चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 मार्च 2023

Date : 23 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!
  • राज्य सरकारने नुकताच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली. याच धर्तीवर आता खासगी बसमध्ये सुध्दा महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनकडून घेण्यात आला आहे. आज, गुडीपाडवापासून नवे तिकीट दर लागू होणार असल्याची माहिती असोसिशनकडून देण्यात आली.
  •  राज्य परिवहन महामंडळच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याची घोषणा करताच राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. घोषणेच्या दिवसापासूनच हा निर्णय अमलात देखील आणला गेला. त्यामुळे एसटी बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनामध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती.
  • यावर उपाय म्हणून गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत या गडचिरोली – चंद्रपूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल असा विश्वास संघटनेचे सदस्य राजू कावळे यांनी व्यक्त केला आहे.
सुमन कल्याणपूर, कुमार मंगलम बिर्ला यांना पद्म पुरस्कार प्रदान
  • राष्ट्रपती भवनमध्ये बुधवारी झालेल्या सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२३ चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना पद्मविभूषण, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांना  आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर  यांना पद्मभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. अब्जाधीश शेअर बाजारातील गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री (मरणोपरांत) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी १०६ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी ५० हून अधिक जणांना बुधवारी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
  • काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आणि नंतर भाजपमध्ये सामील झालेल्या कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी (मरणोत्तर) यांनाही देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.
  • बिर्ला, दिल्लीस्थित प्रा. कपिल कपूर, अध्यात्मिक गुरु कमलेश डी पटेल आणि कल्याणपूर यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला.
  • कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतात.
  • नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून समाजासाठी वेगवेगळय़ा प्रकारे योगदान देणाऱ्या परंतु फारसे प्रसिद्ध नसलेल्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे.
अयोध्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातील १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड पाठवणार
  • अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
  • भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार २२ मार्च  रोजी सकाळी गगांधी चौक येथे गुढीपूजन व १ कोटी रामनाम जाप लिखाण पुस्तिकेचे वितरणाची सुरुवात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आली.  याप्रसंगी ते बोलत होते. रामनाम जापाच्या या पुस्तिका अयोध्या येथील नवनिर्मित राम मंदिरासाठी लोकनेते मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणाऱ्या काष्ठ(सागवान)पूजन प्रसंगी २९  मार्चला प्रभू श्री रामाला समर्पित केल्या जातील.
  • या पूर्वी चंद्रपूरकरांनी मोठया प्रमाणात,अयोध्या मंदिरासाठी रामशिला पाठविल्या होत्या.आता १ कोटी रामनाम जापाचे लिखाण करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी रामभक्तांना  हिंदू नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी प्राप्त होत आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. २९ मार्च रोजी सागवान लाकूड ची मिरवणूक बल्लारपूर येथील वन विभागचे डेपोतून निघणार आहे. ही भव्य शोभायात्रा चंद्रपुरात दाखल होऊ. सायंकाळी चांदा क्लब ग्राउंड येथे प्रसिद्ध गायक कैलाश खेर याचे भक्ती संगीतचा कार्यक्रम होईल अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
समलैंगिक संबंधांविरोधात ‘या’ देशात लागू होणार कठोर कायदा, जन्मठेप ते फाशीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
  • जगभरातील अनेक देशांमध्ये समलैंगिकांच्या हक्कांवरुन अद्याप वाद सुरु आहे. यात बहुतेक समलैगिंक गट आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी आंदोलने, मोर्चे काढत लढा देत आहेत, पण दुसरीकडे काही देशांनी समलैंगिक संबंध हा गुन्हा जाहीर करत त्याविरोधात कडक कायदे लागू करण्यास सुरुवात केली आहे. यात आता आफ्रिकन देशांतील युगांडामध्ये समलैंगिक संबंधांबाबत कठोर कायदा मंजूर करण्यात आला आहे. ज्यानुसार आता समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीस कठोरातील कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे.
  • समलैंगिक अर्थात LGBTQ म्हणून जर कोणी आपली ओळख सांगत असल्यास त्या व्यक्तीला जन्मठेपेपासून फाशीपर्यंतची शिक्षा होऊ शकते. म्हणजे हा कायदा LGBTQ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणालाही गुन्हेगार ठरवतो. हा कायदा लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर यांना लागू होणार आहे. पण अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच कायदा आहे ज्यात समलैंगिकांविरोधात इतक्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  • युगांडाच्या संसदेने समलैंगिक संबंधांबाबत (LGBTQ) हा सर्वात कठोर कायदा संमत केला आहे. ह्युमन राइट्स वॉचचा हवाला देत अल जझीराने एक अहवाल जाहीर केला. ज्यानुसार ३० हून अधिक आफ्रिकन देशांनी समलैंगिकतेवर बंदी घातली आहे. यात आता युगांडा देशाचाही समावेश झाला आहे. या कायद्यामुळे आता युगांडा देशात समलैंगिक संबंध ठेवणे, समलैंगिक वर्तनाला प्रोत्साहन देणे आणि समलैंगिक क्रियाकलापांमध्ये सहभाग घेण्यास प्रतिबंध केला जाईल.
  • जन्मठेप ते फाशीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद - या कायद्यानुसार आरोपी व्यक्तीविरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे. समलैंगिकतेच्या गंभीर प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे. तर समलैंगिक लैंगिक संबंधासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. कायद्यानुसार, समलैंगिकतेच्या गंभीर गुन्ह्यात इतर गोष्टींचा समावेश आहे. यात समलैंगिक व्यक्तीने अल्पवयीन व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणेही गंभीर गुन्हा मानला जाईल, तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तीने कोणाशीही संबंध ठेवले तर त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते.
सलग तिसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद होत सूर्याने नोंदवला लाजिरवाणा विक्रम; पाहा गोल्डन डक खेळाडूंची यादी
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २४८ धावांवर गडगडली आणि सामना गमावला. या सामन्यात सूर्यकुमार यादवला पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे सलग तीन सामन्यांत गोल्डन डक होणाऱ्या सूर्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
  • सूर्यकुमार यादव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला नंबर वन फलंदाज असेल, पण किमान तीन सामन्यांच्या मालिकेत खेळताना तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये बाद होणे त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा धब्बा असेल. असे कोणत्याही क्रिकेटपटूसोबत घडलेले नसून सूर्याच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला आहे. चेन्नईत झालेल्या सामन्यात सूर्याला अॅश्टन अगरने क्लीन बोल्ड केले. आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या सलग तीन डावात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
  • उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरला होता. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळाली, पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. त्याच वेळी, तिसऱ्या सामन्यात तो ७ व्या क्रमांकावर उतरला होता. तिथेही तो पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरला. मात्र, सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये गोल्डन डक होणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे, असे नाही.
  • सूर्याच्या अगोदर हा विक्रम १९९४ मध्ये सचिन तेंडुलकर, १९९६ मध्ये अनिल कुंबळे, २००३-०४ मध्ये झहीर खान, २०१०-११ मध्ये इशांत शर्मा आणि २०१७-१९ मध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. तथापि, सूर्यकुमार यादव हा एकमेव खेळाडू आहे, जो वनडे मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये ० धावांवर बाद झाला.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 मार्च 2022

