चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जून २०२१

Updated On : Jun 24, 2021 | Category : Current Affairs


आमदार लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश :
 • देशात करोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सतत दीड  वर्षे करोनाबाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या आमदार नीलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’ मध्ये समावेश झाला असल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली. गुरुवारी दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार  लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात येणार असल्याचे फराह अहमद यांनी कळवले आहे.

 • ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. करोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अभिनेता सोनू सूद यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे.

 • करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांंपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार, मजूर, तालुक्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांसाठी नगर-पुणे रस्त्यावर आमदार लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.दोन महिने अहोरात्र सुरू असलेल्या या अन्नछत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला.

 • अन्नछत्राबरोबरच गावाकडे पायी परतणाऱ्या मजुरांसाठी आश्रयाची सोय करण्यात आली होती. निर्बंध शिथिल झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडनं नोंदवला मोठा पराक्रम :
 • न्यूझीलंडने आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला दुसर्‍या डावात फक्त १७० धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने दोन गडी गमावत १३९ धावांचे लक्ष्य गाठले.

 • टीम इंडियाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या, तर न्यूझीलंडने २४९ धावा केल्या. आयसीसीतर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली कसोटी १८७७ मध्ये खेळली गेली.

 • २१ वर्षानंतर न्यूझीलंडला मिळाली आयसीसीची ट्रॉफी - तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीचे  विजेतेपद जिंकले आहे. २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले. टीम इंडियाने प्रथम खेळत ६ बाद २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने ४ गडी आणि २ चेंडू राखून हे लक्ष्य गाठले. ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा केल्या होत्या.

पंतप्रधान मोदींसमवेत काश्मिरी नेत्यांची आज बैठक, ८ पक्षांचे नेते असतील हजर :
 • जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या ८ राजकीय पक्षांच्या १४ लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत. सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बोलावलेल्या बैठकीचा अजेंडा गुप्त ठेवण्यात आला आहे. मात्र, सरकार जम्मू-काश्मीरच्या विकासासह सीमांकन व इतर मुद्द्यांवर स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

 • पंतप्रधानांव्यतिरिक्त या बैठकीत गृहराज्यमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, गृहसचिव अजय भल्ला आणि काही उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकतात.

 • बैठकीस एकूण १४ प्रतिनिधींना बोलविण्यात आले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद, गुलाम अहमद मीर, ताराचंद, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, भाजपाचे निर्मल सिंग, कवींदर गुप्ता आणि रवींद्र रैना, पीपल्स कॉन्फरन्सचे मुझफ्फर बेग आणि सज्जाद लोणे, पँथर्स पार्टीचे भीम सिंग, सीपीआयएमचे एमवाय वाय. आणि जेके अपनी पक्षाचे अल्ताफ बुखारी यांना बैठकीस आमंत्रित केले आहे.

‘डेल्टा प्लस’चे देशात ४० रुग्ण :
 • डेल्टा प्लस या करोनाच्या अत्यंत चिंताजनक प्रकाराची लागण झालेले जवळपास ४० रुग्ण महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये तुरळकपणे आढळले असल्याचे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

 • भारतात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक नमुन्यांची क्रमवारी करण्यात आली त्यामध्ये एवाय.१ या डेल्टा प्लस प्रकाराचे जवळपास ४० रुग्ण महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशामध्ये तुरळकपणे आढळले तरी त्याच्या प्रभावामध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

 • यानंतर महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणावर तपासणी करून आरोग्यविषयक योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या आरोग्य विभागाने एवाय.१ हा ११ जून रोजी आढळल्याचे सांगितल्यानंतर नमुन्यांचे पूर्वलक्ष्यी प्रभावाने विश्लेषण करण्यात आले, तेव्हा महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्रथम हा प्रकार आढळला.

हाँगकाँगमधील ‘अ‍ॅपल’ वृत्तपत्रही बंद :
 • हाँगकाँग : हाँगकाँगमधील ‘अ‍ॅपल’ या लोकशाहीचे समर्थक असलेल्या एकमेव वृत्तपत्राची अखेरची आवृत्ती गुरुवारी प्रकाशित होणार आहे. हाँगकाँग या निमस्वायत्त शहरातील बंडखोरीविरुद्ध चीनने मोहीम उघडली असून त्याचाच एक भाग म्हणून या वृत्तपत्राचे पाच संपादक आणि पदाधिकारी यांना अटक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आल्याने हे वृत्तपत्र जबरदस्तीने बंद करावे लागत आहे.

 • हाँगकाँगमधील सद्य:स्थितीमुळे वृत्तपत्राच्या मुद्रित आणि ऑनलाइन आवृत्त्या बंद कराव्या लागत आहेत, असे नेक्स्ट मीडियाची कंपनी असलेल्या ‘अ‍ॅपल डेली’च्या संचालक मंडळाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे. लोकशाहीचा समर्थक असलेला आवाज बंद करून चीनने या शहरावर आपले नियंत्रण ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे सूचित होत आहे.

 • हाँगकाँगमध्ये २०१९ मध्ये सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली, तेव्हापासून चीनने वृत्तपत्रांच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यासाठी अत्यंत कडक राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर करण्यास सुरुवात केली.

२४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)