ममता बॅनर्जींची मोठी घोषणा! आता सौरव गांगुली बंगालचा नवा ब्रँड ॲम्बेसेडर
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. गांगुलीला राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्त करण्यात आले आहे. ते यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे अध्यक्ष होते. बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सौरव गांगुली खूप लोकप्रिय व्यक्ती आहे आणि तो तरुण पिढीसाठी खूप चांगले काम करू शकतो. मला त्यांचा बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून समावेश करायचा आहे.”
जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेला मंगळवारी राज्यात सुरुवात झाली. रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, सौरव गंगोपाध्याय ते देशातील आघाडीचे उद्योगपती या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी मोठ्या गुंतवणुकीबद्दल सांगितले. आज ममता बॅनर्जींनी मंचावरून मोठी घोषणा केली.
खरेतर, सौरव गांगुली देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या १२ दिवसांच्या स्पेन आणि दुबई दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग होता. मंगळवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करण्यासाठी महाराज मंचावर उभे राहिले. सौरव म्हणाला की, ‘दीदी मला प्रत्येक चांगल्या प्रसंगी बोलवतात. त्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कधीकधी मला समजत नाही की त्या मला का बोलवतात? पण या सन्मानाने मी भारावून गेलो आहे.’
जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेत सौरव गांगुली वेगळ्याच शैलीत दिसला. मंचावर सौरवला उद्योगपती म्हणून नवीन पदवी मिळाली. बंगालच्या भूमीवर गुंतवणुकीचे महाराजांचे वचन यापूर्वीही ऐकले होते. अशा परिस्थितीत सौरवने सातव्या जागतिक बंगाल बिझनेस कॉन्फरन्सच्या मंचावर ममता बॅनर्जींचे कौतुकही केले. बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे स्टील प्लांट उभारणार असल्याची घोषणा महाराजांनी ममता बॅनर्जी यांच्या स्पेन भेटीच्या व्यासपीठावरून केली होती.
आयसीसीने घेतला मोठा निर्णय! आता गोलंदाजांसाठीही टाईम आऊट; टी-२० मध्ये स्टॉप क्लॉकचा नवा नियम
आयसीसीने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेटचे नियम बदलले आहेत. खेळाचा वेग वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने गोलंदाजांसाठीही टाईम आऊटसारखे नियम केले आहेत. क्रिकेटची प्रशासकीय संस्था आयसीसीने मंगळवारी सांगितले की, जर गोलंदाजाने डावात तिसऱ्यांदा नवीन षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वन डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये लागू असेल.
सुरुवातीला हा नियम चाचणीसाठी लागू करण्यात येणार असून त्याची उपयुक्तता आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले, “सीईसी ने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर स्टॉप क्लॉक लागू करण्यास सहमती दर्शवली. षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. मागील षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंदांच्या आत गोलंदाजी करणारा संघ पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि हे जर डावात तिसऱ्यांदा घडले तर पाच धावांचा दंड आकारला जाईल,” असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर बंधने घालण्याची पद्धतही आयसीसीने बदलली आहे. आयसीसीने पुढे सांगितले की, “खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंगच्या नियमांमध्येही बदलांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये खेळपट्ट्यांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाते हे निकष सोपे करण्यात आले आहेत. पूर्वीचा नियम होता की, जर पाच वर्षाच्या आत त्या मैदानातील खेळपट्टीला पाच डिमेरिट पॉइंट दिले तर त्यावर बंदी घातली जात होती. आता त्याची मर्यादा सहा डिमेरिट पॉईंट्स करण्यात आली आहे. आता कोणत्याही मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षात सहा डिमेरिट पॉईंट दिले तर त्यावर बंदी घालण्यात आली आहे.”
टाईम आउट नियम काय आहे?
आयसीसी नियम ४०.१.१ नुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील दोन मिनिटांत पुढील फलंदाजाने चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जर ते तसे झाले नाही तर ते कालबाह्यतेच्या कक्षेत येते. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC)च्या नियमांनुसार टाईम आउटची वेळ मर्यादा जरी तीन मिनिटे असली तरी, वर्ल्ड कपमधील आयसीसी नियमांनुसार ती दोन मिनिटे आहे. कालबाह्य झालेली विकेट कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात जात नाही किंवा त्यासाठी अतिरिक्त चेंडू जोडला जात नाही.
