चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जून २०२०

Date : 24 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्रम्प तुमच्या निर्णयामुळे अमेरिकेचंच नुकसान, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, टेस्ला नाराज :
  • ग्रीन कार्ड आणि वर्क व्हिसा स्थगित करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर अमेरिकेतील उद्योग क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, टेस्ला या अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

  • अमेरिकेत दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक नोकरीसाठी येतात. त्यांना एच १ बी आणि अन्य वर्क व्हिसा जारी केले जातात. तेच व्हिसा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. सतत नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची अमेरिकेची कल्पकता आणि स्पर्धात्मक वातावरण याला दुहेरी फटका बसेल असा इशारा या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या रिपब्लिकन पक्षाकडे ओढा असलेल्या संघटनेने सुद्धा व्हिसा स्थगित करण्याच्या निर्णयावर नाराजी प्रगट केली आहे. “स्थलांतरितासंबंधीच्या धोरणात बदल केल्यामुळे गुंतवणूक दुसऱ्या देशात जाईल तसेच यामुळे विकास आणि नोकऱ्या दोघांचा वेग मंदावेल” असे या संघटनेचे मत आहे. एच १ बी व्हिसा स्थगित करण्याच्या निर्णयाकडे टेक इंडस्ट्री कॅनडासाठी एक गिफ्ट म्हणून पाहत आहे. कारण अमेरिकेकडे येणारे उच्च शिक्षित, कुशल मनुष्यबळ आता कॅनडामध्ये जाईल.

करोना आणि लॉकडाउनमुळे देशात २७ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम :
  • सध्या देशात तसंच जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. करोना विषाणू आणि लॉकडाउनचा फटका विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे देशातील २७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. युनिसेफकडून तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

  • एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आशिया क्षेत्रात तब्बल ६० कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करोना आणि लॉकडाउनचा परिणाम झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

  • मुलांमधील शिक्षण आणि शिक्षणाच्या दृष्टीकोनाकडे लक्ष वेधत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असे म्हटले आहे की, “प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या २४.७ कोटी विद्यार्थ्यांचं शिक्षणावर शाळा बंद असल्यामुळे परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त अंगणवाडी केंद्रातील बालवाडीत शिकत असलेल्या २.८ कोटी विद्यार्थ्यांवरदेखील याचा परिणाम झाला आहे.”

भारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनची रशियाला विनंती :
  • पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

  • पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

  • पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी केंद्राने ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

चीनने बळकावला नेपाळचा ३३ हेक्टरचा भूभाग; नदी पात्र बदलून आणखीन प्रदेश बळकावण्याची शक्यता :
  • लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसेनंतर काही दिवसांनंतर नेपाळ सरकारचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये चीन तिबेटमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर करुन नेपाळचा काही भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झालं आहे. नेपाळच्या सीमा भागावर चीन लवकरच लष्करी छावणी उभारु शकतं असा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आल्याचे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

  • नेपाळमधील कृषी खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या जमीन मोजणीसंदर्भातील सर्वेक्षण खात्याने ११ ठिकाणांची यादीच आपल्या अहवालामध्ये दिली आहे. या ११ पैकी १० ठिकाणी चीनने ३३ हेक्टर जमीन बळकावल्याचे नमूद करण्यात आलं आहे. इतकच नाही नेपाळच्या सीमेजवळची अधिक अधिक जमीन आपल्या ताब्यात यावी यासाठी चीन नद्यांचा प्रवाह बदलत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

  • चीनने बळकावलेल्या एकूण जमीनीपैकी १० हेक्टर जमीन ही हुमला जिल्ह्यातील आहे. येथे बांधकाम करण्यासाठी चीनने बगदारी खोला नदी आणि कर्नाली नदीचा प्रवाह बदलला आहे. तर रासुवा जिल्ह्यातील सहा हेक्टर जमीनीवर चीनने ताबा मिळवला आहे. तिबेटमधील बांधकाम करण्यासाठी नेपाळमध्ये येणाऱ्या सीनजेन, भूर्जूक आणि जांम्बू खोला नदीचे पात्र बदलण्यात आलं आहे.

२४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.