चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जून २०२०

Date : 23 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-चीन सीमेवर मोठा तणाव, भारत रशियाकडे करणार ‘ही’ महत्वाची मागणी :
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. भारताची तिन्ही सैन्य दले रशियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राजनाथ सिंह रशियाकडे तात्काळ सुट्टया भागांचा पुरवठा करण्याची मागणी करणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील फायटर विमाने आणि भारतीय लष्कराच्या मुख्य रणगाडयांसाठी सुट्टया भागांची आवश्यकता आहे. या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी रशियाकडे केली जाणार आहे.

  • पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणाव मोठया प्रमाणात वाढला आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर दोन्ही देशांनी सैन्य तैनाती केली आहे.

  • हवाई मार्गाने लवकरात लवकर हे सुट्टे भाग आणि उपकरणे पोहोचवण्याची विनंती रशियाला करण्यात येणार आहेत. उद्या वेळ आली आणि गरज पडली तर या उपकरणांचा वापर करण्यात येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

 उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुढे ढकलल्या :
  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यात करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विद्यार्थांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

  • राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) कक्षाच्या माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असेही सामंत यांनी संगितले.

नेपाळमधील नागरिकत्व कायदा भारतविरोधी :
  • नेपाळच्या नागरिकत्व कायद्यात भारताला प्रतिकूल असे बदल करण्यात येत असून नेपाळी नागरिकाशी विवाह करणाऱ्या परदेशी महिलेला सात वर्षांनंतर नैसर्गिक नागरिकत्व मिळणार आहे.

  • नेपाळच्या विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला असून त्यामुळे मधेशी लोकांची अडचण होणार असल्याचे म्हटले आहे. मधेशी लोक सीमावर्ती भागात राहतात त्यामुळे त्यांचे भारताशी रोटीबेटी व्यवहार आहेत. नेपाळी काँग्रेस व जनता समाजवादी पक्ष यांनी म्हटले आहे की, या तरतुदीमुळे भारताशी असलेल्या रोटीबेटी व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

  • मधेशी हे तराई प्रदेशात राहणारे लोकअसून हा भाग दक्षिण नेपाळमध्ये येतो. हिमालयाच्या पायथ्याशी बिहारलगत हा भाग आहे. नागरिकत्व कायद्यातील प्रस्तावित सुधारणेनुसार एखाद्या परदेशी महिलेने नेपाळी व्यक्तीशी विवाह केला तर तिला सात अधिकार वापरता येतील. या महिलेला सात वर्षांनी नागरिकत्व मिळेल.

  • रविवारी संसदीय समितीने या सुधारणा विधेयकास मंजुरी दिली आहे. या सुधारणानुसार या परदेशी महिलांना सात वर्षे नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळणार नाही, पण त्यांना नेपाळमध्ये राहता येईल. त्यांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार अबाधित राहतील, त्यांना देशात उद्योग चालवता येईल. जन्म, मृत्यू, विवाह, घटस्फोट, स्थलांतर याची नोंदणी करता येईल. या महिलांना ओळखपत्रे देण्यात येतील.

गरीबांना सप्टेंबर महिन्यांपर्यंत मोफत धान्य पुरवा, सोनिया गांधींचं मोदींना पत्र :
  • गरीबांना सप्टेंबर महिन्यातपर्यंत मोफत धान्य पुरवा अशी विनंती करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देशात लॉकडाउन सुरु केल्यापासून गरीबांचे, स्थलांतरीत मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्या प्रत्येकाचे हाल होत आहेत.

  • त्यामुळे येणाऱ्या आणखी तीन महिन्याच्या कालावधीत म्हणजेच सप्टेंबर २०२० च्या शेवटापर्यंत गरीबांना धान्य मोफत द्यावं अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

“करोनाला आपण हरवू शकत नाही…” WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा :
  • आपण करोनाला हरवू शकत नाही असं वक्तव्य आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केलं आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हा इशारा दिला आहे. करोना काळातून सावरण्यासाठी आता अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशात WHO च्या महासंचालकांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली. दुबई मध्ये एका हेल्थ फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

  • WHO ने गेल्याच आठवड्यात करोना व्हायरसची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा दिला होता. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लोक लॉकडाउनला कंटाळले आहेत. COVID 19 मुळे आतापर्यंत जगभरात ४ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात लाखो लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. अमेरिका, आशिया खंडातल्या काही भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यूरोपमध्ये प्रतिबंधात्मक उपायही सुरु करण्यात आले आहेत.

  • या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मात्र यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं आहे. सध्याच्या घडीला हा रोग जगभरात त्याचे पाय पसरतो आहे. दुबईत झालेल्या व्हर्चुअल फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमबाज पूर्णिमाचे कर्करोगाने निधन :
  • भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे (लग्नापूर्वीची पूर्णिमा गव्हाणे) हिचे वयाच्या ४२व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाची मान्यताप्राप्त प्रशिक्षक असलेली पूर्णिमा गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. पूर्णिमाने आयएसएसएफ विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

  • नांदेड येथे जन्मलेल्या पूर्णिमाने मुंबईतून आपल्या नेमबाजी कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिला शिवछत्रपती पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. १० मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विक्रमाचीही तिने नोंद केली होती. निवृत्तीनंतर पूर्णिमाने श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.

  • उपचारानंतर पूर्णिमाची तब्येत सुधारली होती, असे माजी नेमबाज जॉयदीप कर्माकरने सांगितले. ‘‘पूर्णिमाच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्काच बसला. कनिष्ठ गटात खेळताना आमच्यात चांगली मैत्री झाली होती,’’ असे त्याने म्हटले.

२३ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.