चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ मे २०२०

Date : 23 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनाची लस लवकर मिळेलच याची शाश्वती नाही; अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला इशारा :
  • करोनाच्या वाढत्या प्रसारानं जगाची झोप उडवली आहे. नोव्हेंबरमध्ये उद्रेक झाल्यानंतर करोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. त्यामुळे अनेक देशातील परिस्थिती भयावह झाली आहे. करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्याबरोबरच त्यावर औषधी शौधण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, करोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे.

  • नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला आहे.

  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. करोनाला आवर घालण्यासाठी सध्या त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञानं याविषयी भूमिका मांडली आहे. विलियम हेसलटाइन, असं या शास्त्रज्ञांचं नाव आहे. विलियम हे कर्करोग, एचआयव्ही/एड्स आणि मानवी जीनोम प्रकल्पांसंदर्भात काम करतात.

  • ‘रॉयटर्स’शी बोलताना विलियम म्हणाले,”करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजिकच्या काळात लस तयार होण शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा,” असा सल्ला त्यांनी दिला.

मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार :
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ॲमेझॉनने देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे.

  • लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

  • मागणी आणि पुरवठा साखळीमधील वेगवेगळ्या स्तरामधील नोकऱ्या उपलब्ध असल्याचे ॲमेझॉनने स्पष्ट केलं आहे. या ५० हजार नोकऱ्यांमध्ये अगदी फुलफीलमेंट सेंटर्स म्हणजेच वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांमधील नोकऱ्यांपासून ते डिलेव्हरी करण्यापर्यंत अनेक नोकऱ्यांचा समावेश आहे.

  • लॉकडाउनच्या कालावधीमध्ये म्हणजेच २५ मार्चपासून १७ मेपर्यंत देशामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तुंची डिलेव्हरी करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि किरणामालाच्या वस्तू वगळता इतर वस्तूंच्या डिलेव्हरीवर घालण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठवली आहे. देशभरामध्ये अत्यावश्यक वस्तूंबरोबरच इतर वस्तूंची डिलेव्हरी करण्याची परवानगीही ई-कॉमर्स कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर ई-कॉमर्स साईटवरुन वस्तूंच्या ऑर्डरची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालला आणि ओडिशाला अंतरिम साहाय्य :
  • चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपयांचे तर ओडिशाला ५०० कोटी रुपयांचे अंतरिम साहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

  • मोदी यांनी शुक्रवारी राज्यपाल जगदीप धनखार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत चक्रीवादळग्रस्त परिसराची हवाई पाहणी केली. उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील बासिरहाट येथे धनखार, बॅनर्जी आणि राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदी यांनी, चक्रीवादळात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.

  • देशात करोनाचा फैलाव झालेला असतानाच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी बॅनर्जी यांनी राज्यातील यंत्रणेमार्फत जे प्रयत्न केले त्याची मोदी यांनी या वेळी स्तुती केली.

  • मोदी यांनी ओडिशातील चक्रीवादळग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासमवेत चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. जगतसिंहपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, जाजपूर आणि मयूरभंज जिल्ह्य़ांची मोदी यांनी जवळपास ९० मिनिटे पाहणी केली.

२१ दिवसांत ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरा, युकेच्या न्यायालयाचे अनिल अंबानींना आदेश :
  • रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयानं त्यांना चीनच्या तिन बँकांची ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २१ दिवसांमध्ये ही रक्कम फेडावी लागणार आहे.

  • “या प्रकरणात अनिल अंबानी यांची वैयक्तिक हमी आहे. यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागेल,” असं हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाच्या न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितलं.

  • ही रक्कम भरण्यास प्रतिवाद्यांना बंधनकारक आहे, असं न्यायमूर्ती नीगेल यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. यामुळे त्यांना ही संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. ही एकूण रक्कम ७१ कोटी ६९ लाख १७ हजार ६८१ डॉलर्स इतकी आहे.

देशभरात चोवीस तासांत ६ हजार ६५४ नवे रुग्ण, १३७ मृत्यू :
  • देशभरात मागील चोवीस तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे.

  • देशभरातील तब्बल 1 लाख 25 हजार 101 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे. तर, टाळेबंदीमुळे करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

  • टाळेबंदी लागू केल्यामुळे १४ ते २९ लाख रुग्ण आणि ३७ ते ७८ हजार मृत्यू टाळण्यात यश आल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव व करोनासंदर्भातील उच्चाधिकार गट-१चे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी सांगितले आहे. बॉस्टन कन्स्लटंट ग्रुपच्या अंदाजानुसार आत्ता देशात असलेल्या करोनाबाधितांपेक्षा रुग्णांची संख्या ३६ लाख ते ७० लाखांनी जास्त झाली असती. रुग्णांचे मृत्यूही १.२ लाखांनी वाढले असते.

२३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.