध्ये आणखी एका रोगाचा प्रादूर्भाव, भारताला धोका किती? केंद्र सरकार माहिती देत म्हणाले…
  • चीनमध्ये H9N2 चा प्रादुर्भाव वाढला असून तेथील लहान मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. करोनाप्रमाणे हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने भारतीय नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. परंतु, केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H9N2) चा भारताला कमी धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
  • उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचा आजार वाढला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन देखील जारी केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
  • चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आले. त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. परिणामी, या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली चीनमध्ये नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला. आरोग्य संघटनेने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. म्हणजेच, या आजाराचा संसर्गजन्य दर आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
  • “भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य परिस्थितीसाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने एक समग्र आणि एकात्मिक रोडमॅपचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
‘पीएमएलए’ प्रकरणाची सुनावणी आता दुसऱ्या खंडपीठापुढे
  • आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींच्या वैधतेबाबतच्या प्रकरणाची सुनावणी वेळेअभावी दुसऱ्या खंडपीठापुढे करण्यात येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. याप्रकरणावर युक्तिवाद सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी वेळ मागितल्याने आणि खंडपीठातील एक न्यायमूर्ती संजय किशन कौल हे २५ डिसेंबरला निवृत्त होणार असल्याने खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल वेळेत देण्याबाबत असमर्थता दर्शवली.
  • या प्रकरणावर बुधवारपासून सुनावणी सुरू झाली होती. केंद्राची बाजू मांडणारे महान्यायवादी तुषार मेहता यांनी याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादावर म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारी आणखी वेळ मागितला. त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली. या खंडपीठात न्यायमूर्ती कौल यांच्यासह न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांचा समावेश आहे.याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्जाद्वारे उपस्थित केलेल्या नव्या मुद्यांवर उत्तर दाखल करण्यासाठी खंडपीठाने केंद्र सरकारला चार आठवडय़ांची मुदतही दिली.  
  • या प्रकरणाची सुनावणी आता स्थगित करण्यात आल्यामुळे निकालासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही. तसेच खंडपीठातील न्यायमूर्ती कौल निवृत्त होणार असल्याने सरन्यायाधीशांना या खंडपीठाची पुनर्रचना करावी लागेल. या संदर्भात सरन्यायाधीशांकडून आवश्यक आदेश मिळावेत, असेही खंडपीठाने नमूद केले. 

प्रकरण काय?

  • सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्यीय खंडपीठाने २७ जुलै २०२२ रोजी ‘पीएमएलए’मधील तरतुदींची वैधता कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मिळालेल्या आरोपीच्या अटकेच्या आणि मालमत्ता जप्तीच्या अधिकारांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी विजय मदनलाल चौधरी यांनी केली आहे.

 

ट्विटर युजर्ससाठी खुशखबर! एलॉन मस्क यांनी जाहीर केला मोठा निर्णय, पुढील आठवड्यापासून :
  • ट्विटरवरील निलंबित खाती पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं एलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे. ट्विटरवरील निलंबित खाती पुन्हा सुरू करावीत की नाही, यासाठी पोल घेण्यात आला होता. या पोलच्या सकारात्मक निकालानंतर निलंबित खात्यांना माफी देत ही खाती लवकरच सक्रीय करण्यात येणार आहे.

  • कायद्याचं उल्लंघन न करणाऱ्या आणि स्पॅमसारख्या गैरप्रकारामध्ये सहभागी नसलेल्या युजर्सची निलंबित ट्विटर खाती पुन्हा सुरू करावीत का? असा प्रश्न एलॉन मस्क यांनी युजर्संना विचारला होता. ३.१६ दशलक्षाहून अधिक युजर्संनी या पोलमध्ये भाग घेतला होता. त्यातील ७२.४ टक्के युजर्सने निलंबित खाती पुन्हा सुरू करण्याच्या बाजुने कौल दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निलंबित ट्विटर खातं पुन्हा सुरू करावं का? यासाठीही एलॉन मस्क यांनी पोल घेतला होता. या पोलच्या सकारात्मक प्रतिसादानंतर २२ महिन्यांपासून निलंबित असलेलं ट्रम्प यांचं ट्विटर खातं सुरू करण्यात आलं आहे. मात्र, आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतण्यास रस नसल्याचं ट्रम्प यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.

  • एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच या कंपनीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कंपनीची सूत्र हाती घेताच मस्क यांनी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी देताच कंपनीत राजीनामासत्र सुरू झाले आहे.

