चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जुलै २०२०

Date : 24 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात गेल्या २४ तासात आढळले जवळपास ५० हजार करोना रुग्ण; ७४० जणांचा मृत्यू :
  • करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात वाढतच आहे. ३० ते ३५ हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या घरात गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी करोनाबादित रुग्णांची वाढ आहे. गुरुवारी देशात ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ३०,६०२ करोनाबळी झाले आहेत.

  • देशातील करोना रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. देशातील एकूण रुग्णसंख्या १२,८७,९४५ वर पोहोचली आहे. देशभरात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

  • देशात आतापर्यंत ८,१७,२०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४०,१३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. म्हणजेच करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा अधिक आहे.

बालवाडी ते १२ वी असा करा अभ्यास; शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं ऑनलाइन वर्गांचं वेळापत्रक :
  • राज्यात करोनाच्या संकटानं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून करोनाचा प्रसार नियंत्रणात येण्याऐवजी वाढताना दिसत असून, आता राज्यातील करोना बाधितांची संख्या तीन लाखांच्या वर पोहोचली आहे. करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे.

  • परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे.

  • करोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा - आनंदचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव :
  • भारताच्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने त्याला पराभवाचा धक्का दिला. चारपैकी पहिल्या तीन डावांमध्ये आनंदने कार्लसनला कडवी लढत देत बरोबरी पत्करण्यास भाग पाडले होते. मात्र अखेरच्या डावामध्ये कार्लसनने बाजी मारत ही लढत २.५-१.५ अशी जिंकली.

  • फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड उद्यापासून चेन्नई : फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा २५ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान रंगणार असून भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याच्यासह जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेला चीनचा डिंग लिरेन यांसारख्या अव्वल बुद्धिबळपटूंचा समावेश असणार आहे. पहिल्यांदाच ऑनलाइन होणाऱ्या या ऑलिम्पियाडमध्ये जवळपास १६३ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.विदित गुजराथीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सातवे मानांकन देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी :
  • सप्टेंबरअखेपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.

  • युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेचीही सुनावणी या एकत्रित याचिकांबरोबर होणार आहे.

  • आयोगाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवत परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक ६ जुलै रोजी जाहीर केले. या निर्णयाला महाराष्ट्रासह काही राज्यांत विरोध होत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंतिम परीक्षा रद्द कराव्यात यासाठी १३ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ३१ विद्यार्थ्यांनी (प्रणीथ के विरुद्ध केंद्र सरकार) सर्वोच्च न्यायालयात यचिका दाखल केली असून त्यावर न्या. एल. नागेश्वर राव व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली.

  • याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांपैकी एकाला करोनाचा संसर्ग झाला असून अंतिम परीक्षा घेण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे याचिकांकर्त्यांचे म्हणणे आहे.

लष्करातील महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’ :
  • लष्करामध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबतचा आदेश संरक्षण मंत्रालयाने जारी केला आहे. अस्थायी स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपात नियुक्ती करण्याबाबतचा विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते.

  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामुळे महिलांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले. या आदेशामुळे भारतीय लष्करातील सर्वच्या सर्व म्हणजे १० विविध विभागांमध्ये आता महिलांना काम करता येणार आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको :
  • राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतू सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

  • प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.

  • अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे, असे महत्वाचे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी दिले आहेत.

  • पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.

२४ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.