चालू घडामोडी आणि दिनविशेष - 23 जून 2023

Date : 23 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव
  • अनुभवी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. रोनाल्डोने २० जून रोजी पोर्तुगालसाठी २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आइसलँडविरुद्धच्या सामन्यात हा खास टप्पा गाठणाऱ्या रोनाल्डोने विजयी गोल करत हा आनंद खास पद्धतीने साजरा केला. या युरोपियन चॅम्पियनशिप पात्रता सामन्यात पोर्तुगालच्या संघाने १-० असा विजय मिळवला.
  • ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही या सामन्यापूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने गौरव केला. रोनाल्डोने यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कुवेतच्या बद्र अल-मुतावाचा १९६ सामन्यांचा विक्रम मोडला. आइसलँडविरुद्धच्या या सामन्यात रोनाल्डोनेही ८९व्या मिनिटाला गोल नोंदवून आपल्या शैलीत हा दुहेरी आनंद साजरा केला.
  • ३८ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने पदार्पणानंतर जवळपास २० वर्षांनी २०० आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर रोनाल्डोच्या नावावर १२३ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले गेले आहेत. रोनाल्डोने त्याच्या २०० व्या सामन्यासंदर्भात यूईएफए वेबसाइटला दिलेल्या निवेदनात ही एक अविश्वसनीय कामगिरी असल्याचे म्हटले आहे.

हा विजय माझ्यासाठी खूप संस्मरणीय -

  • आपल्या २०० व्या सामन्याबाबत ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका निवेदनात म्हटले आहे की, मला या टप्प्यावर पोहोचून खूप आनंद होत आहे. हा असा क्षण आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणे ही खरोखरच अविश्वसनीय कामगिरी आहे. या सामन्यात विजयी गोल करणे संघासाठी अतिशय संस्मरणीय ठरले. आम्ही यापेक्षा चांगले खेळू शकलो नसतो. पण हे खेळात घडते. हा विजय माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिल.
दहावी उत्तीर्णांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून जेईई, निटच्या तयारीसाठी मिळवा लाखोंची मदत; जाणून घ्या सविस्तर…
  • इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज प्रत्येकालाच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे वेड आहे. याच्या तयारीसाठी आता सरकारकडून भरीव मदत केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टीकडून दोन लाख रुपये भरीव मदतीची योजना आखली होती. मात्र ती काही कारणाने बंद करण्यात येऊन आता दर्जेदार संस्थेकडून मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • ही योजना अनुसूचित जातीसाठी आहे. तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून जेईई आणि नीटसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
  • दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या अनूसुचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मागील सरकारने डाँ. बाबासाहेब आंबेडकर विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती. या योजनेमार्फत प्रत्येकी दोन लाख रुपये विद्यार्थ्यांना मिळणार होते.
  • तत्कालीन सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी ही प्रक्रिया न राबवता शिकवणी वर्ग सुरू करावे अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर परत गोंधळ झाला. ही योजना एक किंवा दोन वर्षांची करायची? या मागणीसाठी हे प्रकरण परत रेंगाळले. आता पुन्हा निविदा राबवून शिकवणी वर्गांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर मुलांना अर्ज करता येईल.
वीरेंद्र सेहवाग बनणार भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता? बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केले मोठे वक्तव्य
  • भारतीय संघाला यावर्षी दोन मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. एक आशिया कप आणि दुसरा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक. या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वांच्या नजरा संघ निवडीवर असणार आहे. चेतन शर्मा यांनी मुख्य निवडकर्ता पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर निवड समितीमध्ये रिक्त पद आहे.
  • सध्या भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहेत. दरम्यान, रिक्त असलेल्या एका पदाबाबत माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागचे नाव वारंवार समोर येत आहे. मात्र, निवडकर्त्यांना दिले जाणारे वेतन ही मोठी अडचण असल्याचे बोलले जात आहे.
  • एकेकाळी भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी दिलीप वेंगसरकर आणि के.के. श्रीकांतसारखे दिग्गज खेळाडू सांभाळताना दिसले. पण आता दिग्गज खेळाडू ही जबाबदारी पार पाडण्यापासून स्पष्टपणे टाळाटाळ करत आहेत. निवडकर्ता म्हणून मिळणारा पगार खूपच कमी आहे, असा यामागे सर्वांचा विश्वास आहे. यावेळी उत्तर विभागातील एका नावाचा निवड समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. याबाबत वीरेंद्र सेहवागचे नाव पुढे येत आहे.
  • बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला आपल्या निवेदनात सांगितले की, प्रशासकांच्या समितीच्या कार्यकाळातच सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते, परंतु नंतर अनिल कुंबळे प्रशिक्षक बनला. त्यामुळे आता तो स्वतःहून अर्ज करेल असे वाटत नाही. याशिवाय त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूलाही त्याच्या उंचीनुसार मोबदला द्यावा लागेल.
‘तेजस’ इंजिनांच्या निर्मितीसाठी करार
  • भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या महत्त्वाच्या संरक्षण कराराची गुरुवारी घोषणा करण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाच्या (एलसीए – एमके टू) इंजिनाची संयुक्तरीत्या निर्मिती करण्यासाठी अमेरिकेतील जीई एअरोस्पेस आणि भारताच्या हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात करार झाल्याची घोषणा जीईने गुरुवारी केली.
  • सध्या भारत लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी रशिया आणि युरोपीय देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे जीईबरोबर झालेला करार महत्त्वाचा आहे. या करारानुसार जीई एअरोस्पेसच्या एफ४१४ विमानांची भारतामध्ये संयुक्त निर्मिती केली जाणार आहे, तसेच यासाठी आवश्यक असलेले निर्यात अधिकार मिळवण्यासाठी जीई एअरोस्पेस अमेरिका सरकारबरोबर काम करत राहील. भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी एचएएलबरोबरचा हा सामंजस्य करार महत्त्वाचा असल्याचे जीईने म्हटले आहे. 
  • जीई भारत सरकारबरोबर अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) एमके२ इंजिन निर्मितासाठी सहकार्य करत राहील. एलसीए-एमके-टू उपक्रमाअंतर्गत जीई एअरोस्पेसने भारतीय हवाई दलासाठी ९९ इंजिनांची निर्मिती करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. त्याशिवाय ७५ एफ४०४ इंजिनांचा पुरवठा आधीच केला आहे.