लवकरच लाँच होणार ‘या’ छोट्या कार, बाजारात घालणार धुमाकूळ :
  • सिडान कार आरामदायक प्रवासाची खात्री देते. त्यात सामान ठेवण्यासाठीही भरपूर जागा असते. मात्र मोठी आणि आकाराने लांब असल्याने अनकेदा तिला पार्क करणे किंवा गर्दीतून काढणे कठीण होऊन बसते. त्यामुळे छोट्या कार्सना नागरिक पसंती देतात. छोटी कार पार्किंग स्पेस कमी घेते आणि गर्दीतून किंवा वाहतुकीतून सहज पुढे जाऊ शकते. तुम्ही जर छोटी कार घेण्याचा विचार करत असाल तर पुढील वर्षी, म्हणजे २०२३ साली काही छोट्या कार्स बाजारात उपलब्ध होणार आहेत. आज आपण या कार्सबाबत जाणून घेऊया.

  • १) एमजी एअर ईव्ही : MG AIR EV वाहन २०२३ मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनी या इलेक्ट्रिक कारला जनेवरी महिन्यात आयोजित दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करू शकते. ही कार टाटा टियागो ईव्हीला टक्कर देणार असल्याचे सांगितल्या जाते. कारची किंमत १० लाखांपर्यंत असू शकते. कारमध्ये २० ते २५ किलोवॉट हवरचे बॅटरी पॅक मिळू शकते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.

  • २) नवीन पिढीची मारुती स्विफ्ट : उत्तम मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीत मिळत असल्याने ग्राहक मारुती सुझुकीच्या कार्सना पसंती देतात. मारुती सुझुकीची स्विफ्ट छोट्या कार्समधून एक आहे. नवीन पिढीची मारुती सुझुकी स्विफ्ट २०२४ मध्ये बाजारात उपलब्ध होऊ शकते. माध्यमांतील अहवालानुसार, २०२४ मारुती स्विफ्ट टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध होऊ शकते. कारमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते.

  • ३) ह्युंडाई ग्रँड आय १० निओ फेसलिफ्ट : या कारला पुढील वर्षी मिड लाईफ अपडेट मिळेल. या मॉडेलची सध्या चाचणी सरू आहे. नवीन मॉडेलमध्ये नवीन ग्रिल, एलईडी डीआरएल्ससह सुधारित हेडलॅम्प्स, अद्ययावत रिअर बंपर आणि नवीन डिजाईन केलेले टेल लॅम्प्स मिळतील. ह्युंडाई ही कार नवीन रंग पर्यायांसह देखील उपलब्ध करू शकते. कारला आतून नवीन अपहोल्स्टेरी मिळू शकते.

  • ४) सिट्रिऑन सी ३ ईव्ही : नवीन Citroen C3 EV ही २९ सप्टेंबर २०२२ रोजी लाँच होणार होती. मात्र, काही कारणास्तव हे लाँच रद्द करण्यात आले. आता ही कार २०२३ साली लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार ५० किलोवॉट हवर बॅटरी पॅकसह उपलब्ध होऊ शकते. फुल चार्जवर ही कार ३५० किमी रेंज देण्याची शक्यता आहे. कंपनी लहान बॅटरी पॅक असलेली कार देखील उपलब्ध करू शकते, जी ३०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल.

‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर यवतमाळच्या तरुणीची छबी :
  • जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) येथील पंकज व श्वेता महल्ले या शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या ‘स्टार्टअप’ने ‘फोर्ब्स आशिया’च्या यादीत स्थान मिळवल्यानंतर आता ग्रामहितच्या संस्थापक संचालक श्वेता पंकज महल्ले (ठाकरे) यांनी अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या ‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर स्थान मिळवले आहे.

  • श्वेता यांच्या या यशाने जिल्ह्याचा लौकिक जगभर झाला आहे. ‘फोर्ब्स’चा आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ‘फोर्ब्स’च्या या अंकाच्या मुखपृष्ठावर अन्य चार तरुण व्यावसायिकांसोबत श्वेता यांचे छायाचित्र झळकले आहे. ‘फोर्ब्स’ हे मासिक वित्त, उद्योग, गुंतवणूक आणि विपणन, तंत्रज्ञान, संप्रेशन, विज्ञान, राजकारण, कायदा आदी विषयांवर अंक प्रकाशित करते.

  • ‘फोर्ब्स’ने दखल घ्यावी यासाठी या क्षेत्रात कार्य करणारे तरुण कायम धडपडत असतात. सामाजिक स्तरावरील समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने व कल्पकतेने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची ‘फोर्ब्स’कडून दखल घेतली जाते.

  • कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना ‘फोर्ब्स’कडून प्रोत्साहन मिळते. यावर्षी ‘फोर्ब्स’च्या यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत ग्रामहितने स्थान मिळवले. या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणे ही गौरवास्पद कामगिरी समजली जाते. श्वेता यांनी पती पंकज यांच्यासमवेत ग्रामहित ही शेतकऱ्यांसाठी शेतमाल विपणन क्षेत्रात काम करणारी कंपनी स्थापन करून अवघ्या दोन वर्षांत जागतिक स्तरावर मानांकन मिळवल्याने जिल्ह्याचाही लौकिक वाढला आहे.

यूपीआय अ‍ॅप्सवरून आर्थिक व्यवहारांना लागू शकते मर्यादा, काय आहे कारण? जाणून घ्या :
  • यूपीआय अ‍ॅप्समुळे रोखरहित व्यवहार वाढला आहे. खरेदी करताना अनेक लोक आता कॅशऐवजी गुगल पे, फोन पे या सारख्या यूपीआय अ‍ॅपद्वारे व्यवहार करत आहेत. याचा फायदा म्हणजे, खिशात मोठी कॅश बाळगण्याची आता आवश्यकता नाही. तसेच, या अ‍ॅप्सवरून अमर्यादित व्यवहार करता येतात. मात्र, याला आता मर्यादा लागण्याची शक्यता आहे.

  • नॅशनेल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) थर्ड पार्टी यूपीआय अ‍ॅप पुरवठादारांसाठी (टीपीएपी) असलेल्या व्हॉल्यूम कॅपवर मर्यादा घालण्याची प्रसत्वावित ३१ डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत अंमलात आणण्याची शक्यता असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. असे झाल्यास देशातील नागरिकांना पोन पे, गुगल पे आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सवरून अमर्यादित व्यवहार करणे अशक्य होणार आहे.

  • सध्या गुगले पे आणि फोन पे हे दोन यूपीआय पेमेंट अ‍ॅप्स बाजारातील ८० टक्के वाट्यासह आघाडीवर आहेत. कोणत्याही यूपीआय अ‍ॅपची मक्तेदारी टाळण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये ३० टक्के व्हॉल्यूम कॅपचा प्रस्ताव एनपीसीआयने पाठवला आहे. आरबीयाने तो मान्य करावा अशी एनपीसीआयची मागणी आहे. सध्या फोन पे, पेटीएम, गुगल पे आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सवरून व्यवहारावर कुठलीही मर्यादा नाही. मात्र, प्रस्ताव मंजूर झाल्यास व्यवहारावर मर्यादा लागण्याची शक्यता आहे.

  • अहवालानुसार, प्रस्तावानंतरची सद्यस्थिती सर्वसमावेशकपणे समजून घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एनपीसीआय, वित्त मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

‘ही’ जगातील सर्वात मोठी चूक.. विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओत दिलं थेट उत्तर :
  • एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडशी सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्ल्यूने टी २० सामन्यांमध्ये १-० असा विजय मिळवला होता तर आता शिखर धवनच्या नेतृत्वात आजपासून एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर राहून विराट कोहली सध्या विश्रांती घेत आहे. टी २० विश्वचषकात विराटच्या तुफानी खेळीने भारताला अनेक सामने जिंकून दिले होते मात्र अखेरीस सेमी फायनलमध्ये इंग्लंडसमोर भारताची जादू चालली नाही व टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर पडली यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के. एल. राहुल व विराट कोहली या मुख्य खेळाडूंना विश्रांतीसाठी ब्रेक देण्यात आला होता. या विश्रांतीचा पुरेपूर वापर करून विराटने पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

  • ३४ वर्षीय विराट कोहली हा आपल्या फिटनेससाठीही ओळखला जातो. गुरुवारी जिममध्ये घाम गालात असताना त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘Back At It’ अशा कॅप्शनसह या व्हिडिओमध्ये कोहली ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. जर तुम्ही कोहलीला फॉलो करत असाल तर त्याने अनेक व्हिडीओजमधून हे सांगितले आहे की, कोहली व अनुष्का हे दोघेही पूर्णतः शाकाहारी आहेत, यावरूनच सध्या व्हायरल होणाऱ्या कोहलीच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली होती.

  • कोहलीच्या पोस्टवर फॅन म्हणाला की, “आणि लोकं असं सांगतात की तुम्ही मांस खाल्ले नाही तर तुम्ही मस्क्युलर होऊ शकत नाही,” याच कमेंटवर स्वतः कोहलीने उत्तर देत म्हंटले की, हा जगातील सर्वात मोठा गैरसमज आहे. विशेष म्हणजे कोहली हा स्वतः आधी मांसाहारी होता मात्र काही वर्षांपूर्वी पत्नी अनुष्का शर्मासह त्याने आरोग्याच्या कारणासाठी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.

25 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.