चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ मार्च २०२१

Date : 23 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अलेक्झांडर ज्वेरेवने जिंकली मेक्सिकन ओपन स्पर्धा :
  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला जर्मनीचा आघाडीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यंदाच्या मेक्सिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटतकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवने ग्रीसचा टॉप सीडेड टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासला 6-4, 7-6(7-3) अशी धूळ चारली.

  • तुल्यबळ टेनिसपटूंमधील हा सामना तब्बल 2 तास आणि 17 मिनिटे रंगला होता. ज्वेरेवचा हा 14वा एटीपी किताब आहे. मागील वर्षी यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवला पराभवाचा धक्का बसला होता. तर, 2019च्या एटीपी 500 स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसकडून मात खावी लागली होती.

  • विजेतेपदानंतर ज्वेरेवची प्रतिक्रिया - मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर ज्वेरेव म्हणाला, ”मी पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती. त्यामुळे चांगले खेळत नसल्याचा विचार माझ्या डोक्यात येत होता. माझा मार्ग शोधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आणि मी पहिला सेट जिंकला.”

दिल्लीतील ‘सरकार’ म्हणजे ‘नायब राज्यपाल’ :
  • दिल्लीतील ‘सरकार’ म्हणजे ‘नायब राज्यपाल’ हे सुस्पष्ट करणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. काँग्रेस आणि ‘आप’ने या विधेयकाला जोरदार विरोध करत हा कायदा घटनाबाह््य असल्याची टीका केली आहे.

  • दिल्ली सरकारच्या कारभाराशी संबंधित काही प्रश्नांबाबत अस्पष्टता असल्याने आणि त्याबाबत न्यायालयात अनेक खटले दाखल करण्यात आल्याने ‘गव्हर्नमेण्ट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक २०२१’ आवश्यक असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

  • कृपया या विधेयकाला राजकीय विधेयक असे संबोधण्यात येऊ नये, दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्याने काही प्रश्नांबाबतची अस्पष्टता संपुष्टात आणण्यासाठी हे विधेयक आणले आहे. या विधेयकामुळे काही संभ्रम आणि तांत्रिक बाबी संपुष्टात येतील आणि प्रशासनाच्या गतिमानतेत वाढ होईल, असे रेड्डी म्हणाले.

  • दिल्लीतील सत्तारूढ ‘आप’ने या विधेयकाला विरोध केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला विधेयक मागे घेण्याचीही विनंती केली आहे. इतकेच नव्हे तर विधेयक मागे घेण्यासाठी मोदी सरकारच्या पायावर लोटांगण घालण्यासही आप तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस प्रभावी, सुरक्षितच :
  • कोविड १९ प्रतिबंधक अ‍ॅस्ट्राझेनेकाची ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस ७९ टक्के प्रभावी असल्याचे अमेरिका, चिली व पेरू या देशात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या चाचण्यात दिसून आले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने ही माहिती सोमवारी जाहीर केली असून आता अमेरिकेतही या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • ही लस करोनावर ७९ टक्के  प्रभावी आहे. ज्यांना हा आजार गंभीर स्वरूपात आहे व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते त्यांच्यातही लस १०० टक्के प्रभावी व सुरक्षित दिसून आली आहे.

  • अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने सोमवारी सर्व वयोगटांतील एकूण ३२ हजार स्वयंसेवकांवरील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले असून मानवी चाचण्या यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या आहेत. या माहितीमुळे ब्रिटिश -स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या ऑक्सफर्ड लशीची विश्वासार्हता वाढली आहे. कारण या आधीचे अभ्यास हे माहितीच्या संदर्भात जास्त ठोस नव्हते. आता विविध प्रकारच्या वयोगटातील स्वयंसेवकांवरील चाचण्यांचे हे निष्कर्ष आहेत.

  • युरोपीय समुदायातील अनेक देशांनी ही लस दिल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होऊन काही रुग्ण दगावल्याचे कारण देऊन लशीचा वापर थांबवला होता, पण नंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. युरोपीय देशांनी काही काळासाठी या लशीचा वापर थांबवला होता, पण नंतर प्रादेशिक औषध नियामकांनी ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता.

‘मनरेगा’चा निधी पर्जन्य जलसंवर्धन कामांसाठी वापरा- पंतप्रधान मोदी :
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) निधी मोसमी पावसाच्या आगमनापूर्वीच  पर्जन्य जलसंचयासाठीच्या कामांसाठी वापरावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॅच द रेन’ मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

  • मनरेगाचा पैसा पर्जन्य जल  संवर्धनासाठी वापरण्याची गरज आहे, जेव्हा मोसमी पावसाला सुरुवात होईल तेव्हापासून पर्जन्य जलसंचयाच्या पूर्वतयारीच्या कामांना सुरुवात झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘कॅच द रेन’ मोहिमेच्या आरंभाची घोषणा केली.  त्यावेळी ते म्हणाले की, भारतातील पावसाचे बरेच पाणी वाया जाते ही दुर्दैवाची बाब आहे. पावसाच्या पाण्याचा जेवढा जास्त संचय केला जाईल तेवढे आपले भूजलावरील अवलंबित्व कमी होईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा योजनेतील पैसे मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी पर्जन्य जलसंचयाच्यासाठी आवश्यक कामांसाठी वापरले गेले पाहिजेत.

  • या आभासी कार्यक्रमास देशाच्या वेगवेगळ्या भागातील सरपंचही उपस्थित होते. त्यातील काहींनी जलसंवर्धनाचे त्याचे अनुभव कथन केले.

