चालू घडामोडी आणि दिनविशेष - 24 जानेवारी 2024

Date : 24 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगाला करोनाहून भयंकर रोगाचा धोका, ४८००० वर्षांपासून बर्फाखाली दबलेल्या ‘त्या’ विषाणूबाबत वैज्ञानिकांचा इशारा
 • करोना विषाणूने सलग दोन वर्षे जगभर थैमान घातलं होतं. दोन वर्षे टप्प्याटप्याने जगभर लॉकडाऊन लावण्यात आले. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. करोनातून जग सावरल्यानंतर करोनाचे इतर अनेक उपप्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये आढळले आहेत. अशातच आता नव्या विषाणूचं आव्हान निर्माण झालं आहे. आर्कटिक आणि इतर बर्फाळ प्रदेशांमधील बर्फाच्या डोंगरांखाली दबलेल्या विषाणूबाबत वैज्ञानिकांनी आरोग्य संघटनेला इशारा दिला आहे. द गार्डियनच्या अहवालानुसार वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिक पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे झॉम्बी विषाणू बाहेर निघू शकतो आणि यामुळे भयावह जागतिक आरोग्य आणीबाणी निर्माण होऊ शकते. ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू येथील बर्फाखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
 • पर्माफ्रॉस्ट ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर अथवा पृष्ठभागाच्या खाली गोठलेला बर्फाचा थर आहे. यामध्ये माती आणि वाळूदेखील असते. याच्याभोवती बर्फाचा मोठा थर असतो. परंतु, अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढू लागलं आहे. परिणामी जगभरातील अनेक प्रदेशांमधला बर्फ वितळू लागला आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या बर्फांखाली दबलेल्या काही विषाणूंचा धोकादेखील वाढला आहे.
 • या नव्या विषाणूंमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी सायबेरियामधील पर्माफ्रॉस्टचे काही नमुने घेतले आणि त्यावर काही प्रयोग केले. या संशोधनादरम्यान, बर्फाखाली दबलेल्या विषाणूची माहिती मिळाली आहे. संशोधन करणाऱ्या या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिकमध्ये आम्हाला सापडलेला विषाणू हजारो वर्षे बर्फाखाली दबला होता.
 • रॉटरडॅममधील इरास्मस मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञ मॅरियन कूपमॅन्स म्हणाल्या, पर्माफ्रॉस्टखाली कोणकोणते विषाणू दबले गेले असावेत, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. परंतु, आम्हाला वाटतं की, तिथे असे काही विषाणू आहेत जे या संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात. इथल्या विषाणूंमध्ये रोगांची मोठी साथ पसरवण्याची क्षमता असू शकते. जसे की पोलिओचा एक जुना व्हेरिएंट या प्रदेशात असू शकतो. येथून नवी आव्हाने निर्माण होऊ शकतात, असं मानूनच आपल्याला संशोधन करावं लागेल.

 

