चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ मार्च २०२१

Date : 24 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शफाली, राजेश्वरीमुळे भारतीय महिलांचा शानदार विजय :
  • युवा सलामीवीर शफाली वर्मा (३० चेंडूंत ६० धावा) आणि अनुभवी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड (३/९) यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी आणि ५४ चेंडू राखून धुव्वा उडवला. पण आफ्रिकेने ही मालिका २-१ अशी जिंकली.

  • प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेला २० षटकांत ७ बाद ११२ धावाच करता आल्या. राजेश्वरीने अ‍ॅनेक बोश (०) आणि लिझेल ली (१२) या धोकादायक सलामी जोडीला लवकर माघारी पाठवून भारताच्या विजयाची पायाभरणी केली.

  • प्रत्युत्तरात भारताची सध्याची सर्वोत्तम फलंदाज शफालीने सात चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करताना स्मृती मानधनासह (नाबाद ४८) पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने विजयी लक्ष्य ११ षटकांतच गाठले. राजेश्वरी सामनावीर, तर शफाली मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

‘अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या चाचण्यांत कालबाह्य माहितीचा वापर’ :
  • अ‍ॅस्ट्राझेनेका या कंपनीने उत्पादित केलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ लशीच्या अमेरिकेतील चाचण्यांसाठी कालबाह्य माहितीचा वापर करण्यात आला, असे अमेरिकेतील संघराज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

  • गेल्या सोमवारी, माहिती व सुरक्षा देखरेख मंडळाने निवेदनात असे म्हटले आहे की, अ‍ॅस्ट्राझेनेकाने केलेले दावे चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यांनी परिणामकारकतेबाबत केलेला दावा कसोट्यांवर टिकलेला नाही. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीमुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना विषाणूपासून पुरेसे संरक्षण मिळते, असा दावा चाचण्यांअंती करण्यात आला होता. लोकांच्या मनात लशीविषयी विश्वाास निर्माण व्हावा, यासाठी या चाचण्या करण्यात आल्या होत्या. एकूण तीस हजार लोकांवर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ही लस ७९ टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले होते. त्यात वृद्धांमध्येही ही लस गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले.

  • लस दिलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची फारशी वेळ आली नाही, असा दावा कंपनीने केला होता. यातील  खोटी लस (प्लासेबो- औषधी द्रव्य नसलेली लस)  दिलेल्या रुग्णांच्या तुलनेत केवळ पाच लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चाचण्यांचे अमेरिका, चिली व ब्राझीलमधील निष्कर्ष हे ब्रिटनमधील चाचण्यांच्या निष्कर्षांशी जुळणारे आहेत.

  • अ‍ॅस्ट्राझेनेकाने असे म्हटले होते की, स्वतंत्र चाचण्यांत कुठलेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नव्हते. अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आता अमेरिकेतही आपत्कालीन वापरासाठी या लशीबाबत अर्ज करणार आहे. त्याला पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. अमेरिकेत या लशीच्या वापराची मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली जाऊ शकतात.

  • ते काम अन्न व औषध प्रशासनाला करावे लागणार आहे. त्यासाठी तटस्थ सल्लागार समितीमार्फत माहितीची तपासणी केली जाईल.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार :
  • देशात ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली होती. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

  • १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीयांना मिळणार करोनाची लस

  • कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

  • केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली असून एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.

जिल्हा स्तरावर निर्बंध लादले जाऊ शकतात, केंद्राची राज्यांना सूचना :
  • गृह व मंत्रालयाने मंगळवारी एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले असून ते १ एप्रिलपासून अंमलात आणण्यात येणार आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेश अधिकाऱ्यांना कोविड -१९ प्रकरणांची चाचणी, मागोवा घेण्यावर आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. देशात कोविड – १९ ची रूग्णसंख्या गगनाला भिडत आहे.

  • केंद्राने आपल्या नव्या निर्देशानुसार जिल्हा / उपजिल्हा व शहर / प्रभाग स्तरावर असे निर्बंध लादले जाऊ शकतात असे सूचित केले आहे. त्याचबरोबर राज्यव्यापी टाळेबंदी करता येणार नाही हे देखील स्पष्ट केले. या परिस्थितीत लॉकडाउन तसेच व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतीही बंदी असणार नाही, असेही यात म्हटले आहे. ही मार्गदर्शक सूचना ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. देशातील कोविड -१९ प्रकरणांच्या आकस्मिक वाढीबाबतचे हे नवीन नियम आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रमुख यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेतून बरेचसे नवीन आदेश घेण्यात आले आहेत. आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण विहित ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्याव्यतिरिक्त, राज्यांना मागील वर्षीप्रमाणे कंटेंट झोनचे सीमांकन करतानाच प्रकरणांचा मागोव घेण्यावर तसेच उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

  • लसीकरणासंदर्भात केंद्राने म्हटले आहे की वेग वेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची गती असमान आहे आणि काही राज्यामधील संथ गती ही चिंताजनक बाब आहे. “सध्याच्या परिस्थितीत कोविड -१९ विरूद्ध लसीकरण संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गरजेची आहे,” असे त्यात म्हटले आहे.

२४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.