चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 25, 2021 | Category : Current Affairs


‘तालिबानचे मूल्यमापन कृतींवरून’ :
 • तालिबानच्या वर्तनाचे मूल्यमापन त्यांच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतींवरून केले जाईल असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जी ७ बैठकीच्या अगोदर केले आहे. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी ही आभासी बैठक होत आहे.

 • तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता १५ ऑगस्ट रोजी हस्तगत केली असून अध्यक्ष अशरफ घनी यांना   देशातून पलायन करावे लागले होते.

 • दरम्यान, डाउनिंग स्ट्रीटने म्हटले आहे की, जॉन्सन यांनी जी ७ देशांची बैठक बोलावली असून त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. या देशांनी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभे रहावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ब्रिटनने अफगाणिस्तानला आधीच मदत  केली आहे तशीच इतर देशांनीही केली आहे, असे सहकार्य पुढेही चालू ठेवण्याची आवश्यकता जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे.

 • अफगाणिस्तानात मानवी हक्कांचे संरक्षण करून त्या भागात स्थिरता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याला आपले प्राधान्य राहील, असेही त्यांनी म्हटले आहे, अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत  संयुक्त दृष्टिकोन असावा यासाठी जी ७ देशांची परिषद बोलावल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी ब्रिटन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लसीकरणाची नोंदणी आता व्हॉट्स अ‍ॅपवर :
 • व्हॉट्सअ‍ॅप या संदेशवहन उपयोजनावर आता करोना प्रतिबंधक लसीकरणाची वेळ घेता येणार आहे, वापरकर्ते त्यांच्या जवळच्या केंद्रात माय गव्ह करोना हेल्पडेस्कच्या मदतीने नाव नोंदवू शकणार आहेत.

 • ५ ऑगस्टला माय गव्ह व व्हॉटसअ‍ॅप यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा चॅटबोटच्या मार्फत दिली होती. ३२ लाख प्रमाणपत्रे त्यावरून डाऊनलोड करण्यात आली आहेत.

 • मायगव्ह करोना हेल्पडेस्क व्हॉटसअपवर तयार करण्यात आले असून मार्च २०२०  पासून त्यावर करोनाबाबतची खरी माहिती अफवा टाळण्यासाठी दिली जात आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ते उपयोगी ठरले आहे. ४ कोटी १० लाख वापरकर्त्यांंनी या उपयोजनाचा लाभ घेतला आहे.

 • माय गव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, मायगव्ह करोना हेल्पडेस्क हा क्रांतिकारी मार्ग असून त्यातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. हॅपटिक व टर्न डॉट आयो यांचीही मदत यात घेण्यात आली आहे. आता त्यात लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय जवळची लसीकरण केंद्रेही शोधता येणार आहेत. त्यात कुठल्या वेळेला लस घ्यायची हेही ठरवता येईल. लसीकरण प्रमाणपत्रेही डाऊनलोड करता येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही व्यवस्था असून चॅटबोटच्या मदतीने ते साकारण्यात आले आहे. देश डिजिटलायझेशनमध्ये सक्षम होत असल्याचे ते निदर्शक आहे.

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यात चर्चा :
 • तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर परिस्थिती चिघळली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. अफगाणिस्तानातील स्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. अफगाणिस्तान भारताच्या शेजारी असल्याने भारताच्या चिंतेतही वाढ झाली. भविष्यात दहशतवाद आणखी वेगाने फोफावण्याची भीती भारताने व्यक्त केली आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जवळपास ४५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला.

 • “माझी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी अफगाणिस्तानातील स्थितीवर चर्चा झाली. तिथल्या घडामोडींवर आम्ही सविस्तर मुद्दे मांडले आणि विचार विनिमय केला. त्याचबरोबर करोनाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय अजेंड्यावरही चर्चा केली. यापुढेही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत राहतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

 • “अफगाणिस्तानातील स्थितीवर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. देशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला. अफगाणिस्तानातून डोकं वर काढणारी दहशतवादी विचारधारा आणि अंमली पदार्थांची तस्करी याचा संभाव्य धोका पाहता दोन्ही देशात चर्चा झाली. यासाठी दोन्ही देशांनी एक स्थायी द्विपक्षीय तोडगा काढण्याचं मान्य केलं आहे.”, असं रशियन सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणखी लांबणीवर :
 • एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न अद्यापही सुटला नसून जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिना संपत आला असतानाही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. वेतनसंदर्भात पुढील आठवडय़ात बैठक होणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. वेतन लांबणीवरच पडत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.

 • करोना आणि निर्बंधांमुळे एसटीचे उत्पन्न घटले. त्यामुळे गेल्या वर्षांपासूूनच वेतन देणेही अवघड झाले आहे. एसटीला दैनंदिन खर्चासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने महामंडळाने राज्य शासनाकडे मदतनिधी मागितला. त्यानुसार शासनाने निधी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या सहा महिन्यांचे वेतन देण्यात आले. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही एसटीचे प्रवासी आणि उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटी महामंडळाच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिला नाही. परिणामी राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन अद्याप झालेले नाही.

 • वेतनावर तोडगा काढावा यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटलांकडेही एसटीतील संघटनांनी मागणी के ली आहे. यासंदर्भात सतेज पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून दरवेळी निधी उपलब्ध झाला. परंतु करोनाकाळात शासनाच्या तिजोरीतही पुरेसा पैसा नाही. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न के ला जात आहे. पुढील आठवडय़ात बैठक होऊन तोडगा निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.

माजी फुटबॉलपटू चंद्रशेखर यांचे निधन :
 • भारताचे माजी फुटबॉलपटू ओ. चंद्रशेखर मेनन (८५ वर्षे) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही महिने चंद्रशेखर विविध आजारांनी ग्रासले होते. मंगळवारी कोची येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रशेखर यांनी १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

 • चंद्रशेखर यांनी भारतीय संघाचे नेतृत्वपदही भुषवले. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. १९५८ ते १९६६च्या काळात एकूण २५ सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. स्थानिक फुटबॉलमध्ये १९५९ ते १९६५ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक :
 • ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४० पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) यांनी मंगळवारी दिली.

 • करोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ‘आयओसी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ ते २०३२ पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र २०३६, २०४०च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत, असे बाख यांनी सांगितले.

 • ‘‘२०३६ आणि २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले.

२५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)