एलॉन मस्क यांनी भारतासाठी उठवला आवाज, UN च्या कारभारावर बोट ठेवत म्हणाले…
 • भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य नाही. कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताने अनेकदा आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यासाठी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी जगातल्या शक्तीशाली देशांना आरसा दाखवत भारताची पाठराखण केली आहे. मस्क म्हणाले, जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व न देणं हा वेडेपणा आहे.
 • एलॉन मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सयुंक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. परंतु, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना त्या जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व दिलेलं नाही. हा सगळा वेडेपणा आहे. परिषदेत आफ्रिका खंडातील देशांसाठी एक जागा असायला हवी.
 • मायकल आयजेनबर्ग यांच्या पोस्टवर रिप्लाय देत मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेविषयी आपलं मत मांडलं आहे. आयजेनबर्ग यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या एका वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरच मस्क यांनीदेखील आपलं मत मांडलं. अँटोनियो गुटेरेस यांनी आफ्रिकेसाठीच्या एका स्थायी सदस्यत्वावर भाष्य केलं होतं. यावर आयजेनबर्ग म्हणाले, मग भारताबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मला असं वाटतं की, सध्याची यूएन सुरक्षा परिषद बरखास्त करावी आणि नव्या नेतृत्वांसह नवीन समिती तयार करावी.
 • भारत हा गेल्या १६ वर्षांमध्ये आठ वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. तसेच भारत जी-४ समुहाचाही सदस्य आहे. जी-४ अशा देशांचा समूह आहे जो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी एकमेकांचं समर्थन करतो.
सुंदर, गोड, निरागस आणि लोभस भगवान रामाच्या मूर्तीचं नामकरण; पूजाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!
 • अयोध्येतील राम मंदिरात बहुप्रतिक्षित असा विलोभनीय सोहळा साजरा झाला. भगवान रामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भगवान रामाची एक झलक पाहण्याकरता रामभक्त आतूर झाले होते. श्रीरामाची मूर्ती कशी असेल, या मूर्तीची वैशिष्ट्य काय असतील, असं असंख्य प्रश्न रामभक्तांच्या मनात होते. अखेर भगवान रामाची मूर्ती आता अवघ्या देशासमोर आली आहे. कृष्णवर्णीय असलेली ही मूर्ती लोभस आणि सुंदर आहे. त्यामुळे या मूर्तीला साजेसं असं नावही ठेवण्यात आलं आहे. अयोध्येतील एका पूजाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
 • “२२ जानेवारीला अभिषेक करण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीला ‘बालक राम’ असे नाव देण्यात आले आहे . प्रभू रामाच्या मूर्तीला ‘बालक राम’ असे नाव देण्याचे कारण म्हणजे ही मूर्ती बालरुपातील आहे. पाच वर्षीय बालकाचे रुप या मूर्तीत आहे, अशी माहिती येथील पूजारी अरुण दीक्षित यांनी दिली. “जेव्हा मी पहिल्यांदा मूर्ती पाहिली, तेव्हा मी रोमांचित झालो आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा मी अनुभवलेल्या भावना शब्दांत सांगू शकत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.
 • अरुण दीक्षित हे वाराणसीचे असून त्यांनी आतापर्यंत जवळपास ५० ते ६० अभिषेक केले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा अभिषेक होता, असंही ते म्हणाले. त्यांनी १८ जानेवारी रोजी मूर्तीचे पहिले दर्शन घेतले. ५१ इंच आकारमानाची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यांनी ८४ सेकंदांच्या अभिषेक मुहूर्तावर अभिषेक केला. सेलिब्रिटी, खेळाडू, व्यापारी आणि उद्योगपतींसह सात हजारांहून हून अधिक पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्या बालकांशी पंतप्रधानांच्या गप्पा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वर्षांच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी मुलांशी संगीत, संस्कृती, सौरऊर्जा आणि क्रीडा यासारख्या विषयावर आपले विचारही मांडले. पंतप्रधानांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या अधिकृत निवासस्थानी या अनौपचारिक गप्पा रंगल्या. यावेळी त्यांनी मुलांना स्मरणिकाही दिल्या.
 • या वर्षी १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १९ मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये नऊ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. या बालकांनी दाखवलेले असामान्य धैर्य, कलात्मक पराक्रम, नावीन्यपूर्ण विचार आणि निस्वार्थ सेवा याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
 • मुलांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. तसेच त्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचीही संधी साधली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना, मोदी यांनी आपल्याला संगीताची आवड असल्याचे सांगितले. त्याचा ध्यानधारणेसाठी उपयोग होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिक्षक भरती जाहिरातींबाबत आली मोठी अपडेट…
 • स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांना शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. जास्तीत जास्त रिक्त पदांसाठी ही मुदत २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत आता संपुष्टात आली असून, नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया २४ जानेवारीपर्यंत पूर्ण करता येणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत ३० हजार पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
 • त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांचे या भरती प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. संकेतस्थळावर जाहिराती प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा दिली जाणार आहे. मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतस्थळावर जाहिराती दिल्यानंतर सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.
 • त्यानंतर पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित जाहिराती पूर्ण करून तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णयानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रात देण्याची कार्यवाही करावी. दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर
 • राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर  करण्यात आली. या  परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच  जाहीर झाली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
 • तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट  ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.
 • दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले आहेत. मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
 • महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती २०२३ मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा होता. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.” असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

