चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 ऑक्टोबर 2023

Date : 22 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
माजी फुटबॉलपटू बॉबी चाल्र्टन यांचे निधन
  • इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेडचे माजी फुटबॉलपटू सर बॉबी चाल्र्टन यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. चाल्र्टन यांची इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. इंग्लंडने १९६६च्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते आणि या विश्वविजेतेपदाचे नायक म्हणून चाल्र्टन यांना ओळखले जाते.
  • मध्यरक्षक असूनही चाल्र्टन यांच्या नावे ४० वर्षांहूनही अधिक काळ मँचेस्टर युनायटेड (२४९) आणि इंग्लंडसाठी (४९) सर्वाधिक गोलचा विक्रम होता. हे दोन्ही विक्रम वेन रूनीने मोडले होते. पुढे इंग्लंडसाठी सर्वाधिक गोलचा रूनीचा विक्रम सध्याच्या संघाचा कर्णधार हॅरी केनने मोडला.
  • ‘‘सर बॉबी हे केवळ मँचेस्टर किंवा इंग्लंडमधील नाही, तर जगभरातील फुटबॉलपटूंसाठी आदर्श होते. फुटबॉलपटू म्हणून त्यांची गुणवत्ता अलौकिक होतीच, पण त्यापेक्षा ते त्यांची खिलाडूवृत्ती आणि फुटबॉलची अखंडता जपण्यासाठी ओळखले जायचे.
  • सर बॉबी हे फुटबॉल या खेळातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून सगळय़ांच्या स्मरणात राहतील,’’ असे मँचेस्टर युनायटेड क्लबने आपल्या निवेदनात म्हटले. चाल्र्टन यांनी युनायटेडसाठी ७५८ सामने, तर इंग्लंडसाठी १०६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्यांना एकदाही लाल कार्ड मिळाले नाही.
पॅलेस्टाईनच्या मदतीला भारताची धाव; तंबू, औषधांसह पाठवले ३२ टन साहित्य
  • गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. तसंच, तिथं इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा जगण्याची संघर्ष सुरू होता. अखेर, शनिवारी इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली आहेत. आता, भारतानेही गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांना मदत पाठवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत X या समाजमाध्यमावरून माहिती दिली.
  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची X वर म्हणाले की, पॅलेस्टाईन नागरिकांसाठी ६.५ टन वैद्यकीय साहित्य आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य IAF C-17 या विमानाने रवाना करण्यात आली आहेत. हे विमान इजिप्तच्या El-Arish या विमानतळावर पोहोचेल. औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने, तात्पुरत्या राहण्यासाठी तंबू, ताडपत्री, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू, जलशुद्धीकरण गोळ्यांसह विविध वस्तू पॅलेस्टाईन नागरिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

इस्रायलने केली होती नाकाबंदी

  • इंधनासह सर्व साहित्यांच्या गाड्यांना सीमेवरच अडवण्यात आल्याने गाझातील नागरिकांची कोंडी झाली होती. तेथील पॅलेस्टाईन नागरिकांचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरू होता. गाझा पट्टी आणि इजिप्तमधील सीमेवर आधीपासूनच संयुक्त राष्ट्राने पाठवलेल्या सुमारे तीन हजार टन मदतसामुग्रीचे ट्रक उभे होते. शनिवारी ही सीमा खुली झाल्यावर हे ट्रक गाझाच्या दिशेने निघाले. सध्याच्या युद्धग्रस्त गाझातून सुटका करून घेण्यासाठी हजारो नागरिक इजिप्तमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेत सीमेवर आहेत. मदत सामुग्रीच्या २० वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
नवाझ शरीफ चार वर्षांनंतर मायदेशी
  • स्वत:वर लादून घेतलेल्या निर्वासनाचा चार वर्षांचा काळ ब्रिटनमध्ये घालवल्यानंतर, आपल्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आणि येत्या जानेवारीत होणे अपेक्षित असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विक्रमी चौथ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे शनिवारी विशेष विमानाने मायदेशी परत आले.
  • फिक्या निळय़ा रंगाचा कुर्ता-पायजामा, किरमिजी रंगाचा मफलर व काळा कोट घातलेले ७३ वर्षे वयाचे पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे हे सर्वेसर्वा ‘उमीद-इ-पाकिस्तान’ या विशेष विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुबईहून पाकिस्तानला येऊन पोहोचले.
  • शरीफ यांच्या आगमनानंतर त्यांच्या कायदेशीर चमूने त्यांची भेट घेतली व काही कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने १९ ऑक्टोबरला शरीफ यांना मंजूर केलेल्या जामिनाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही कागदपत्रे न्यायालयाला सादर करायची आहेत. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी शरीफ यांचे बायोमेट्रिकही घेतले. सुमारे तासभर इस्लामाबादमध्ये थांबल्यानंतर, मिनार-इ-पाकिस्तान येथील सभेला संबोधित करण्यासाठी ते लाहोरला रवाना झाले.
भारताने कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले, अमेरिकेकडून काळजी व्यक्त, म्हणाले…
  • कॅनडात खालिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर कॅनडा आणि कॅनडातील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले. अशातच भारताने कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना २० ऑक्टोबपर्यंत भारत सोडायला सांगितलं. यानंतर कॅनडाने त्यांच्या ४१ अधिकाऱ्यांना सहकुटुंब मायदेशी परत बोलावलं. यावर अमेरिकेने प्रतिक्रिया देत काळजी व्यक्त केली आहे.
  • अमेरिकेचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, “भारताने कॅनडाच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितल्यानंतर कॅनडाचे अनेक अधिकारी भारत सोडून मायदेशी परतले. यामुळे आम्ही काळजीत आहोत.”

“भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगू नये”

  • अमेरिकेने भारताला कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं. मतभेद संपवण्यासाठी परराष्ट्र खात्याचे अधिकारी आपआपल्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगू नये आणि कॅनडाच्या तपासात सहकार्य करावं, अशी विनंती आम्ही भारत सरकारला केली आहे,” असंही मिलर यांनी नमूद केलं.
  • यावेळी अमेरिकेने १९६२ च्या ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’चा उल्लेख करत भारताने याचं पालन करावं, असंही म्हटलं.

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री जोली यांनी काय म्हटलं आहे?

  • भारताने भारतात असलेल्या कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना २० ऑक्टोबपर्यंत भारत सोडायला सांगितलं होतं. त्याची कल्पना आम्हाला देण्यात आली होती. त्यामुळे भारतातल्या ४१ कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासह देश सोडला आहे.
इस्रोचे मोठे यश, तांत्रिक बिघाडानंतर काही मिनिटांतच अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची केली यशस्वी चाचणी
  • स्बबळावर अवकाशात भारतीय अंतराळवीरांना नेण्याच्या इस्रोच्या गगनयान मोहीमेने आज एक पाऊल पुढे टाकले आहे. अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अंतराळात जाणार आहेत त्या यानाच्या आपातकालीन सुटकेची चाचणी (crew escape system) आज इस्रोने यशस्वी केली. यामुळे भविष्यात प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवतांना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटात तांत्रित बिघाड झाला तर प्रक्षेपकावर-रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाशान यानातील अंतराळवीरांना पुन्हा सुखरुप जमिनीवर आणणे हे शक्य होणार आहे. याबाबची पहिली चाचणी त्या अवकाश यानाच्या माध्यमातून आज करण्यात आली.
  • आज सकाळी आठ वाजता नियोजित ही चाचणी होणार होती. मात्र हवामानामुळे चाचणी पुढे ढकलली होती, त्यानंतर संगणकाने इशारा दिल्यावर ही चाचणीसाठी असलेले काऊंट डाऊन थांबवण्यात आले. मात्र नेमकं कारण लक्षात आल्यावर पुन्हा काऊंट डाऊन सुरु करत ही चाचणी करण्यात आली असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
  • अपेक्षेप्रमाणे चाचणीसाठी नियोजित केलेले आपातकालीन सुटकेचे सर्व टप्पे हे पुर्ण झाल्याचं यावेळी जाहिर करण्यात आलं आहे. आता गगनयानची आणखी एक चाचणी पुढील काही महिन्यात केली जाणार आहे.

 

जागतिक कुस्ती स्पर्धा - भारताच्या अंकुशला रौप्यपदक :
  • भारताची अंकुश फंगल (५० किलो वजनी गट) २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची मानकरी ठरली.

  • अंकुश निर्णायक लढतीत जपानच्या युई सुसाकीकडून पराभूत झाली. सुसाकीने अवघ्या ५२ सेकंदात दुहेरी पट काढून अंकुशला चितपट केले.

  • विशेष म्हणजे सुसाकीने विजेतेपदापर्यंतच्या सर्व लढती चितपट जिंकल्या. दरम्यान, मुलींच्या ५९ किलो वजनी गटात  मानसीने कांस्यपदकाच्या लढतीत लात्वियाच्या रमिना मामेडोवाने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे मानसी पदकाची मानकरी ठरली.

आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर :
  • गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या हाती नियुक्तीपत्र असेल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.

  • “मार्च २०१८मध्ये आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यात साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. परीक्षाशुल्कही भरलं. पण मधल्या काळात करोना, आरक्षणाच्या अडचणी या गोष्टींमुळे या भरतीकडे दुर्लक्ष झालं. पण आज आम्ही निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाशी संबंधित १० हजार १२७ जागा आम्ही भरणार आहोत”, असं गिरीश महाजन म्हणाले. यामध्ये आरोग्यसेवक, लॅब टेक्निशियन अशा जागांचा समावेश आहे.

