चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 23, 2021 | Category : Current Affairs


करोना साथीतही भाविकांना कर्तारपूरला जाण्यास परवानगी :
 • कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यास पाकिस्तानने करोना साथ चालू असतानाही शीख भाविकांना परवानगी दिली आहे. कर्तारपूर तीर्थक्षेत्र खुले करण्याचा निर्णय नॅशनल कमांड अ‍ॅण्ड ऑपरेशन सेंटरने शनिवारी घेतला असून बाबा गुरू नानक देव यांची पुण्यतिथी २२ सप्टेंबरला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 • ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की शीख भाविकांना पुढील महिन्यापासून कोविड नियम पाळून येथे भेट देण्यास परवानगी देण्यात आली आहे. डेल्टा विषाणूमुळे पाकिस्तानने भारताला क गटात टाकले असून २२ मे ते १२ ऑगस्ट या काळात हा धोका वर्तवण्यात आला होता. शीख भाविकांना परवानगी घ्यावी लागत होती. आता लस घेतलेले लोक त्यांचे प्रमाणपत्र दाखवून पाकिस्तानात प्रवेश करू शकतील.

 • आरटीपीसीआर चाचणीचे त्यांचे ७२ तासातील अहवाल तपासले जातील. याशिवाय रॅपिड अँटिजेन चाचणी विमानतळावर करण्यात आली असून कुणाला संसर्ग असल्याचे दिसून आल्यास पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नाही. दरबारमध्ये एकावेळी तीनशे लोकांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले आहे.

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती : 
 • अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे.

 • गेल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.

 • “अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणं गरजेचं आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

राज्यात आठवी ते बारावीच्या ३८.१८ टक्के  शाळा सुरू :
 • राज्यात पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय कृती दलाच्या विरोधामुळे स्थगित करावा लागला. मात्र आठवी ते बारावीच्या ३८.१८ टक्के  शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती १४.६७ टक्के  आहे. नागपूर विभागात सर्वाधिक ६६.५३ टक्के  शाळा सुरू असल्याचे शिक्षण विभागाने संकलित के लेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

 • करोना संसर्ग कमी झाल्यावर शिक्षण विभागाने करोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास जुलैमध्ये मान्यता दिली. त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले.  पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य शासनाने नियुक्त के लेल्या तज्ज्ञांच्या कृती दलाने विरोध के ल्याने पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थगित करावा लागला. तर आठवी ते बारावीचे वर्ग गेला महिनाभर  ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत.

 • शिक्षण विभागाने संकलित के लेल्या माहितीनुसार राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि लातूर या विभागांमध्ये मिळून १७ हजार ७०१ (३८.१८ टक्के ) शाळा सुरू आहेत. तर १५ लाख १२ हजार विद्यार्थी (१४.६७ टक्के ) उपस्थित होते. प्रामुख्याने ग्रामीण भागांतील शाळा सुरू आहेत. तर लातूर, मुंबई, मुंबई महापालिका, रायगड, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतील माहिती उपलब्ध नाही. नागपूर विभागात सर्वाधिक ६६.५३ टक्के  शाळा सुरू आहेत. त्या खालोखाल अमरावती विभागातील ६५.१३ टक्के ,लातूर विभागातील ६२.६७ टक्के , नाशिक विभागातील ४७.२२ टक्के  पुणे विभागातील १९.४५ टक्के , कोल्हापूर विभागातील १८.९८ टक्के , मुंबई विभागातील ६.७६ टक्के  शाळा सुरू आहेत.

जागतिक युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - रुपेरी शैली :
 • भारताच्या शैली सिंगने रविवारी जागतिक युवा (२० वर्षांखालील) अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रुपेरी पदकाची कमाई केली. १७ वर्षीय शैलीचे पदक एक सेंटीमीटरच्या फरकाने हुकल्याचे शल्य ती लपवू शकली नाही. परंतु भारताने या स्पर्धेत प्रथमच एकूण तीन पदके जिंकण्याची किमया साधली.