महिला ‘आयपीएल’मधील संघांच्या विक्रीतून ‘बीसीसीआय’ची ४००० कोटींची कमाई?
 • महिला इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पाच संघांचा लिलाव बुधवारी पार पडणार असून यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ४००० कोटी इतकी रक्कम अपेक्षित आहे.
 • महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वाचे यंदा आयोजन केले जाणार असून यातील पाच संघांच्या खरेदीसाठी आघाडीचे उद्योग समूह उत्सुक आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, प्रति संघामागे ५०० ते ६०० कोटी रुपयांची विजयी बोली लागण्याची शक्यता आहे. ‘‘महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा खूप मोठी आणि मौल्यवान ठरू शकते. प्रत्येक संघाच्या खरेदीसाठी किमान ५०० कोटी रुपयांची विजयी बोली लागू शकेल. ८०० कोटींहून अधिकची बोली लागण्याची शक्यता कमी आहे,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
 • महिला ‘आयपीएल’मध्ये संघ खरेदीसाठी ३० हून अधिक कंपन्या व फ्रेंचायझींनी पाच लाख रुपये किमतीची निविदा कागदपत्रे घेतली आहेत. यात पुरुष ‘आयपीएल’मधील दहाही संघ, तसेच अदानी समूह, टोरेंट समूह, हलदीरामचे प्रभूजी, काप्री ग्लोबल आणि आदित्य बिर्ला समूह यांसारख्या आघाडीच्या समुहांचा समावेश आहे. यातील काही समुहांनी २०२१ मध्ये पुरुष ‘आयपीएल’चे नवे दोन संघ खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता.

कार निर्मिती क्षेत्रातील दिग्गज फोर्ड कंपनी युरोपमध्ये तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

 • ‘मेटा’, ‘ट्विटर’, ‘स्नॅप’, ‘मायक्रोसॉफ्ट’, विप्रो सारख्या दिग्गज कंपन्यांनी याआधीच आपली कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर ‘अॅमेझॉन’ने दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे. करोनानंतर अपेक्षित वृद्धीदर तेवढ्या वेगात न गाठल्याने या बड्या समाजमाध्यम, माहिती-तंत्रज्ञान, ई-वाणिज्य कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मंदीची चर्चा सुरू असताना या कंपन्या खर्च कमी करत आहेत. दरम्यान, हे टाळेबंदीचे वारे आता ‘आयटी’नंतर ‘ऑटो’ सेक्टरमध्येही शिरल्याचे दिसत आहे. कारण, अमेरिकेतील कार निर्मिती क्षेत्रातील नामांकीत असणाऱ्या फोर्ड कंपनीने युरोपमध्ये तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • फोर्ड कंपनीने युरोपमधून ३ हजार २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे ठरवले आहे. एवढेच नाहीतर कंपनीने काही प्रोजेक्ट युरोपमधून अमेरिकेत स्थलांतरित करण्याचाही निर्णय घेतला आहे.
 • यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी विकास कामातील अडीच हजार नोकऱ्या आणि प्रशासकीय कामातील ७०० नोकऱ्या काढू इच्छित आहे. फोर्ड कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जर्मनीतील लोकांना बसणार आहे. फोर्ड कंपनी युरोपमध्ये जवळपास ४५ हजार लोकांना रोजगार देते.

GoMechanic नं केली ७० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा -

 • गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांमधून कर्मचारी कपातीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये थेट गुगलपासून अॅमेझॉनपर्यंत अनेक आयटी कंपन्यांचाही समावेश आहे. त्यातच या वर्षी जून महिन्यात मंदी येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल सर्विसिंगची सेवा पुरवणाऱ्या GoMechanic या स्टार्टअपनं तब्बल ७० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी कंपनीची धोरणं आणि चुकीचे आर्थिक अंदाज जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

हिजाबप्रकरणी लवकरच त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी; सरन्यायाधीशांचे संकेत

 • कर्नाटकमधील शाळांत हिजाबबंदी करण्याच्या निर्णयाला आव्हान करणाऱ्या याचिकांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठ स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठातील न्यायमूर्तीनी यापूर्वी परस्परविरोधी निकाल दिला आहे.
 • कर्नाटकमधील शाळांत ६ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असल्याने या खटल्यात आता अंतरिम आदेशाची गरज आहे, असे ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. व्ही. रामासुब्रमणियन, न्या. जे. बी. पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या पीठाच्या निदर्शनास आणले. त्या म्हणाल्या की, काही इयत्तांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार असून त्या सरकारी शाळांत होतील. त्यासाठी विद्याथ्र्यिनींना तेथे जावे लागणार आहे. हे लक्षात घेता या खटल्यात न्यायालयाच्या अंतरिम आदेशाची गरज आहे.
 • त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही हे तपासून पाहू. हे प्रकरण त्रिसदस्यीय पीठाचे काम आहे. त्यासाठी तारीख दिली जाईल.हिजाब प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने गतवर्षी १३ ऑक्टोबरला परस्परविरोधी निकाल सुनावला होता. त्यामुळे हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी यापेक्षा मोठय़ा पीठापुढे ठेवावे, असेही या न्यायमूर्तीनी म्हटले होते. न्या. हेमंत गुप्ता गुप्ता यांनी हिजाबबंदीविरोधातील याचिका फेटाळण्याचा, तर न्या. सुधांशू धुलिया यांनी हिजाबबंदी अयोग्य असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला हिजाबबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सध्या लागू होतो.

