चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ ऑक्टोबर २०२१

Date : 22 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार; सकाळी १० वाजता साधणार संवाद :
  • करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. देशाच्या करोनाविरोधी लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलीय.

  • सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील,” असं म्हटलं आहे. मोदी नक्की कोणत्या विषयावर बोलणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी कालच देशामध्ये १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याने मोदी या लसीकरण मोहिमेसंदर्भातच भारतीयांना माहिती देतील आणि लसीकरण मोहीम या पुढे कशी राबवली जाईल याबद्दल भाष्य करतील असं म्हटलं जात आहे.

  • देशात यंदा १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिल्या दहा कोटी डोस देण्यासाठी ८५ दिवस म्हणजे जवळपास तीन महिने लागले होते. २१ जूननंतर या मोहिमेला गती मिळाली.

केंद्रीय महागाईभत्ता ३१ टक्क्यांवर :
  • केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीधारकांच्या महागाईभत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता हा भत्ता २८ टक्क्यांवरून ३१ टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. पायाभूत क्षेत्रातील १०० लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेलाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

  • करोनाच्या काळात केंद्र सरकारने महागाईभत्ता गोठवला होता पण, यावर्षी जुलैमध्ये महागाईभत्ता पूर्ववत लागू करण्यात आला व तीन थकित हप्ते देण्याचीही घोषणा केंद्र सरकारने केली होती तसेच, महागाईभत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला होता.

  • आता हा महागाईभत्ता ३ टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तो १ जुलै २०२१ पासून लागू होईल. त्या निर्णयाचा ४७ लाख १४ हजार केंद्रीय कर्मचारी व ६८ लाख ६२ हजार निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे. महागाईभत्त्यातील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी ९ हजार ४२८ कोटींचा बोजा पडेल, असे केंद्रीयमंत्री ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दक्षिण कोरियाच्या पहिल्या अग्निबाणाचे प्रक्षेपण :
  • देशात तयार करण्यात आलेला पहिला अंतराळ अग्निबाण (स्पेस रॉकेट) दक्षिण कोरियाने गुरुवारी प्रक्षेपित केला. उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमासाठी हा देश करत असलेल्या प्रयत्नातील हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

  • ‘नुरी’ या तीन टप्प्यांच्या अग्निबाणात स्टेनलेस स्टील व अ‍ॅल्युमिनियमच्या ब्लॉकच्या स्वरूपातील दीड टन वजनाचा भार (पेलोड) ठेवण्यात आला होता. हा पेलोड ते पृथ्वीपासून ६०० ते ८०० किलोमीटर अंतरावर कक्षेत नेऊ शकले की नाही, हे लगेच कळले नाही.

  • ४७ मीटरचा हा अग्निबाण नारो अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आल्यानंतर तेजस्वी पिवळ्या रंगाच्या ज्वाला मागे सोडत अवकाशात झेपावत असल्याचे थेट प्रक्षेपणात दिसले. दक्षिण किनाऱ्याजवळील एका लहान बेटावर असलेले हे देशातील एकमेव अवकाश केंद्र आहे. अध्यक्ष मून जाए-इन यांनी हे प्रक्षेपण पाहिले.

  • अभियंत्यांना अग्निबाणाच्या व्हॉल्व्हची तपासणी करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने त्याचे प्रक्षेपण सुमारे तासाभराने लांबले. जोराने वाहणारे वारे  व इतर घटकांमुळे यशस्वी प्रक्षेपणापुढे आव्हाने उभे राहण्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. हा अग्निबाण पेलोड कक्षेत यशस्वीरीत्या नेऊ शकले की नाही हे ठरवण्यासाठी सुमारे ३० मिनिटे लागतील, असे कोरिया एअरोस्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता ; महागाई भत्ता ३ टक्के वाढण्याची चिन्ह :
  • दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारकडून आज आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण, प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कॅबिनेटच्या आज होणाऱ्या बैठकीत महागाई भत्ता(डीआर) ३ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर या निर्णयाबाबतची घोषणा केली जाऊ शकते.

  • जर डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली तर, तो सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या ३१ टक्के डीए रुपात मिळेल. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

  • या वर्षी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या स्थगित करण्यात आलेल्या डीए आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीआर मध्ये वाढ केली होती आणि या वर्षी १ जुलैपासून पुन्हा महागाई भत्ता लागू करण्याची घोषणा केली होती.

  • केंद्रीय कर्मचारी आणि निवृतीधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये ११ टक्के इतकी भरघोस वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै महिन्यात घेतला होता. त्यानुसार महागाईभत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला असून, ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू होईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा - रोमहर्षक विजयासह सिंधू उपांत्यपूर्व फेरीत :
  • भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅर्डंमटनपटू पी. व्ही. सिंधूने गुरुवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवत डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

  • महिला एकेरीत सिंधूने ६७ मिनिटांच्या झुंजीनंतर बुसाननवर २१-१६, १२-२१, २१-१५ असा विजय मिळवला. ऑगस्ट महिन्यात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूची विश्रांतीनंतरची ही पहिलीच स्पर्धा आहे.

  • पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतचा क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या केंटो मोमोटापुढे निभाव लागला नाही. पहिल्या गेममध्ये मोमोटाला झुंजवणाऱ्या श्रीकांतने २१-२३, ९-२१ असा पराभव पत्करला.

  • मिश्र दुहेरीत टँग शून मॅन आणि से यिंग सुएट जोडीने धु्रव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचे आव्हान २१-१७, १९-२१, २१-११ असे मोडीत काढले.

२२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.