  • कसं असेल भरतीचं वेळापत्रक - गिरीश महाजन यांनी सपूर्ण भरती प्रक्रियेबाबत यावेळी माहिती दिली. “मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत. २६-२७ मार्चपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल महिन्यात आम्ही उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार आहोत.१ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. २५ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान अर्जांची तपासणी होईल. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर केली जाईल. २५ मार्च आणि २६ मार्च या दोन दिवसांत परीक्षा घेतल्या जातील. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी जॉन्सन, सुनक यांचे प्रयत्न :
  • ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह काही इच्छुक ‘पार्लमेंट’ सदस्यांनी पाठिंबा मिळवण्यासाठीची मोहीम गतिमान केली. आपल्या ४५ दिवसांच्या  कारकीर्दीत करकपातीसारख्या वादग्रस्त  निर्णयामुळे ट्रस यांनी राजीनामा दिला. 

  • आता सत्ताधारी काँन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्ष पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी निवडणूक घेणार आहे. आठवडाभरात ही निवड केली जाईल. जॉन्सन यांच्यासह ब्रिटनचे माजी अर्थमंत्री व पक्षांतर्गत निवडणुकीत ट्रस यांच्याकडून हार पत्करावे लागलेले पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार ऋषी सुनक आणि ‘हाउस ऑफ कॉमन्स’च्या नेत्या पेनी मॉर्डाट यांना सट्टेबाजांनी पसंती दिली आहे.

  • अनेक वादांमुळे जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. नवीन नेत्यासाठी उमेदवारी नामांकन प्रक्रिया सोमवारी दुपारी बंद होईल.

‘अग्नी प्राईम’ची चाचणी यशस्वी :
  • भारताने शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या मध्यम पल्ल्याचे ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र ‘अग्नी प्राईम’ची यशस्वी चाचणी घेतली.

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी ही माहिती दिली. ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून सकाळी पावणे दहाला हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. सूत्रांनी सांगितले, की घन इंधन असलेल्या या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान सर्व निर्धारित मापदंड यशस्वीरीत्या पूर्ण केले.

  • अधिकाऱ्यांनी सांगितले, की क्षेपणास्त्राच्या प्रवासादरम्यान ‘रडार’द्वारे सातत्याने निरीक्षण केले गेले. तसेच यासाठी विविध ठिकाणी दूरमापक उपकरणे बसवली होती.

  • हे क्षेपणास्त्र एक ते दोन हजार किलोमीटपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. सूत्रांनी सांगितले, की या क्षेपणास्त्राची मागील चाचणी १८ डिसेंबर रोजी कलाम बेटावरूनच करण्यात आली होती. त्या वेळीही ती यशस्वी झाली होती.

इम्रान खान पाच वर्षांसाठी अपात्र :
  • पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना देशाच्या भांडारातील (तोशाखाना) भेटवस्तू विक्रीतून मिळालेले उत्पन्न दडवल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. या काळात इम्रान खान यांना कोणत्याही सार्वजनिक पदाची जबाबदारी घेता येणार नाही.
  • खान यांच्यावर विदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम उघड न केल्याचा आरोप होता. यामुळे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख असलेले ७० वर्षीय इम्रान खान पाच वर्षांसाठी पाकिस्तानच्या ‘पार्लमेंट’चे सदस्य होऊ शकत नाहीत. ऑगस्टमध्ये सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे (ईसीपी) या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

  • ‘तोशाखाना’ मधून सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या भेटवस्तू वाढीव किमतीला विकून त्याद्वारे आलेले उत्पन्न दडवल्याबद्दल खान यांना अपात्र ठरवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर आयोगाने १९ सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने इस्लामाबादमधील आयोगाच्या सचिवालयात खान यांच्याविरुद्ध हा निकाल दिला. खंडपीठाच्या सर्व पाच सदस्यांनी शुक्रवारी एकमताने खान हे भ्रष्ट व्यवहारात दोषी ठरवत त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. मात्र, घोषणेच्या वेळी पंजाबमधील सदस्य गैरहजर होते.

  • खान यांच्यावर भ्रष्ट व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे. या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे खान यांचा पक्ष ‘पीटीआय’चे सरचिटणीस असद उमर यांनी सांगितले. या पक्षाचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांनी हा निर्णय फेटाळून, इम्रान समर्थकांना या निर्णयाच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे आवाहन केले. देशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाने सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीत ‘नॅशनल असेंब्ली’च्या आठपैकी सहा आणि प्रांतीय विधानसभेच्या तीनपैकी दोन जागा जिंकल्या. या विजयाच्या पार्श्वभूमीवर बंदीचा हा निर्णय झाल्यानंतर इम्रान यांचे व ‘पीटीआय’ समर्थक नाराज झाले आहेत.

22 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.