१९४७ चे रेल्वे तिकिट व्हायरल! भारत-पाकिस्तानच्या रेल्वे प्रवासाची किंमत वाचून व्हाल थक्क

 • भारत-पाकिस्तान देशाच्या संबंधित अनेक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असो वा सीमेवरील चकमक, या घडामोडींविषयी बातम्या वाचणं लोकांना आवडतं. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठीही लाखोंच्या संख्येत क्रिकेटप्रेमी स्टेडियममध्ये बसलेले दिसतात. अशातच आता भारत-पाकिस्तानच्या एका नव्या गोष्टीमुळं चर्चेला तोंड फुटलं आहे.
 • गेल्या काही दिवसांपासून गाड्यांचे जुने बिल सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही एका जुन्या रेल्वे तिकिटाच्या व्हायरल पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे हे रेल्वे तिकिट भारत देशाच्या स्वातंत्र्य काळातील आहे. भारत-पाकिस्तानचं हे रेल्वे तिकिट १९४७ चे आहे. त्यावेळी नऊ प्रवाशांनी पाकिस्तानच्या रावलपिंडी येथून अमृतसरला जाण्यासाठी हे तिकिट काढलं होतं.
 • व्हायरल झालेल्या तिकिटाचे दर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यावेळी ९ लोकांसाठी रेल्वेचे तिकिट दर फक्त ३६ रुपये होते. या जून्या रेल्वे तिकिटाला पाकिस्तानच्या रेल लवर्स नावाच्या एका फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. पाकिस्तान रेल लवर्सने तिकिटाचं फोटो शेअर करुन म्हटलंय, “१७-०९-१९४७ ला स्वातंत्र्यानंतर ९ लोकांसाठी दिलेल्या एका रेल्वे तिकिटाचा फोटो..रावलपिंडी ते अमृतसरसाठी, ज्याची किंमत ३६ रुपये ९ पैसे आहे. भारतात आलेल्या एका कुटुंबियांचं हे रल्वे तिकिट असण्याची शक्यता आहे. हे रेल्वे तिकिट थर्ड एसी क्लासचं असल्याने, या तिकिटाची किंमत पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जानेवारी २०२२
राष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड :

देशाचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन बुधवारी असून उपायुक्त हरि बालाजी यांनी ७३ किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. गेल्यावर्षी अमरावतीमध्ये  त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर अंतर कापले होते.

वांद्रे कुर्ला संकुलापासून ही मोहीम सुरू झाली. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त बालाजी यांच्यासोबत ९ आणखी धावपटू सहभागी झाले होते. तेथून ते मुलुंडला गेले. तेथून पुन्हा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात परतले. तेथून नरिमन पॉईंटपर्यत ते व त्यांच्या सोबतचे धावपटू धावले. तेथून ते पुन्हा गेट वे ऑफ इंडियाला आले. त्यातील बालाजी यांच्यासह एकूण तीन धावपटूंनी संपूर्ण ७३ किलोमीटरचे अंतर पार पाडले. उर्वरीत सहा जणांनी ५५ किलोमीटर अंतर कापले. शेवटच्या २१ किलोमीटर अंतरात ७० धावपटू सहभागी झाले होते.

त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे देशाचा तिरंगा झेडा फडकावून अभिवादन करण्यात आले. बालाजी यांनी मध्यरात्री १२ वाजता धावायला सुरूवात केली होती.ते सकाळी साडे आठच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. बालाजी यांनी गेल्यावर्षीही अमरावतीमध्ये कार्यरत असताना ७२ किलोमीटरचे अंतर धावून पार पाडले होते.

ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा :

देशात करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणू संसर्गाची साथ समूह संसर्गाच्या टप्प्यात असून अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती ‘इन्साकॉग’ने प्रसिद्ध केली आहे.