जीई आणि भारत

  • जीई एअरोस्पेस भारतामध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे. त्यामध्ये इंजिन, तंत्रज्ञान, सेवा, अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्थानिक कंपन्यांकडून खरेदी या सर्वाचा समावेश आहे. तेजसच्या एमके१ आणि एमके२ या प्रकल्पांचा विकास आणि निर्मिती यामध्ये जीई एअरोस्पेसच्या एफ४०४ आणि एफ४१४ इंजिनांचा वापर केला जातो.
  • भारत आणि एचएएलबरोबर आमच्या दीर्घकालीन भागीदारीमुळे हा ऐतिहासिक करार करणे शक्य झाले आहे. 
अमेरिकेच्या संसदेत मोदी-मोदी चा गजर! भाषणात सांगितला AI चा नवा अर्थ, म्हणाले… “अमेरिका-इंडिया…”
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दहशतवाद, रशिया युक्रेन युद्ध यासह विविध मु्द्द्यांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी AI या शब्दाचा नवा अर्थ सांगितला. AI चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा होतो. मात्र त्यांनी आपल्या भाषणात वेगळा अर्थ सांगितला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

  • २०० वर्षांपासून भारताने विश्वास संपादन करुन तो वृद्धींगत केला आहे. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग यांचा प्रभाव आहे. दोन शतकं दोन्ही देश एकमेकांवर प्रभाव पाडत आले आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी लोकशाहीची मूल्यं जपणं हे प्रथम कर्तव्य आहे. भारतात २ हजार ५०० राजकीय पक्ष आणि १ हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. दर १०० मैलांवर खाद्यसंस्कृतीही बदलते. जगाच्या लोकशाहीचा सहावा भाग भारत आहे. भारताचा विकास हा इतर देशांवर सकारात्मक परिणाम करणारा ठरतो. कारण भारत जेव्हा प्रगती करतो तेव्हा इतर देशही प्रगती करतात. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ असा नाराही यावेळी मोदींनी भाषणात दिला.

AI चा नवा अर्थ उलगडला

  • आजचा काळ हा AI म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा आहे. मात्र आज मी तुम्हाला AI चा नवा अर्थ सांगतो. AI म्हणजे अमेरिका-इंडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १.३० च्या सुमारास त्यांनी हे भाषण केलं.

अमेरिकेच्या संसदेत दुसऱ्यांदा भाषण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करण्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १.३० वाजता अमेरिकेच्या संसदेत पोहचले. अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. ज्यावेळी मोदी संसदेत आले तेव्हा मोदी-मोदीचा गजरही झाला. याआधी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत भाषण दिलं होतं.

 

प्रो लीग हॉकी (महिला) - भारताचा अमेरिकेवर विजय ; पदार्पणाच्या हंगामात तिसरे स्थान :
  • भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर ४-० अशी मात करत पदार्पणाच्या हंगामातच तिसरे स्थान मिळवले. भारताने पहिल्या लढतीत ४-२ असा विजय नोंदवला होता.

