चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ डिसेंबर २०२१

Date : 25 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात करोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनमुळे येणार, IIT च्या संशोधकांचं भाकित; तारीखही सांगितली :
  • जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचं चित्र दिसत आहे. दिवसोंदिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ८९ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत.

  • भारतामध्येही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाकळण्यासाठी निर्बंध लागू करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. त्यातच आता ओमायक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट देशात येणार का यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्यात. असं असतानाच आता तज्ज्ञांनी भारतामधील करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाकित व्यक्त केलंय.

  • संशोधकांचं म्हणणं काय - कानपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात अभ्यास केलाय. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनुसार ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशात लवकरच करोना संसर्गाची तिसरी लाट येणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत करोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल असंही संशोधकांनी म्हटलं.

बारावी वेळापत्रकात बदल करण्याची राज्य भूगोल परिषदेची मागणी :
  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  १२ वीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. या वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणींचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे. तो केला नसल्याने जाहीर केलेले वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड व राज्य मंडळाकडे कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेने निवेदनाद्वारे  केली आहे.

  • भूगोल परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सतीश शिर्के व सचिव प्रा. युवराज खुळे यांनी ही माहिती दिली. निवेदनात म्हंटले,की १२ वी साठी भूगोल हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांना शिकविला जात असून हा विषय घेणाऱ्या परीक्षार्थीची संख्या जास्त आहे. मागील १८ वर्षांपासून हा पेपर सकाळ सत्रात घेतला जात होता. परंतु यंदा तो अचानक दुपारच्या सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

  • पेपरचा क्रम निश्चित करताना विषयाची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही. भूगोल विषयाचा पेपर उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान विषयाचे विद्यार्थी एका पेपरसाठी अडकून पडणार आहेत. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सकाळ-दुपार अशी पेपरची वेळ निश्चित करताना त्या विषयातील परीक्षार्थीची संख्या विचारात घ्यावी. जास्त विद्यार्थी संख्या असणारे पेपर सकाळी व कमी विद्यार्थी संख्या असणारे पेपर दुपारी ठेवावेत, जेणेकरून कमी विद्यार्थ्यांची व कमी केंद्राची गैरसोय होईल.

डॉ. अरुण मांडे यांना ‘धन्वंतरी सन्मान पुरस्कार’ प्रदान :
  • ‘आरोग्य भारती’ संस्थेच्या वतीने  देण्यात येणारा ‘धन्वंतरी सन्मान पुरस्कार’ यंदा डॉ. अरुण मांडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. संस्थेचे अखिल भारतीय संघटन सचिव अशोक वाष्र्णेय यांच्या हस्ते पुरस्कार डॉ. मांडे यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला.

  • सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे प्रांत सदस्य डॉ. किशोरकुमार पूरकर, पश्चिम क्षेत्र संयोजक मुकेश कसबेकर, जिल्हाध्यक्ष अशोकराव करंदीकर, श्रीपाद शिंदीकर, मिलिंद चवंडके, प्रकाश गोसावी, ज्योती गोसावी, डॉ. पौर्णिमा पुरकर, निर्मला मांडे आदी उपस्थित होते.

  •  पूरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन करून डॉ. मांडे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील निरपेक्ष योगदानाची माहिती दिली. डॉ. मांडे यांच्या कार्याचा गौरव करून वाष्र्णेय म्हणाले,की आजारी व्यक्तीची प्रामाणिकपणे सेवा करणे हा वैद्यकीय सेवेचा मूळ हेतू आहे. अलिकडे आजारी व्यक्तीला विविध तपासण्यांमध्ये अडकवून आर्थिकदृष्टय़ा लुटण्याचे सुरू झालेले काम वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणारे आहे. उच्चतंत्रज्ञान व अद्ययावत मशिनरी हाती असूनही अचूक निदान करता येत नाही, ही वस्तुस्थिती मन सुन्न करते.

  • रुग्णाशी चर्चा करायला डॉक्टरांना वेळ नाही. जास्तीत जास्त रुग्ण हाताळण्यात धन्यता मानली जाते. चर्चा करण्यामधून समोर येणारे नवनीत रुग्णास आजारपणामधून कायमस्वरूपी बाहेर काढण्यास उपयुक्त ठरते. आज अशा डॉक्टरांचीच समाजाला खरी गरज आहे. सत्कारास उत्तर देताना डॉ.अरुण मांडे म्हणाले, रुग्णसेवा करताना अनेक कुटुंबांचा ‘फॅमिली डॉक्टर’ होता आले, याचे समाधान वाटते. निर्मला मांडे यांनी भक्तिगीत गायले.

उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यूची घोषणा; लग्नातील उपस्थितीवरही बंधनं; महाराष्ट्रात काय निर्णय होणार :
  • ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून पूर्वकाळजी घेण्याचे तसंच गरज पडल्यास निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.

  • देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस्मसपासून उत्तर प्रदेशात याची अमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशात २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.

  • याशिवाय योगी आदित्यनाथ सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधनं आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये करोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करावं लागेल असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नाईट कर्फ्यू लागल्यानंतर लोकांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर फिरण्याची मुभा नसेल.

एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळल्यानंतर ९ कामगार निलंबित :
  • एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर व यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

  • न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित ९ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

  • लातुर व यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी विरोधात नियोजीत कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करून, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.

  • या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालय, लातुर व यवतमाळ यांच्याकडे तक्रार (युएलपी) दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असतील निर्बंध :
  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
  • याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

२५ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.