‘इन्साकॉग’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात ओमायक्रॉनच्या साथीबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत, परंतु सध्या मात्र रुग्णालयात दाखल होणारे आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धोका कायम आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे. संसर्गक्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीए.२’ या उपप्रकाराचेही अनेक रुग्ण देशात आढळल्याचेही या अहवालात म्हटले आहे. 

ओमायक्रॉन आता समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक महानगरांमध्ये तो प्रबळ असून तेथे बाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार ‘बीए.२’च्या रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरीत्या वाढत आहे. परंतु आरटीपीसीआर चाचणीमध्ये विषाणूच्या तीन जनुकांपैकी एक जनुक आढळत नसल्याने (एस-जीन ड्रॉप आऊट) निष्कर्ष नकारात्मक येण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे. अगदी अलीकडे आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बी.१.६४०.२’ या उपप्रकाराचे निरीक्षण केले

जात आहे. त्याचा जलद फैलाव झाल्याचा कोणताही पुरावा नाही आणि त्यात रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता असली तरी, सध्या तरी हा प्रकार चिंताजनक नाही. आतापर्यंत, भारतात त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असेही ‘इन्साकॉग’ने स्पष्ट केले आहे.

टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी :

भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फोरीस्टने त्याच्यावर मात केली. तसेच विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने भारताच्या आर. प्रज्ञानंदला पराभूत केल्याने विदितला अग्रस्थान गमवावे लागले.

सातव्या फेरीच्या सामन्यात वॅन फोरीस्टने बचावात्मक खेळ करताना विदितला धोका पत्करण्यास भाग पाडले. विदितने ३६व्या चालीत केलेल्या चुकीचा फायदा घेत वॅन फोरीस्टने विजय मिळवला. विदितचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. 

कार्लसनने ३४ चालींत प्रज्ञानंदवर मात केली आणि पाच गुणांसह अग्रस्थान पटकावले. अझरबैजानचा शख्रियार मामेदेरोव्ह दुसऱ्या, तर विदित, आंद्रे इसिपेन्को, अनिश गिरी, रिचर्ड रॅपपोर्ट संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहेत.

चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीला कझाकस्तानच्या रिनात जुमाबायेव्हने बरोबरीत रोखले. या निकालानंतर अर्जुन सहा गुणांसह अग्रस्थानी कायम आहे.

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार; आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शाळा सुरू करण्याचा निर्णय :

राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली.

राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व  तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालन्यात बोलत होते.

“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलंय. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.

अन् एकाचवेळी राजपाथावर उडताना दिसले एक हजार Drones; नयनरम्य दृष्य कॅमेऱ्यात कैद :

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनाच्या आधी सराव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘बिटिंग रिट्रिट’च्या कार्यक्रमात यंदा ड्रोन्सची कमाल पहायला मिळाली. नवी दिल्लीमध्ये एकाच वेळी एक हजार ड्रोन्सच्या प्रकाशाने आकाशामध्ये अद्भूत दृष्य पहायला मिळालं.

सालाबादप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांआधीपासून दिल्लीमधील प्रमुख सरकारी इमारती ज्यामध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवसस्थान, इंडिया गेट यासारख्या ठिकाणांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईबरोबरच यंदा या सरावामध्ये हवेतील रोषणाईचा नजारा पहाला मिळाला. एकाच वेळी एक हजार ड्रोन्स राजपथावरुन उडताना दिसले.

रात्रीच्या आकाशामध्ये हिरव्या, पांढऱ्या, भगव्या आणि निळ्या रंगामध्ये चमकणारे हे ड्रोन्स एखाद्या पक्षांच्या थव्याप्रमाणे लयबद्ध पद्धतीने हवेमध्ये संचार करत होते. एकाच वेळी या सर्व ड्रोन्सच्या लाईट्स बदलत होत्या. कधी तिरंगा तर कधी केवळ केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगात दिसणारे हे ड्रोन्स राजपथावर जणू सैनिकांप्रमाणे पथसंचलन करत होते असा भास होत होता.

सध्या सोशल नेटवर्किंगवर या ड्रोन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. दिल्लीच्या आकाशामध्ये असं दृष्य पहिल्यांदाच पाहणारे अनेक दिल्लीकर थांबून या ड्रोन्सचे व्हिडीओ शूट करतानाचे चित्र पहायला मिळालं.

24 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.