चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ नोव्हेंबर २०२१

Date : 25 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी :
  • दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत या भारतीयांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

  • महिला एकेरीत सिंधूने पहिला गेम गमावल्यावर दमदार पुनरागमन करताना जपानच्या अया ओहोरीला १७-२१, २१-१७, २१-१७ असे पराभूत केले. सिंधूचा दुसऱ्या फेरीत २३ वर्षीय जर्मन खेळाडू यव्होने लिसोबत सामना होईल.

  • पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतने भारताच्याच एच एस प्रणॉयवर २१-१५, १९-२१, २१-१२ अशी सरशी साधली. दुसरीकडे, प्रणीतने फ्रान्सच्या तोमा ज्युनियर पोपोव्हचा २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत त्याच्यापुढे ख्रिस्टो पोपोव्हचे आव्हान असेल.

  • मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि ध्रुव कपिला या जोडीवर पहिल्या फेरीत जपानच्या क्योही यामाशिता आणि नारु शिनोयाने ७-२१, १२-२१ अशी मात केली. रेड्डीला अश्विनी पोनप्पासह खेळताना महिला दुहेरीतही पराभव पत्करावा लागला. त्यांना गॅब्रिएला स्टोएव्हा आणि स्टेफानी स्टोएव्हाने २७-२९, १८-२१ असे नमवले. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतल्यामुळे त्यांना दुसऱ्या फेरीत चाल देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत :
  • आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच, म्हणजे कदाचित या वर्षअखेरीस पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याचे नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी बुधवारी सांगितले.

  • करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर भारतातून जाणारी व येथे येणारी प्रवासी विमान वाहतूक मार्च २०२० पासून स्थगीत असून, या स्थगितीची मुदत ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी भारताची २५ हून अधिक देशांसोबत ‘एअर बबल’ व्यवस्था आहे. या व्यवस्थेअंतर्गत, दोन देशांमधील विमान कंपन्या काही अटींच्या अधीन राहून एकमेकांच्या भूप्रदेशात विमानांचे संचालन करू शकतात.

  • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याच्या प्रक्रियेचे सरकार मूल्यमान करत असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले होते. जगाच्या काही भागांतील करोनाविषयक परिस्थिती लक्षात ठेवून भारत सामान्य परिस्थितीत येऊ इच्छितो, असे ते म्हणाले होते.

दिल्लीत शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू :
  • राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने बंद केलेल्या शाळा, महाविद्यालये सोमवार, २९ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येतील अशा घोषणा दिल्ली सरकारचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी बुधवारी केली. दिल्ली सरकारने आज घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

  • सोमवारपासून सर्व सरकारी कार्यालयेही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सरकारी कर्मचारी घरून काम करत होते. राय यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्याचे आवाहन केले. त्यांच्यासाठी विशेष बस सोडण्यात येतील. तसेच २७ नोव्हेंबरपासून अत्यावश्यक सेवांसाठी असणाऱ्या सर्व सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाईल, असे राय यांनी सांगितले.  

  • इतर इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावरील बंदी ३ डिसेंबपर्यंत कायम राहील, असे  राय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर सांगितले. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि कामगारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दिल्ली सरकारने सोमवारी बांधकाम करण्यावरील आणि पाडकामावरील बंदी उठवली.

  • दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय १३ नोव्हेंबर रोजी घेतला होता.

लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होत संभाव्य विनाश होऊ नये यासाठी नासाची ‘चाचणी’ मोहिम :
  • असा एक अंदाज वर्तवला जातो की सुमारे सहा ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एका मोठा लघुग्रह आदळला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट झाली, विशेषतः त्यावेळी पृथ्वीवर मुक्त संचार करणारे डायनॉसोरही पुर्णपणे नष्ट झाले.

  • शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवर लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह हे अनेकदा आदळले आहेत आणि यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. मग आत्ताच्या काळात एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर ? अशी लघुग्रहाची टक्कर टाळणे शक्य आहे का ? तेव्हा भविष्यात होऊ घातलेली लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी नासाने मोहिम हाती घेतली आहे.

  • नासा सध्या DART-Double Asteroid Redirection Test या मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीला धोका नसलेले पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन जवळुन प्रवास करणाऱ्या अनेक लघुहग्रहांपैकी एका लघुग्रहावर नासा एक यान अत्यंत वेगाने धडकवणार आहे.

  • या माध्यमातून त्या लघुग्रहाची दिशा बदलवता येते का, लघुग्रहावर काय परिणाम होतो असा अभ्यास करणार आहे. या मोहिमेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग भविष्यात पृथ्वीवर आदळणाऱ्या संभाव्य लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी केला जाणार आहे.

पहिली ते चौथीच्या शाळा लवकरच सुरू? ; मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय अपेक्षित :
  • राज्यात करोनाची साथ आटोक्यात आल्याने राज्यात पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळाही लवकरच सुरू करण्याबाबत वैद्यकीय कृती गटाने मान्यता दिल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले.

  • राज्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करुन अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी लसीकरण सुरु केले जाणार असून १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. पण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा प्रश्न आहे.

  • लहान मुलांचे लसीकरण होईपर्यंत त्यांना करोना होण्याची भीती आहे. पण मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असून पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही.

  • वैद्यकीय कृती गटाने काही अटी व नियम घालून आणि काटेकोर उपाययोजना करुन प्राथमिक शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. गेले दीड वर्षे शाळा बंद असल्याने त्या सुरू करण्यासाठी पालकांचाही दबाव आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होईल, असे टोपे यांनी नमूद केले.

२५ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.