चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 23, 2022 | Category : Current Affairs


आयफोन अनलॉक करणाऱ्या पहिल्या हॅकरला मिळाली ट्विटरमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप :
 • आयफोन हे सर्वात सुरक्षित उपकरण मानले जाते. इतर मोबाइल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो अनलॉक करून वापरण्याची सुविधा बाजारात उपलब्ध आहे. मात्र आयफोनमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तसे होत नाही, ही बाब अशक्य कोटीतील होती आणि त्याबद्दल अॅपलला रास्त अभिमानही होता. मात्र त्याला छेद दिला जॉर्ज हॉट्झ याने. २००७ साली त्याने आयफोन यशस्वरित्या अनलॉक करून दाखवला आणि त्यानंतर सॉफ्टवेअरसह हार्डवेअरमध्येही बदल करण्याची वेळ अॅपलवर आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळेच अॅपल आयफोनचे पुढचे व्हर्जन वेळेआधीच बाजारात आणण्याची नामुष्कीही अॅपलवर ओढवली. त्याच हॉट्झ याला आता ट्विटरच्या इलॉन मस्क यांनी आगळीवेगळी ऑफर दिली…

 • ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर इलॉन मस्क यांनी सुरुवातीस कंपनीतील अतिवरिष्ठांना घरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर लगेचच अर्ध्याहून अधिक कर्मचारी वर्ग घरी पाठवला. त्याचा फटकाही कंपनीला बसला आणि ट्विटरचे अनेक ग्राहक सोडून गेले, सेवा संथ झाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना परतण्याचा आग्रहही ट्विटरने करून झाला. अनेकांनी त्यास सपशेल नकार दिला. आता ट्विटरचे रुतलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न मस्क यांनी सुरू केला असून त्याचसाठी हॉट्झ याला ही ऑफर दिली आहे.

 • ट्विटरचे मुख्यालय असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप हॉट्झला दिली आहे. या इंटर्नशिपदरम्यान जॉर्ज ट्विटर सर्चवर काम कऱणार आहे. त्याने त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये याचा थेट उल्लेखच केला आहे. गुगल सर्चसारखा ट्विटर सर्चचा वापर लोक करू लागतील, अशा प्रकारचे बदल त्यात करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान , या ऑफर संदर्भातील पोस्ट जॉर्जने केल्यानंतर अनेकांनी विविध समस्याच त्याच्याकडे मांडल्या असून त्याच्या इंटर्नशिप दरम्यान त्याने त्या समस्यांची सोडवणूक करावी, अशी गळ त्याला घातली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७१ हजार उमेदवारांना दिली नोकरीची नियुक्तीपत्रे :
 • एकीकडे विरोधकांकडून देशातील बेरोजगारीच्या समस्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे मोदी सरकारनं रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोजगार मेळावा’ योजनेचा भाग म्हणून तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. शिक्षक, प्राध्यापक, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

 • बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने ‘रोजगार मेळावा’ या नावाने हा उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या सर्व नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक नियुक्त्या या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये अर्थात सीएपीएफमध्ये करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहविभागाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रोजगारासाठी प्राधान्य दिलं जात असून त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 • काय म्हणाले पंतप्रधान मोदी? दरम्यान, यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या संवादातून मोदींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की केंद्र सरकारनं तरुणांना सरकारी नोकरी देण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तरुण या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं कौशल्य वापरलं जावं, याला सरकारकडून प्राधान्य दिलं जात आहे. देशाच्या विकासामध्ये तरुणांचा हातभार लागावा यासाठी रोजगार मेळाव्याची मदत होईल”, असं मोदी यावेळी म्हणाले.

नासाचे ओरियन यान चंद्रालगत :
 • नासाचे ओरियन यान (कॅप्सुल) सोमवारी चंद्रापासून १३५ किलोमीटरवर  पोहोचले. या यानात अंतराळविरांऐवजी चाचणीसाठी तीन मानवी प्रतिकृती ठेवल्या आहेत. हे यान चंद्राच्या पृथ्वीवरून दिसू न शकणाऱ्या विरुद्ध बाजूला पाठविण्यात आले आहे.

 • नासाने ५० वर्षांपूर्वी अपोलो मोहीम राबविली होती. त्यानंतर प्रथमच हे यान चंद्रावर पोहोचले आहे. बुधवारी सुरू केलेल्या चाचणी मोहिमेचे हे मोठे यश आहे. या मोहिमेवर ४१० कोटी डॉलर खर्च केले जात आहेत.

 • चंद्रानजीक यान पोहोचल्यावर सुमारे अर्धा तास त्याचा ह्युस्टनमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. या यानाने पृथ्वीचे एक छायाचित्रही पाठविले आहे.

भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका - भारताचा मालिका विजय :
 • पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-न्यूझीलंडमधील मंगळवारी तिसरा आणि अखेरचा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार बरोबरीत राहिला. त्यामुळे हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील भारताने १-० अशी मालिका जिंकली. जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग (३७ धावांत ४ बळी) आणि मोहम्मद सिराजच्या (१७ धावांत ४ बळी) यांच्या गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला १९.४ षटकांत १६० धावांवर रोखले.

 • आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताने नऊ षटकांत ४ बाद ७५ धावा केल्या होत्या. तेव्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यावेळी कर्णधार पंडय़ा (३०)आणि दीपक हुडा (९) मैदानावर होते. यानंतर पंचांनी सामना पुढे न खेळवण्याचा निर्णय घेतला.

 • भारताची नऊ षटकानंतरची धावसंख्या ही डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार बरोबरीत राहिली. या संपूर्ण मालिकेत पावसाने विघ्न आणले. पहिला ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवला होता.

२३ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)