चालू घडामोडी आणि दिनविशेष - 25 डिसेंबर 2023

Date : 25 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील कापूस उत्पादनात यंदा आठ टक्के घट; ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’चा दुसरा अहवाल जाहीर
  • देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार असून उत्पादन २९५ लाख गाठींपर्यंत होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) वर्तवला आहे. कापसाचा वापर यंदाही कमी राहणार असला, तरी कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन २२ लाख गाठींवर पोहोचेल, असे ‘सीएआय’च्या हंगामातील दुसऱ्या अहवालात म्हटले आहे.
  • ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९५ लाख कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. यंदा आयात ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूसपुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे ‘सीएआय’ने म्हटले आहे. देशातील कापूस वापर गेल्या वर्षी इतकाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती.
  • मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोहोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. ‘सीएआय’ने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असे म्हटले आहे. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती.

अधिक उत्पादन कुठे?

  • मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात १७५.६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांत गेल्या हंगामात १९०.६७ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. खराब हवामानामुळे या राज्यांत कपाशीच्या पिकावर परिणाम झाला आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ४०.६६ लाख गाठी, दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये ६५.४० लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
आर्क्टिकवर आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा ? जाणून घ्या जगावर काय परिणाम होणार…
  • जागतिक हवामान बदलाचा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळील आर्क्टिक प्रदेशाला मोठा फटका बसत आहे. आर्क्टिक प्रदेशाने २०२३मध्ये आजवरचा सर्वांत उष्ण उन्हाळा अनुभवला आहे. परिसरात वेगाने तापमानवाढ होत असून, परिसंस्था, मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. जगातील अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक परिसर वेगाने गरम होत आहे, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेने अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक (नोआ) या संस्थेच्या हवाल्याने दिली आहे.
  • नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फरिकने (नोआ) वार्षिक आर्क्टिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्या अहवालात म्हटले आहे, जगातील अन्य भागांच्या तुलनेत आर्क्टिक परिसर वेगाने गरम होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वेगाने वितळत आहे. सन २०२३ चा उन्हाळा आजवरचा सर्वांत उष्ण ठरला आहे. ग्रीनलॅण्डमधील तापमानवाढीने बर्फ वितळण्याच्या वेगाने आजवरचा उच्चांक गाठला आहे. उत्तर कॅनडातील तापमानवाढीमुळे पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी झाली. उष्णतेत वाढ झाल्यामुळे जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सन १९०० नंतर २०२३ हे वर्ष सहावे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. सन १९७९नंतर आर्क्टिक प्रदेशाचे उपग्रहाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू झाले, तेव्हापासून यंदा बर्फ वितळण्याच्या वेगाने उच्चांक गाठल्याचे, ग्रीनलँडमध्ये हिवाळ्यात जास्त बर्फ साचूनही उन्हाळ्यात कमी बर्फ राहिल्याचे आणि वेगाने बर्फ वितळल्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पतींची वाढ होऊन तो यंदा हिरवागार झाल्याची छायाचित्रे उपग्रहांनी टिपली आहेत.

तापमानवाढीचा वेग ०.५ अंश सेल्सिअस

  • आर्क्टिक प्रदेशात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान प्रत्येक दशकात सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानवाढ होत आहे. तापमानवाढीमुळे २५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरील बर्फ वितळण्याचा धोका आहे. ही तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रणाची गरज आहे, असेही नोआने नमूद केले आहे.

नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले

  • आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढणे, समुद्राचे तापमान वाढणे, वाऱ्याचा वेग, प्रवाहात बदल होणे, तसेच दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळे, चक्रीवादळांच्या संख्येत वाढ होणे, अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना जगाला करावा लागत आहे.
देशभरात २४ तासांत आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, सक्रीय रुग्णसंख्या ३७४२, महाराष्ट्रातही शंभरी पार
  • देशात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. त्यामुळे भारताने सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला करोनाचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दररोज शेकडो नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोव्हिड-१९ चे ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
  • सध्या देशात ३,७४२ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १२८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये तीन हजार सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. तर कर्नाटकमध्ये २७१ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये ९६ नवे रुग्ण सापडले आहेत. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात सध्याच्या घडीला १०३ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
  • संपूर्ण भारतात शुक्रवारी (२२ डिसेंबर) ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले होते. एकट्या केरळमध्ये २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले होते. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारीदेखील देशभरात शेकडो नवे रुग्ण आढळले. देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत.

धनंजय मुंडे यांना करोना

  • दरम्यान, महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः यांनी फेसबूकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी कोव्हिड-१९ ची तपासणी केली. यामध्ये मी पुन्हा एकदा कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास होती नाहीये, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी मागील चार दिवसांपासून क्वारन्टाईन (विलगीकरण कक्षात) राहून योग्य उपचार घेत आहे. सध्या काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईन.
आयपीएलमुळे सुरक्षा रक्षकाचा मुलगा झाला करोडपती; म्हणाला, “आता देशासाठी खेळेन अन् वर्ल्ड कप…”
  • दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक तरुण आणि प्रतिभावान क्रिकेटपटू करोडपती होतात. यातील अनेक खेळाडू देशासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळतात आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देतात. जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पंड्या आणि शुबमन गिलपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये करोडपती झाल्यानंतर देशासाठी चांगली कामगिरी करत आहेत. सध्या हे खेळाडू टीम इंडियाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
  • २०२४ च्या या मिनी आयपीएल लिलावातही अनेक युवा खेळाडू करोडपती झाले आहेत. समीर रिझवीपासून शुभम दुबे आणि कुमार कुशाग्रापर्यंत अनेक खेळाडू यावेळी महागात विकले गेले. या यादीत झारखंडच्या रॉबिन मिन्झचेही नाव आहे. त्याला गुजरात संघाने ३.६ कोटी रुपयांना विकत घेतले, तेव्हापासून तो सतत चर्चेत राहिला.
  • रॉबिन मिन्झचे वडील रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक आहेत आणि लिलावापूर्वी धोनीने त्याला वचन दिले होते की जर कोणत्याही संघाने त्याच्यावर सट्टा लावला नाही तर चेन्नई सुपर किंग्ज संघ त्याला खरेदी करेल. तथापि, अनेक संघांनी रॉबिनला विकत घेण्यासाठी स्पर्धा केली. चेन्नईशिवाय हैदराबादनेही त्याच्यावर बोली लावली. अखेर गुजरातने त्यांचा संघात समावेश केला.
  • रॉबिन मिन्झ हा अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे आणि लहानपणी तो सरपण पासून बॅट बनवून क्रिकेट खेळत असे. एवढी आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याच्या कुटुंबाने त्याला खेळण्यापासून कधीही रोखले नाही. याच कारणामुळे कठीण आव्हानांवर मात करत तो इथपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या प्रशिक्षकानेही त्याला नेहमीच साथ दिली आणि हा होतकरू खेळाडू सर्व अडचणींवर मात करून आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी मुलगा तयार आहे. या लीगमध्ये सामील होणारा तो पहिला आदिवासी भागातील खेळाडू ठरला आहे.

25 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.