चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ ऑक्टोबर २०२०

Date : 22 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चॅम्पियन्स लीग फुटबॉल - बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेडचे विजय :
  • लिओनेस मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केल्यानंतर बार्सिलोनाने जोरदार ‘गोलधडाका’ सुरू केला. त्यामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने बुधवारी हंगेरीच्या फेरेन्कवारोस संघाचा ५-१ असा धुव्वा उडवला. मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस या संघांनी आपापले सामने जिंकले.

  • मेसीने २७व्या मिनिटाला पेनल्टीवर बार्सिलोनाचे खाते खोलले, त्यानंतर अन्सू फाटी, फिलिपे कुटिन्हो, प्रेडी आणि औसमाने डेम्बेले यांनी गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. मेसीने चॅम्पियन्स लीगमधील ११६व्या गोलची नोंद केली. सलग १६ मोसमांत किमान एक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.

  • मार्कस रॅशफोर्ड मँचेस्टर युनायटेडसाठी तारणहार ठरला. त्याने ८७व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे युनायटेडने गतउपविजेत्या पॅरिस सेंट जर्मेनचे आव्हान २-१ असे परतवून लावले. करोनाची लागण झाल्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या फुटबॉलपासून दूर असला तरी युव्हेंटसला त्याची उणीव जाणवली नाही.

  • अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून कर्जावर आलेल्या अल्वारो मोराटाने ४६व्या आणि ८४व्या मिनिटाला गोल करत युव्हेंटसला डायनामो कियिव्हवर २-० असा विजय मिळवून दिला. चेल्सी आणि सेव्हिला यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. रेन्नेस आणि क्रासनोडर यांच्यातही १-१ अशी बरोबरी झाली.

चिनी रणगाडे ‘नाग’च्या रेंजमधून नाही सुटणार, क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी :
  • ‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते.

  • भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल. पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती असताना, नाग क्षेपणास्त्राने चाचणीचा अंतिम टप्पा पार करणे, खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण तिथे दोन्ही देशांचे रणगाडे परस्परांच्या रेंजमध्ये आहेत.

  • हेलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी मिसाइलची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. १९ ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो.

  • भविष्यात लढाऊ हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येईल. पण तीन दिवसापूर्वीची चाचणी जमिनीवरुन करण्यात आली व ती यशस्वी सुद्धा ठरली. नाग क्षेपणास्त्राची आजची दहावी चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे लष्करात या क्षेपणास्त्राचा समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस :
  • सुमारे ३० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटींचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. बोनसची रक्कम दसऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

  • बोनसची रक्कम एकाच हप्त्यात दिली जाणार असून, सणासुदीच्या काळात नोकरदारांच्या हातात पैसे आल्याने त्यांना वस्तू खरेदीसाठी खर्चही करता येईल. त्यामुळे बाजारातील मागणी वाढून आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.

  • करोनामुळे महसुलावर परिणाम झाला असून , आरोग्य सुविधांपोटी केंद्राला अतिरिक्त आर्थिक बोजाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, करोनामुळे आर्थिक व्यवहारांना चालना देण्याची गरज लक्षात घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोनसचा निर्णय घेण्यात आला.

  • रेल्वे, टपाल खाते, संरक्षण, कर्मचारी निवृत्तीवेतन संघटना (ईपीएफओ) आदी व्यावसायिक विभागांमधील १६.९७ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. त्यासाठी २,७९१ कोटी रुपये खर्च होतील. तसेच बिगरराजपत्रित १३.७० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ होणार असून, त्यासाठी सरकारी तिजोरीवर ९४६ कोटींचा बोजा पडेल. एकूण ३०.६७ लाख कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे.

नासाच्या अवकाशयानाचे ‘बेन्नू’ लघुग्रहावर यशस्वी अवतरण :
  • नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत. हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले आहे.

  • दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले. तेथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने २०२३ पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून ३२१ दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.

  • अब्जावधी वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली होती. त्यावेळी विखुरलेल्या घटकातून पृथ्वीवर जीवसृष्टीची बिजे रोवली गेली असावी असे नासाचे म्हणणे आहे. मंगळवारी यानाच्या यांत्रिक बाहूने ‘टच अँड गो’ म्हणजे ‘टॅग’ उपक्रमात या लघुग्रहावरील खडक, माती गोळा केली असून आता हे यान मार्च २०२१ मध्ये पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे. कदाचित जानेवारीत लघुग्रहावर यान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न केला जाऊ शकतो.

आधी नापास अन् रिचेकिंगनंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल :
  • राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच जाहीर झाला. दरम्यान, या निकालात झालेली एक मोठी चूक समोर आली आहे. ही परीक्षा दिलेल्या मृदुल रावत या विद्यार्थ्यास एनटीएकडून देण्यात आलेल्या मार्कशीटमध्ये तो नापास झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र तो  एसटी कॅटेगरीत देशात पहिला आलेला होता. ही चूक पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर उघड झाली.

  • नीट परीक्षेत नापास झाल्याचं दाखवण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्याने निकालावर आक्षेप घेत, ओएमआर शीट आणि उत्तरपत्रिका (Answer Key)च्या आधारावर निकालाला आव्हान दिलं. त्यानुसार पुन्हा तपासणी करण्यात आल्यावर तो एसटी कॅटेगरीत देशात अव्वल असल्याचं समोर आलं.

  • मृदुलने म्हटले की, एनटीएच्या निकालातील माझ्या गुणांनुसार मी नीट २०२० परीक्षेत नापास झालो होतो. या गुणांसह कोणतंही वैद्यकीय महाविद्यालय मिळणार नव्हतं. यामुळे मला अक्षरश: रडू येत होतं व मी नैराश्यात गेलो होतो. कारण मला खात्री होती की मी नीट परीक्षा ६५० गुणांसह उत्तीर्ण होणारच. परंतू हा निकाल पाहिल्यानंतर मला मोठा धक्काच बसला. यानंतर मी एटीएच्या निकालाला आव्हान दिलं व पुन्हा तपासणी झाल्यावर माझा खरा निकाल समोर आला. एनटीएने चूक मान्य केल्याने मी आनंदी आहे. मी ६५० गुणांसह एसटी कॅटेगरीत देशात अव्वल आहे. तर, सर्वसाधरण श्रेणीत माझा देशात ३५७७ वा क्रमांक आहे.

२२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.