 

रशियन बुद्धिबळपटू कार्याकिनवर बंदी :
  • युक्रेनवर आक्रमण करण्याच्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कृतीचे समर्थन करणारा रशियाचा ग्रँडमास्टर सर्गे कार्याकिनवर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) सहा महिन्यांची बंदी घातली आहे. ३२ वर्षीय कार्याकिनने २०१६मध्ये जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला आव्हान दिले होते. सध्या तो जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी आहे. त्याने गेल्या काही आठवडय़ांत युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा निर्णय योग्य असल्याचे समाजमाध्यमांवर म्हटले होते. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. आता कार्याकिनवर ‘फिडे’नेही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • ‘‘सर्गे कार्याकिनने ‘फिडे’च्या आचारसंहितेच्या कलम २.२.१०चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून या काळात त्याला ‘फिडे’च्या कोणत्याही स्पर्धामध्ये खेळता येणार नाही. ही बंदी २१ मार्च २०२२ पासून लागू झाली आहे,’’ असे जागतिक संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कार्याकिनला ‘फिडे’च्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी २१ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

  • कार्याकिन आता रशियाकडून खेळत असला, तरी २००९ सालापर्यंत तो युक्रेनचे प्रतिनिधित्व करत होता. त्यामुळे त्याने रशियाच्या कृतीचे समर्थन केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. ‘फिडे’ने घातलेल्या बंदीमुळे कार्याकिनच्या १६ जूनपासून खेळवण्यात येणाऱ्या आव्हानवीरांच्या स्पर्धेतील सहभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला जागतिक अजिंक्यपद लढतीत कार्लसनशी दोन हात करण्याची संधी लाभेल. रशियाचा आणखी एक ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू सर्गे शिपोव्हवर मात्र ‘फिडे’ने बंदी घालणे टाळले आहे. शिपोव्हने रशियाचे समर्थन केले असले, तरी त्याने केलेली विधाने ही कार्याकिनपेक्षा काहीशी वेगळी आणि कमी उत्तेजक होती, असे ‘फिडे’कडून सांगण्यात आले.

