चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ ऑक्टोबर २०२१

Date : 24 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती परीक्षा :
  • महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा उद्या (रविवार, २४ ऑक्टोबर) पार पडणार आहे. राज्यभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडेल. चार लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी या दोन स्वतंत्र सत्रांमध्ये परीक्षेस सामोरे जातील.

  • राज्य शासनाच्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण पालन करून ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षार्थींनीही नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन या परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ने केले आहे.

  • करोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची ही भरती परीक्षा राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे.

  • रविवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेद्वारे गट क संवर्गातील शस्त्रक्रिया गृह साहाय्यक, कनिष्ठ / वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक, दंत आरोग्यक, दूरध्वनीचालक, लघुटंकलेखक, वाहनचालक इत्यादी, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेद्वारे अभिलेखापाल, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन आदी पदांसाठी भरती होणार आहे.

कोणत्याही ठिकाणाहून मतदानाची सुविधा असलेले यंत्र विकसित :
  • मतदार नोंदणी कुठेही झाली असली आणि मतदानाच्या दिवशी देशातील मतदार कोणत्याही शहरात असेल तरीही बोटांचे ठसे आणि आधार लिंक्ड इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमुळे मतदानाचा हक्क बजावता येणे शक्य होईल, असे मतदान यंत्र (ईव्हीएम) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आनंद मिश्रीकोटकर या युवकाने तयार केले आहे. हे यंत्र पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यात वापरण्यात यावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

  • अंजनगाव सुर्जी येथील मूळ रहिवासी असलेल्या आनंद मिश्रीकोटकर याने कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच २०१८ मध्ये त्याने हा प्रकल्प तयार केला.  

  • राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांना हा प्रकल्प आवडला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-व्होटिंग करता येईल, असे आश्वासन सनस यांनी दिले. त्यावेळी आनंदच्या प्रकल्पाला आवश्यक ते आर्थिक सहाय्य मिळू न शकल्यामुळे प्रकल्प मागे पडला. दरम्यान, अशाच प्रकारचा प्रकल्प केंद्रीय निवडणूक आयोगाने आयआयटी मद्रासला आर्थिक सहाय्य देत तयार करण्यास सांगितले.

  • अद्याप आयआयटी मद्रासचा प्रकल्प अंतिम झालेला नाही. त्यामुळे आजपासून तीन वर्षांपूर्वी आनंद याने तयार केलेला ई-व्होटिंगचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवणे शक्य असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आनंद सध्या पुणे येथे नोकरीला आहे.

  • ई-व्होटिंग मशीन हे एटीएमसारखे आहे. याबाबत अधिक सांगताना आनंद म्हणाला की, ‘ई-व्होटिंग मशीनचा प्रयोग संपूर्ण राज्यात करणे सहजशक्य आहे. राज्य निवडणूक आयोग स्वत:च्या अधिकारक्षेत्रांतर्गत अशाप्रकारचे यंत्र तयार करू शकते. ही यंत्रे सर्व पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका कार्यालयांमध्ये लावण्यात यावीत. ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्याच्या बोटांचे ठसे स्कॅन होतील. ठसे स्कॅन होत नसल्यास मशीनमधील क्यूआर कोड स्कॅनरद्वारे आधार कार्डवरील क्रमांक स्कॅन होऊन मतदाराला त्याची नोंदणी असलेल्या मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करता येईल.

‘विकासासाठी केंद्र-राज्यात एकाच विचाराचे सरकार हवे’ :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत, राज्याच्या विकासासाठी दोन्हीकडे एकाच विचाराचे सरकार गरजेचे असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेच्या लाभार्थींशी शनिवारी संवाद साधला.

  • गोव्यातील राजकीय वातावरण तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या संवादात ‘डबल इंजिन’ सरकारला उल्लेख केला.

  • स्वयंपूर्ण गोव्याच्या माध्यमातून जनतेचा सर्वांगीण विकास होईल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा केवळ एक उपक्रम नसून, पुढील २५ वर्षांसाठी दूरदृष्टीतून आखलेली ती योजना असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वगुणांचे त्यांनी कौतुक केले.

  • करत राज्यात सध्याप्रमाणे स्थिर सरकारची गरज असल्याचे स्पष्ट केले. जनतेच्या आशीर्वादाने गोवा आम्ही स्वयंपूर्ण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गोव्यात शंभर टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आगामी काळात पर्यटनात वाढ होईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

“तुम्हाला कायदा पाळावाच लागेल”, केंद्रानं Whatsapp आणि Facebook ला ठणकावलं :
  • केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या नव्या आयटी नियमावलीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांनी आक्षेप घेत कायद्यातील काही तरतुदींना विरोध केला होता. मात्र, तो कायदा केंद्र सरकारने पारीत केल्यानंतर तो पाळावाच लागेल, अशी भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर देखील यावरचा वाद संपण्याचं नाव घेत नाहीये.

  • यासंदर्भात, व्हॉट्सअॅप आणि फेसबुककडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून कायद्यातील तरतुदी बदलण्याची मागणी या कंपन्यांकडून केली जात आहे. यावर केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात भूमिका मांडताना या दोघांनाही स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे.

  • कोणत्या तरतुदीवर आक्षेप : व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांवर रोज कोट्यवधी संदेश पोस्ट होत असतात. या संदेशांमधून अनेकदा वाद उत्पन्न होतात. सामाजिक शांतता आणि सलोख्याचा भंग होत असल्याची प्रकरणं देखील समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे संदेश सर्वात प्रथम कोण या प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट करतं, याची माहिती संबंधित सोशल मीडिया कंपन्यांनी द्यावी, अशी तरतूद केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कायद्यामध्ये आहे. मात्र, या तरतुदीवर बोट ठेऊन असं करता येणार नसल्याची कंपन्यांची भूमिका आहे.

“मोदींशिवाय हे शक्यच नव्हतं”, सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावालांनी केलं कौतुक :
  • देशाने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा मोठा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातल्या लस उत्पादकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

  • पूनावाला म्हणाले की, भारताने १ अब्ज लसीकरणाचा टप्पा गाठला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच.

  • त्यांनी एएनआयला सांगितले की, “पंतप्रधानांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन सगळ्यांना वेगाने हालचाल करायला लावली. ते नसते आणि फक्त आरोग्य मंत्रालयाकडे नियंत्रण असतं तर आज भारत एक अब्ज डोस तयार करू शकला नसता.”

ऑस्ट्रेलियाचा ‘जोश’पूर्ण विजय :
  • ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्याच सामन्यात चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. जोश हेझलवूडची (२/१९) प्रभावी गोलंदाजी आणि मार्कस स्टोयनिसच्या (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) निर्णायक फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधली.

  • आफ्रिकेने दिलेले ११९ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाने १९.४ षटके घेतली. आफ्रिकेच्या वेगवान माºयापुढे त्यांची एक वेळ ३ बाद ३८ धावा अशी अवस्था झाली होती. कर्णधार आरोन फिंच (०), डेव्हिड वॉर्नर (१४) आणि मिचेल मार्श (११) यांना छाप पाडता आली नाही.

  • परंतु स्टीव्ह स्मिथ (३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (१८) यांनी चौथ्या गड्यासाठी ४२ धावांची भर घालून डाव सावरला. मात्र दोघेही लागोपाठच्या षटकांत माघारी परतल्यावर स्टोयनिसने सामन्याची सूत्रे हाती घेतली. सहा चेंडूंत आठ धावांची गरज असताना स्टॉयनिसने दोन चौकार लगावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला.

२४ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.