सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताचीच! केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या चालू आर्थिक वर्षासाठीच्या अहवालाचा दावा
- जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कायम राहील, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अहवालात सोमवारी वर्तविण्यात आला. देशांतर्गत भक्कम वित्तीय स्थिती आणि महागाईचा दर सौम्य राहण्याची अपेक्षा यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- सप्टेंबरचा मासिक आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, पर्शियन आखातातील सुरू असलेल्या घडामोडी आणि परिस्थितीत होणाऱ्या बदलांनुसार खनिज तेलाच्या भावात वाढ होण्याची शक्यता यामुळे जागतिक पातळीवरील अनिश्चितता आहे. अमेरिकेत पतधोरण अजूनही कठोर पातळीवर असून, त्यामुळे वित्तीय स्थितीवर परिणाम होऊ शकतो. सध्या अमेरिकेतील भांडवली बाजारांमध्ये वाढ होण्यापेक्षा घसरण होण्याचा धोका अधिक आहे. जर घसरण झाली तर त्याचे परिणाम इतर बाजारांवरही होतील. भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर जोखीम वाढू शकते. ही जोखीम आणखी वाढून कायम राहिल्यास त्याचा परिणाम भारतांसह इतर देशांतील आर्थिक घडामोडींवर होऊ शकतो.
- चालू आर्थिक वर्षात भारताच्या समष्टी अर्थव्यवस्थेविषयक अनुमान चांगले आहेत. देशांतर्गत वित्तीय स्थिती भक्कम आहे. याचबरोबर क्रयशक्ती आणि गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. आगामी रब्बी हंगामातील उत्पादनाने धान्यसाठ्यामध्ये सुधारणा होईल. खाद्यवस्तूंची महागाई कमी झाली असून, मूळ महागाईही कमी होत आहे. कमी झालेली व्यापारी तूट आणि पुरेशी परकीय गंगाजळी यामुळे भारताची बाह्य आर्थिक स्थिती चांगली आहे. रिझर्व्ह बँकेने निर्मिती, ग्राहक विश्वास, रोजगार आणि महागाईबाबत केलेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचे स्थान चालू आर्थिक वर्षात कायम राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही वर्तविला आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि भू-राजकीय आव्हाने असूनही भारताच्या आर्थिक ताकदीबाबत जागतिक विश्लेषकांचा आत्मविश्वास वाढत आहे.
गिनीज बुकात नोंद झालेल्या जगातल्या सर्वात वृद्ध श्वानाचं निधन, ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
- फेब्रुवारी २०२३ या महिन्यात बॉबी या श्वानाच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आला. कारण ३० वर्षे २६६ दिवस जगलेला जगातला तो एकमेव श्वान ठरला होता. मात्र आता वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. बॉबी नावाच्या श्वानाचं वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झालं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटनेच हे वृत्त दिलं आहे.
- बॉबी हा श्वान पोर्तुगालच्या लीरिया प्रांतातल्या कॉनकिरोज शहरातल्या एका गावात कोस्टा परिवारात वास्तव्य करत होता. राफिरो डो एलनतेजो या ब्रिडचा तो श्वान होता. खरंतर श्वानाचं आयुष्य हे सरासरी १२ ते १५ वर्षे असतं. मात्र बॉबी हा ३१ वर्षे जगला. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलिनय कॅटल डॉग ब्लुईच्या नावे होता. ब्लुई १९१० ते १९३९ अशी २९ वर्षे जगला होता. मात्र बॉबी हा श्वान ३१ वर्षे जगला. बॉबीच्या जन्माची नोंद लीरियाच्या व्हेटरीनरी मेडिकल सर्विल ऑफ लीरिया मध्ये करण्यात आली आहे.बॉबीचा जन्म ११ मे १९९२ रोजी झाला होता. त्याच्या वयाचं वर्ल्ड रेकॉर्ड नुकतंच म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये झालं होतं. त्यानंतर आता याच बॉबी या श्वानाचा मृत्यू झाला आहे. कोस्टा कुटुंबाचा हा पाळीव श्वान होता. त्याची गोष्टही रंजक आहे. ३८ वर्षीय लियोनल कोस्टा म्हणाले होते, माझे वडील शिकारी होते, त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो आणि आमच्याकडे अनेक पाळीव श्वान होते. त्यामुळे नव्या पिल्लांना आपण नको ठेवुयात असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं.
- घरातल्या श्वानांना जेव्हा पिल्लं झाली त्यातच एक बॉबीही होता. माझ्या वडिलांनी इतर पिल्लांना सोडून दिलं. पण बॉबीला त्यांनी पाहिलं नाही. मग तो आमच्याबरोबरच राहिला. माझ्या आईने म्हणजे गीराने बॉबीला वडिलांच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने सांभाळलं. वडिलांना समजलं तेव्हा बराच उशीर झाला होता. पण मग त्यांनीही त्याला स्वीकारलं आणि मग बॉबी हा श्वान आमच्या कुटुंबाचाच एक भाग झाला असं लियोनेलने सांगितलं होतं. जगातल्या सर्वात वृद्ध श्वानाचा आता मृत्यू झाला आहे.
भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन
- ७० च्या दशकात भारतीय फिरकी आक्रमणाचा कणा ठरलेले महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत.
भारताचा पहिला एकदिवसीय विजय!
- इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासह बिशन सिंग बेदी ही चार नावं भारतीय फिरकीच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचं एक नवं युग या चौघांनी सुरू केलं. त्यात बिशन सिंग बेदी यांचा वाटा मोठा होता. भारताच्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या अद्भुत अशा स्पेलमुळे भारतानं विजय साकारला होता.
- १९७५ सालच्या विश्वचषक सामन्यामध्ये इस्ट आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यावेळी बिशन सिंग बेदी यांच्या जादुई फिरकी गोलंदाजीमुळे इस्ट आफ्रिका संघाला १२० धावांवर रोखणं भारताला शक्य झालं. या सामन्यात बेदी यांनी १२ षटकांतली तब्बल ८ षटकं निर्धाव टाकली होती. उरलेल्या चार षटकांत सहा धावांच्या मोबदल्यात त्यांनी एक गडी बाद केला होता.
- बिशन सिंग बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी अमृतसरमध्ये झाला होता. तेव्हा त्यांच्या फिरकी गोलंदाजीच्या विशिष्ट शैलीमुळे ते चर्चेत आले होते. २०व्या वर्षी, अर्थात १९६६ साली त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली.
२०२४ ला सर्व निवडणुका एकत्र होणार? वाचा नेमकं काय घडतंय…
- गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. महिला आरक्षण विधेयकासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनातच यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. यासाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, विशेष अधिवेशनात हा मुद्दा चर्चेसाठी आला नाही. पण यासंदर्भात सरकारी पातळीवर वेगवान हालचाली होत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबतच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात नेमक्या दिल्ली काय घडामोडी घडत आहेत?
- विधी आयोग लवकरच अहवाल देण्याच्या तयारीत?
- विधी आयोग लवकरच ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अर्थात ‘एक देश, एक निवडणूक’संदर्भात आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या अहवालाच्या माध्यमातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्द्याला समर्थन देण्याची शक्यता असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २०२४ साली लोकसभा निवडणुकांसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेऊन नंतर २०२९ साली सर्व निवडणुका एकत्र घेण्याची शिफारस विधी आयोगाकडून येण्याची शक्यता आहे.
- निवडणूक आयोगाची भूमिका काय?
- दरम्यान, एकीकडे विधी आयोगाकडून पुढील वर्षी प्राथमिक स्तरावर एकत्र निवडणूक घेण्याची शिफारस होण्याची शक्यता असताना दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगानं यासाठी पुरेशा वोटिंग मशीन उपलब्ध होणं अवघड असल्याचं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर्स आणि चिपचा अभाव आहे. या दोन्ही बाबी वोटिंग मशीनसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ४ लाख वोटिंग मशीन तयार करण्याचंच आव्हान असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
- वोटिंग मशीनच्या उपलब्धतेची सध्याची परिस्थिती पाहाता एकत्र निवडणूक घेण्यासाठी किमान एक वर्ष आधीपासून तयारी सुरू करावी लागेल असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. कोविड १९ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे सेमीकंडक्टर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी लागणाऱ्या वोटिंग मशीनच्या पुरवठ्याचं आव्हान निर्माण झालं आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
स्पर्धा परीक्षेत हिजाब घालण्यास कर्नाटक सरकारची परवानगी, हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक
- कर्नाटकमधील उडुपीमध्ये महाविद्यालयात हिजाब घातलेल्या सहा विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. कारण, स्पर्धा परीक्षांमध्ये मुस्लीम महिला विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
- “भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. लोकांना हवे तसे कपडे घालायचं त्यांना स्वातंत्र्य आहे”, असं म्हणत उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर यांनी हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, हिंदुत्त्ववादी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.
- हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगितले जाईल, अशी माहिती सुधाकर यांनी दिली. हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थींनीची कसून तपासणी केली जाईल. परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाटी ही तपासणी केली जाईल. तसंच, NEET प्रवेश परीक्षेतही हिजाब परिधान करण्याची परवानगी आहे,असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
- हिजाब परिधान करण्याच्या निर्णयाला हिंदुत्त्ववाद्यांकडून विरोध होत असल्याने सुधाकर म्हणाले की, “मला या लोकांचे तर्क समजत नाही. हा निवडक निषेध आहे. कोणी दुसऱ्याच्या हक्कांचे उल्लंघन करू शकत नाही. हा धर्मनिरपेक्ष देश आहे.”