  • भारताकडून वंदना कटारियाने (३९व्या मिनिटाला, ५४वे मि.) दोन गोल करत निर्णायक भूमिका पार पाडली. तिला सोनिका (५४वे मि.) आणि संगिता कुमारी (५८वे मि.) यांनी गोल करीत उत्तम साथ दिली. अर्जेटिनाने यापूर्वीच लीगचे जेतेपद मिळवले आहे, तर नेदरलँड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवत अमेरिकेला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

  • भारताच्या महिला संघाने २३ वर्षांखालील पाच देशांच्या हॉकी स्पर्धेत आपली विजयी लय कायम ठेवत बुधवारी युक्रेनवर ३-० अशा फरकाने विजय मिळवला. भारताकडून निकिता टोप्पो (३३व्या मिनिटाला), मंजू चोरसिया (४४वे मि.), ब्युटी डुंगडुंग (५५वे मि.) यांनी गोल केले. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत युक्रेनवर दडपण आणले. युक्रेनकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र भारताच्या बचावफळीने ते हाणून पाडले.

योगामुळे विश्वशांती- मोदी  :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या जागतिक योगदिनानिमित्त ऐतिहासिक म्हैसूर राजवाडा परिसरात हजारो नागरिकांसह योगासने केली. या वेळी त्यांनी योगामुळे दैनंदिन जीवनशैलीपासून आंतरराष्ट्रीय संघर्षांविषयी जागरूकता होऊन विश्वशांती निर्माण होऊ शकते. योगामुळे देशा-देशांत संबंध जोडले जाऊन, समस्या मिटू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

  • म्हैसूरमध्ये आयोजित जागतिक योग दिनाच्या मुख्य सोहळय़ाचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी या दिनानिमित्त देशवासीयांसह जगभरातील नागरिकांना शुभेच्छा देताना सांगितले, की योग समाज, राष्ट्र आणि विश्वासह अवघ्या ब्रह्मांडात शांती निर्माण होते. योगाविषयीची ही धारणा एखाद्याविषयी फक्त विचार असू शकतो. परंतु भारतातील संतांनी ‘यत् पिंडे तत् ब्रह्मांडे’ या मंत्रातून याला उत्तर दिले आहे. ऋषी, मुनी व आचार्याचे दाखले देत मोदी म्हणाले, की अवघ्या ब्रह्मांडाची सुरुवात आपल्या शरीर व आत्म्याद्वारे होते. म्हणजे आपल्यापासून ब्रह्मांडाचा प्रारंभ होतो. योगामुळे शांती निर्माण होते. ही शांती केवळ काही लोकांना नव्हे तर अवघ्या समाजाला मिळते.

  • योग राष्ट्रांसह विश्वात शांती प्रस्थापित करतो. ब्रह्मांडातही शांती निर्माण करतो. याची सुरुवात स्वजागरूकतेद्वारे होते. त्यानंतर विश्वजागरूकतेकडे योगाची वाटचाल होते. जेव्हा आपण स्वत:विषयी व जगाविषयी जागरूक होतो, तेव्हा ज्या गोष्टी बदलण्याची गरज आहे, त्याचा शोध आपण स्वत:त आणि जगात घेऊ लागतो. मग ती दैनंदिन जीवशैलीतील आव्हाने असो अथवा जल-वायू परिवर्तनासारखी जागतिक आव्हाने अथवा जागतिक संघर्ष असो, असे सांगून मोदी म्हणाले, की योगामुळे आपल्याला या आव्हानांची जाणीव होते, त्यांना तोंड देण्यासाठी आपण सक्षम व करुणावानही बनतो. त्याप्रमाणचे योग देशांना जोडतो.

  • समस्यांतून मार्ग काढण्यास मदत करतो. योग ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली देणगी आहे. आज जगभरात योग लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आता तो बहुसंख्यांची जीवनशैली झाला आहे. योग समस्त जगाला फक्त आरोग्याचा मार्ग दाखवत नाही, तर अखिल मानवतेसाठी एक वैश्विक पर्व बनले आहे. काही वर्षांपूर्वी योग घरांत आणि आध्यात्मिक केंद्रांत सीमित होता. आता तो जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला आहे. भारतातील ज्या आध्यात्मिक केंद्रांनी योग-ऊर्जेचे पोषण केले, ती योग ऊर्जा आज जागतिक आरोग्याची दिशादर्शक बनली आहे. अवघ्या मानवी समाजात निरोगी जीवनविषयक विश्वास योगाने निर्माण केला आहे, असे मोदी म्हणाले.

राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा विरोधकांचे संयुक्त उमेदवार ; तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा :
  • माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपती पदाचे सर्वसंमत उमेदवार असतील. दिल्लीत मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यात आले. यशवंत सिन्हा २७ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा यांचे नाव अधिकृतपणे सुचवण्यात आले आणि काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी त्यांना पािठबा दिला. १५ जून रोजी झालेल्या बैठकीत पवार व त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांनी उमेदवारीसाठी नकार दिला होता. त्यामुळे महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांचे नाव तृणमूल काँग्रेसने सुचवले होते. मात्र, त्यांनीही नकार दिल्यामुळे विरोधकांपुढे उमेदवार निवडीबाबत पेच निर्माण झाला होता.