 • शैलीने अंतिम फेरीमधील तिसऱ्या प्रयत्नात ६.५९ मीटर अंतरावर उडी मारत आघाडी मिळवली. परंतु स्वीडनच्या मॅजा अश्कागने चौथ्या प्रयत्नात ६.६० मीटर उडी घेत शैलीला मागे टाकले. मॅजाची हीच उडी सुवर्णपदकाची दावेदार ठरली. युक्रेनच्या मारिया होरीलोव्हाने कांस्यपदक पटकावले.

 • शैलीने पहिल्या दोन प्रयत्नांत प्रत्येकी ६.३४ मीटर उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नातील लक्षवेधी कामगिरीनंतर तिचा चौथा आणि पाचवा प्रयत्न अपयशी ठरला. मग अखेरच्या प्रयत्नात ६.३७ मीटर अंतर ती गाठू शकली.

 • दरम्यान, महिलांच्या ५ हजार मीटर शर्यतीत भारताच्या अंकिताला सहावे स्थान मिळाले.

२००२-किंग्स्टन : १ पदक

सीमा अँटिल  – कांस्यपदक

२०१४-युजिन : १ पदक

नवजीत कौर ढिल्लाँ  – कांस्यपदक

२०१६-बायड्गॉस : १ पदक

नीरज चोप्रा – सुवर्णपदक

२०१८-टॅम्पेरे : १ पदक

हिमा दास- सुवर्णपदक

२०२१-नैरोबी : ३ पदके

(२ रौप्य, १ कांस्य)

मिश्र रिले (बी. श्रीधर, कपिल, प्रिया मोहन, सुमी) – कांस्यपदक

 १० हजार मीटर चालण्याची शर्यत – अमित खत्री – रौप्यपदक

लांब उडी – शैली सिंग – रौप्यपदक

आतापर्यंतची एकूण पदके

सुवर्ण   रौप्य   कांस्य   एकूण

२         २         ३        ७

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स - एलिन जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान धावपटू :
 • ऑलिम्पिक विजेत्या एलिन थॉम्पसन-हेराहने शनिवारी युजिन डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यतीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवली. तिने ही शर्यत १०.५४ सेकंदांत पूर्ण केली. सर्वोत्तम वेळेचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ-जॉयनरच्या (१०.४९ सेकंद) नावावर आहे.

 • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधणाऱ्या एलिन हिने शेली-अ‍ॅन फ्रेसर-प्रायसेला दोन-दशांश सेकंदांच्या फरकाने हरवून सर्वानाच धक्का दिला. शेरिका जॅक्सनला तिसरा क्रमांक मिळवून या शर्यतीमधील जमैकाचे वर्चस्व सिद्ध केले.

 • ‘‘सुवर्णपदकासह सर्वोत्तम वेळ हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. कारण गेल्या पाच वर्षांत इतक्या वेगाने मी कधीच धावले नव्हते. २०० मीटर शर्यतीतही विक्रमी वेळ नोंदवण्यास मी उत्सुक आहे,’’ असे एलिनने सांगितले.

बुद्धिबळाच्या दोन राष्ट्रीय संघटना विलीन :
 • आपापसांतील मतभेद बाजूला सारून देशात बुद्धिबळाचा प्रसार करण्याच्या हेतूने भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांनी शनिवारी विलीनीकरणाचा निर्णय घेतला.

 • महासंघाचे अध्यक्ष संजय कपूर यांनी याविषयी जाहीर करताना यापुढे बुद्धिबळाशी निगडित सर्व कार्ये महासंघाच्या नावाने होतील, असे सांगितले. ‘‘सर्व भागधारक आणि पदाधिकाऱ्यांनी एकमताने विलीनीकरणास होकार दर्शवला आहे. भारतातील बुद्धिबळाला गती देण्याबरोबरच खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे,’’ असे कपूर म्हणाले.

 • ‘‘करोना साथीच्या पार्श्वभूमीवर अन्य महासंघाप्रमाणेच आम्हालाही बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता आपापसातील मतभेदांचा खेळाला अधिक फटका बसू द्यायचा नाही, या हेतूने आम्ही एकत्रित आलो असून लवकरच देशातील सर्व पातळींवरील स्पर्धांचे पूर्वीप्रमाणे आयोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असेही कपूर यांनी सांगितले.

२३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)