‘गांधी विचार परिषद’ संस्थेलाही ‘करोना’ने ग्रासले :
  • गांधी विचाराचे पाईक घडवणाऱ्या ‘गांधी विचार परिषद’ या संस्थेलाही ‘करोना’ने ग्रासले आहे. २०२०-२१  या सत्रात विद्यार्थी  इकडे फिरकलेच नसल्याने संस्थेवर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.

  • बजाज समूहातर्फे  १९८७ ला ‘इन्स्टिट्यूट ऑफ  गांधीयन स्टडीज’ म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली. ‘गांधी विचार परिषद’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत वर्षभराचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकवला जात असे. १५ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व्हायचा. निवासी स्वरूपाचे शिक्षण होते. या सर्व विद्यार्थ्यांवर संस्थेतर्फे  ४५ लाख  तर एकूण कामकाजावर ६० लाखांचा वार्षिक खर्च होत होता. संस्थेतर्फे  शिक्षित विद्यार्थ्यांनी देशविदेशात गांधी मूल्यांवर आधारित उपक्रम राबवले.  मात्र करोनाचा दंश अभ्यासक्रमास संपुष्टात आणणारा ठरला.

  • २०२०-२१ या सत्रात विद्यार्थी फिरकलेच नाही. करोना संक्रमणाची स्थिती कायम असल्याने या सत्रातसुद्धा विद्यार्थी मिळणे कठीण आहे. त्यामुळे अभ्यासक्रम व अनुषंगिक खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिषदेचे संचालक भरत महोदय म्हणाले, मोठमोठ्या विद्यापीठांनाच करोनाने ग्रासले आहे. विद्यार्थी यायला तयार नाहीत. शिकवायचे कुणाला? त्यामुळे अभ्यासक्रम नाईलाजास्तव बंद करावा लागत आहे. संस्थेत कार्यरत अकरा कर्मचाऱ्यांचाही प्रश्न आहे. वर्षभरापूर्वी त्याबाबत चांगलीच ओरड झाली. मात्र स्थिती निदर्शनास आल्यावर काहीसे निवळले.

  • नऊ कर्मचाऱ्यांना शिक्षा मंडळ या सहयोगी संस्थेत सामावून घेण्यात आले. रोजंदारीवर काम करणाऱ्या मनुष्यबळाची समस्या आहेच. पूर्णवेळ नसलेल्या कर्मचाऱ्यांनी स्थायी असल्याप्रमाणे मागण्या मांडल्या. त्या पूर्ण करणे शक्य नाही. तरीही आम्ही रोजंदारीवर ठेवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. शासकीय निरीक्षण असल्याने मुद्दा जटील झाल्याचे संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांनी सांगितले. संस्थेचा परिसर गीता प्रतिष्ठानच्या मालकीचा आहे. प्रतिष्ठानने जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेला तो भाडेतत्त्वावर दिला होता. संस्थेचे कार्य सुरूच राहील, असे नमूद करीत भार्गव म्हणाले की गांधी विचारांप्रती बजाज समूहाची कटिबद्धता कायम आहे.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा - भवानी देवीला राष्ट्रीय विजेतेपद :
  • टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (तमिळनाडू) हिने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भवानीने नवव्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

  • दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. उपांत्य लढतीत भवानीने के. अनिताचा १५-४ असा सहज पाडाव केला. त्याआधी, भवानीने स्पर्धेस दिमाखदार सुरुवात करताना पहिल्या गटसाखळी सामन्यात जसप्रीत कौरला (जम्मू आणि काश्मीर) १५-२ असे सहज हरवले. परंतु भवानीचा तेलंगणाच्या बेबी रेड्डीने कस पाहिला. भवानीने ही चुरशीची लढत १५-१४ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भवानीने पंजाबच्या जगमीत कौरला १५-७ असे हरवून उपांत्य फेरी गाठली होती.

  • याचप्रमाणे सेनादलच्या कुमारसन पद्म गिशो निधीने गतविजेत्या करण सिंगला (राजस्थान) हरवून पुरुषांच्या सॅबर प्रकारातील वैयक्तिक विभागात विजेतेपद जिंकले. करण सिंगने नुकत्याच बुडापेस्टला झालेल्या पुरुषांच्या ‘सॅबर वर्ल्डकप’ स्पर्धेत भारतीयांमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. या २० वर्षीय नवोदित गुणवान तलवारबाजाने जागतिक क्रमवारीत १९व्या असलेल्या कोन्स्टन्टाईन लोखानोवला नमवून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. पण या कामगिरीची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्पर्धेत करण सिंगला करता आली नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा - जपानच्या ओकुहाराला महिला एकेरीचे विजेतेपद : 
  • जपानची अव्वल महिला बॅडमिंटनपटू नोझोमी ओकुहाराने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या सीडेड ओकुहाराने अंतिम सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगला 21-12, 21-16 असे सहज हरवले. 2016मध्ये ओकुहाराने ही स्पर्धा जिंकली होती.

  • विजयानंतर ओकुहारा म्हणाली, “पुन्हा एकदा ऑल इंग्लंडची चॅम्पियन झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला इतर सामन्यांप्रमाणे अंतिम फेरीमध्येही खेळायचे होते. या सामन्यात मला माझे शॉट्स खेळायचे होते. चोचूवाँगचा हा पहिला अंतिम सामना होता. मला वाटते की, तिच्यावर थोडा दबाव होता.”

  • ओकुहारा म्हणाली, “पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी येथे विजेतेपद जिंकले, तेव्हा मला कोणताही दबाव जाणवला नाही. यावेळी मी महिला एकेरीच्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये होतो. त्यामुळे परिस्थिती बदलली. माझी एकूण कामगिरी उच्च दर्जाची झाल्याने मला आनंद झाला आहे.”

२३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.