‘नोव्हावॅक्स’च्या कोविड लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता :
  • जगभरातील सर्वच देश करोना विरोधात लढा देत आहेत, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. नोव्हावॅक्सच्या करोनावरील लशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. ही लस १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनी दिली जाईल.

  • नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 म्हणूनही ओळखली जाते. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ही लस बनवत आहे. भारतात ती Covovax या नावाने ओळखली जाईल. ही पहिली प्रोटीन-आधारित लस आहे.

  • सप्टेंबर २०२०मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. तर, कोवोव्हॅक्स ही भारतातील चौथी अशी लस आहे जी देशात १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल.

  • याआधी भारतात बायोलॉजिकल ई ची Corbevax, झायडस कॅडिलाची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची Covaccine १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती.

लक्ष्य जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी :
  • ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक कमावणाऱ्या भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक बॅडमिंटन महासंघाने मंगळवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने दोन स्थानांनी सुधारणा करीत जागतिक क्रमवारीत नववे स्थान गाठले आहे.

  • उत्तराखंडचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य हा ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पाचवा खेळाडू ठरला. परंतु रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात डेन्मार्कचा जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील खेळाडू व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने त्याची विजयी घोडदौड रोखली. मात्र लक्ष्यने ७४,७८६ गुणांची कमाई करीत  दिमाखदार आगेकूच केली. ताज्या क्रमवारीत किंदम्बी श्रीकांतची १२व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या लक्ष्य हा भारताचा पुरुष एकेरीतील सर्वोच्च क्रमांकावरील खेळाडू आहे.

  • ऑल इंग्लंडची उपांत्य फेरी गाठणाऱ्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने महिला दुहेरीत १२ स्थानांनी आगेकूच करताना कारकीर्दीतील सर्वोत्तम असे ३४वे स्थान गाठले आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू क्रमवारीत सातव्या क्रमांकावर कायम आहे, तर सायना नेहवालने दोन स्थानांनी सुधारणा करीत २३वे स्थान गाठले आहे.

युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबाबत भारताची भूमिका दोलायमान- बायडेन :
  • युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला विरोध करण्याबाबत क्वाड देशांपैकी भारताची भूमिका ही काहिशी दोलायमान असल्याचे मत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले आहे. 

  • क्वाड गटात अमेरिका, भारतासह ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे. यापैकी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यांबाबत उघडपणे विरोधाची भूमिका घेतली आहे. महिनाभरापूर्वी क्वाडचे चारही नेते बायडेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमोओ किशिदा यांची आभासी शिखर बैठक झाली होती.

  • त्यावेळी त्यांच्या संयुक्त निवेदनात रशियावर टीका नव्हती. त्यानंतर आता सोमवारी अमेरिकेच्या राजकीय व्यवहार खात्याच्या अवर सचिव व्हिक्टोरिया नुलंड यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी भेट झाल्याच्या वेळीच बायडेन यांनी हे वक्तव्य केले आहे. उभय देशांत युक्रेनबाबत चर्चा झाली, असे परराष्ट्र खात्यातर्फे सांगण्यात आले. वॉिशग्टनमध्ये एका व्यापारविषयक परिषदेत बायडेन म्हणाले की, नाटोमध्ये फूट पाडण्यात आपण यशस्वी होऊ, असे पुतिन यांना वाटत होते, पण आज पुतिन यांच्यामुळे (त्यांच्या विरोधात) नाटो देश इतिहासात कधी नव्हे इतके एक झाले आहेत. पण क्वाडच्या बाबत सांगायचे तर युक्रेनबाबत ठाम भूमिका घेण्यात भारत काहीसा अपवाद ठरत आहे. पण जपान आणि ऑस्ट्रेलिया हे पुतिन यांच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या निर्णयाविरोधात अत्यंत ठाम आहेत.

अखिलेश यादव यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सोपवला सभागृह सदस्यत्वाचा राजीनामा :
  • समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे नेते आझम खान यांनी आज (मंगळवार) लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकेड सुपूर्द केला आहे. अखिलेश यादव २०१९ मध्ये आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, अखिलेश यादव मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा ६७ हजार ५०४ मतांच्या फरकाने पराभव करून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

  • अखिलेश यादव आता विधानसभेत विरोधक म्हणून भूमिका बजावणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन अखिलेश यादव यांनी राजीनामा सुपूर्द केला. तर, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान हे उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. विधानसभा निवडणुकीत आझम खान यांनी रामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या आकाश सक्सेना यांचा ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

  • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून योगी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. तर समाजवादी पार्टीला विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार आहे. अखिलेश यादव यांनी आता राज्याच्या राजकारणात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावणार आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या विरोधात मैदानी तयारी करण्यासाठी ते राज्याच्या राजकारणात सक्रियपणे सहभागी होतील, असे दिसत आहे.

२३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.