  • शरद पवार तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केल्यानंतर यशवंत सिन्हा यांच्या नावावर एकमत झाले. मात्र, उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असू नये, अशी अट काही पक्षांनी घेतली होती. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. राष्ट्रहितासाठी पक्षापासून दूर होऊन काम करण्याची गरज असल्याचे ट्वीट यशवंत सिन्हा यांनी केले.

  • बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा केली. लोकशाही व सामाजिक एकतेला मोदी सरकारच्या धोरणांमुळे धक्का बसला असून देशाचे अधिक नुकसान टाळण्यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विरोधी पक्षांचे संयुक्त निवेदनही रमेश यांनी वाचून दाखवले. २९ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.

उद्यापासून सुरू होणार भारतीय मुलींची श्रीलंका मोहिम, प्रसारकांची मात्र वानवा :
  • भारतीय महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिच्या निवृत्तीनंतर भारतीय महिला संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करण्यास सज्ज झाला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघ श्रीलंकेत दाखल झाला. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर तिन्ही प्रकारच्या संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिच्या नेतृत्त्वाखाली भारतीय मुली उद्यापासून (२३ जून) आपली श्रीलंका मोहिम सुरू करणार आहेत. मात्र, तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असलेल्या या दौऱ्याला अद्यापपर्यंत प्रसारकच मिळालेला नाही.

  • उद्या होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. हरमनप्रीतने १२१ टी २० सामन्यांमध्ये दोन हजार ३१९ धावा केलेल्या आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारामध्ये मितालीला मागे टाकण्यासाठी तिला फक्त ४६ धावांची गरज आहे. तर, स्मृती मंधानाला टी २० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २९ धावांची गरज आहे. तिने जर दोन हजार धावा पूर्ण केल्या तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरू शकते.

  • बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेलाही केवळ आठ महिने बाकी आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात करावी लागणार आहे. महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे.

  • भारत आणि श्रीलंकेदरम्यानची टी २० मालिका सुरू होण्यासाठी २४ तासांपेक्षाही कमी कालावधीत शिल्लक आहे. असे असताना हे सामने भारतात प्रसारित होणार की नाही याची अद्याप काहीही माहिती नाही. कोणत्याही प्रसारकाने हे सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा दूरदर्शनवर प्रसारित करण्याचे अधिकार घेतलेले नाहीत.

अडीच वर्षांत आदिवासी परिषदेची बैठकच नाही! ; आदिवासींच्या हितसंवर्धनाचे विषय कागदावरच :
  • राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांना आदिवासींच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्यासाठी जनजाती सल्लागार परिषदेची एकदाही बैठक घेण्यास वेळ मिळाला नाही. परिणामी, आदिवासींना घटनात्मक हक्कापासून वंचित राहावे लागले.

  • राज्य शासनाला आदिवासींच्या उत्थानाकरिता विकास कार्यक्रम देणे, योजना आखण्याचा सल्ला देणे, आदी कामे जनजाती सल्लागार परिषदेचे आहे. राज्य घटनेच्या पाचव्या अनुसूचीतील भाग-ख मधील परिच्छेद ४(१) अनुसार ही परिषद अस्तित्वात आली आहे. ही परिषद आदिवासी समाजाच्या कल्याण योजना, धोरण, कार्यक्रम राबवणे आणि आदिवासींच्या हितसंवर्धनासाठी राज्यपालांना सल्ला देत असते. या परिषदेची पुनस्र्थापना २३ जुलै २०२० रोजी करण्यात आली. परंतु एकही बैठक घेण्यात आली नाही. आदिवासी युवकांसाठी विशेष पदभरती मोहीम राबवणे, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करणे, आदिवासींना जमिनीचे पट्टे देणे, बनावट आदिवासींनी बळकावलेल्या सरकारी नोकरीचा प्रश्न तसेच आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी बळकावण्याचा प्रश्न, अनेक वर्षांपासून जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, असे अनेक प्रश्न या परिषदेच्या माध्यमातून निकाली निघणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या २०१२ च्या अहवालातील सूचनेचेदेखील पालन झाले नाही. आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर एक महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेची पुनस्र्थापना आणि वर्षांतून किमान चार बैठका घेणे बंधनकारक आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी करोना काळात ऑनलाइन आणि त्यानंतरही ऑफलाइन बैठक घेतली नाही.

  • करोना काळात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन बैठका घेत काही विषय निकाली काढले, परंतु आदिवासींचे प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटले नाही आणि बैठका घेण्याचा आग्रह परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना मुख्यमंत्र्यांकडे धरता आला नाही, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केला.

२३ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.