चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ एप्रिल २०२०

Date : 24 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सूर्यप्रकाशात करोना विषाणू नष्ट होतात, अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा :
  • करोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात करोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे”.

  • “आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

  • मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील. अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसंच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवण्यात आली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे. “प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल,” असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

IndiGo च्या कर्मचाऱ्यांना दिलासा; कंपनीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय :
  • खासगी क्षेत्रातील विमान कंपनी इंडिगोनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी गुरूवारी कर्मचाऱ्यांना दिली. सरकारनं यापूर्वी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कपात न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. याच धर्तीवर कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

  • कंपनीच्या कार्यकारी समितीतील सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छेनुसार या महिन्यात वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य कर्मचाऱ्यांना त्यांचं एप्रिल महिन्याचं पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

  • करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तसंच ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यादरम्यान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसूलावर मोठा परिणाम धआला आहे.

  • यानंतर इंडिगोनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तो मागे घेण्यात आला आहे. सरकारच्या सुचनेचा आदर करत कंपनीनं वेतन कपात रद्द केल्याचं दत्ता यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

जबरदस्त! DRDO ने पंधरा दिवसात उभी केली दिवसाला हजार करोना टेस्ट करणारी प्रयोगशाळा :
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. या लॅबमुळे Covid-19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार आहे.

  • संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही MVRDL लॅब विकसित केली आहे.

  • करोना व्हायरसविरोधात अनेक सरकारी संस्था आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. DRDO अशाच संस्थांपैकी एक आहे. व्हेंटिलेटर, पीपीई किटसह करोनावर उपचारासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती डीआरडीओने केली आहे. डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल २ आणि ३ ही प्रयोगशाळा विक्रमी १५ दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात.

केवळ ९० रुपयांत सामाजिक दुरीकरण यंत्राची निर्मिती :
  • विरार : सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामाजिक दुरीकरण ठेवणे आणि आपला हात तोंड आणि नाक यांच्या जवळ न नेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण कळत नकळत हे नियम तोडले जातात आणि करोनाचा धोका संभवतो. यावर विरारमधील एका किशोरवयीन मुलाने तोडगा काढला आहे.

  • टाळेबंदीच्या काळात या मुलाने आपली कलात्मकता पणाला लावून घरातील वस्तूंपासून एक यंत्र तयार केले आहे. जे मनगटावर बांधल्यास तुम्हाला कुणालाही हात मिळविताना अथवा आपला हात तोंडावर नेताना सावध करणार आहे. केवळ ९० रुपयांत बनवलेले हे यंत्र करोनाच्या लढय़ात महत्त्वाचे ठरणार आहे.

  • करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कुणाला हस्तांदोलन करू नका, चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका असे सल्ले तज्ज्ञांकडून देऊनही त्याचे पालन केले जात नसल्याने विरार फुलपाडा परिसरात राहणाऱ्या हर्ष चौधरी या नववीत शिकणाऱ्या मुलाने मोठय़ा कल्पकतेने यावर तोडगा म्हणून एक घडाळ्याच्या आकाराचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र आपण हस्तांदोलन करताना आणि चेहऱ्याला स्पर्श करताना आपल्याला इशारा देते. हर्षने अगदी माफक दरात घरातील वस्तू वापरून हे यंत्र तयार केले आहे.

ऑलिम्पिक पुन्हा पुढे ढकलणे अशक्य :
  • करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आधीच एक वर्ष पुढे ढकलण्यात आली असून आता यापेक्षा अधिक काळासाठी ऑलिम्पिक लांबणीवर टाकणे अशक्य आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी गुरुवारी व्यक्त केली.

  • पूर्वीच्या नियोजनानुसार २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० यादरम्यान टोक्यो ऑलिम्पिक रंगणार होते. परंतु करोनामुळे संपूर्ण विश्वातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्याने आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत ऑलिम्पिक खेळवण्यात येणार आहे. मात्र करोनाचे विश्वभरातील थैमान पाहता तेव्हाही जर ऑलिम्पिक होऊ शकले नाही, तर ते अधिक पुढे ढकलणे अशक्य आहे, असे योशिरो यांना वाटते.

  • ‘‘टोक्यो ऑलिम्पिक आधीच एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या लांबणीचा विचार करणे अशक्य आहे. खेळाडू आणि क्रीडा संघटनांवरील परिस्थितीचा विचार केला तरी तांत्रिकदृष्टय़ा ऑलिम्पिक पुढे ढकलले जाऊ शकत नाही. त्यामुळे अखेरीस ऑलिम्पिक रद्द करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही,’’ असे ८२ वर्षीय योशिरो म्हणाले.

२४ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.