भारतात झालेल्या विश्वचषकाने रचला इतिहास!आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली स्पर्धा, २०१५चा मोडला विक्रम
भारताने आयोजित केलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ने अनेक विक्रम केले. या विश्वचषकात भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम केले, मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेदरम्यान १२,५०,३०७ लोकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहिले. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पहिल्यांदाच १२ लाखांहून अधिक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले, त्यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत एक नवा विक्रम निर्माण झाला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय आयसीसी स्पर्धा ठरली आहे.
सोशल मीडियावर पाहणाऱ्यांची संख्या देताना आयसीसीने असेही म्हटले आहे की, “आजपर्यंतच्या दर्शकांची ही सर्वात मोठी संख्या आहे. याबरोबरच आयसीसीने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळले गेले आणि ४२व्या सामन्यातच मैदानावर पोहोचलेल्या आणि सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होता, जो २०१९च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात विश्वविक्रम झाला. आयसीसी विश्वचषकातील हा सर्वात जास्त पाहिला गेलेला पहिला सामना होता.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या या विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला खेळला गेलेला सामना विश्वचषकातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला. यापूर्वी, एकदिवसीय विश्वचषक २०१५ ही आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा १०,१६,४२० लोकांनी स्टेडियममध्ये जाऊन पाहिली. त्याचवेळी २०१९चा विश्वचषक पाहण्यासाठी ७,५२,००० लोक स्टेडियममध्ये पोहोचले होते.
एकदिवसीय विश्वचषकाच्या १३व्या आवृत्तीत टीव्ही आणि डिजिटल दर्शकांचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. यावरून क्रिकेटची जागतिक लोकप्रियता दिसून येते. या विश्वचषकाबाबत, आयसीसी ‘हेड ऑफ इव्हेंट’ ख्रिस टेटली म्हणाले, “आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ ही एक प्रचंड यशस्वी ठरलेली स्पर्धा आहे, ज्याने खेळाचे सर्वोत्कृष्ट पैलू प्रदर्शित केले आहेत आणि जगभरातील लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेने सर्वांचेच मनोरंजन केले आहे. सामना पाहण्यासाठी झालेली गर्दी ही अविश्वसनीय अशा स्वरुपाची होती. एवढी प्रेक्षक संख्या पाहून आम्ही देखील आश्चर्यचकित झालो आहोत.
“शेवटचे चार दिवस”; महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेतून पाटी लावावी, अशी मागणी करत आहे. राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, यासाठी मनसेनं अनेकदा आंदोलनही केलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, असे निर्देश दिले आहेत. यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, याबाबतची मनसेनं आठवण करून दिली आहे.
मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सोमवारी ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं, “आधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता ५ दिवस उरले आहे. दोन भाषेत पाटी करण्याची दुकान मालकांची इच्छा असेलच तर देवनागरी लिपीतली मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठीमधील नाव हे बाकी भाषेतील नावापेक्षा मुळीच छोटं नसलं पाहिजे.” महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ असा कायद्याचा संदर्भही शिदोरे यांनी दिला.
अनिल शिदोरे यांची पोस्ट रिपोस्ट करत मनसेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर म्हटलं की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात… शेवटचे ४ दिवस.”
“भारत लवकरच विश्वगुरूपदी आरुढ होईल,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; म्हणाले…
भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सर्व जगातल्या लोकांना कसे जगावे, हे शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे. लोकहितातून देशहीत साधायचे आहे. अशाने भारत देश विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच आपणास पाहायला मिळेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते. ते पुढे म्हणाले, १८५७ पासून भारताच्या उत्थानास प्रारंभ झाला. नियती भारताला विश्वगुरूपदी आरूढ करणारच आहे. आमच्या पूर्वजांनी धर्माला अनुसरून कर्म दिले आहेत. संघात शाखा सर्व काही आहे पण कुठेही अतिवादिता नको. मनुष्याला आपल्या सेवेची योग्यता टिकवावी लागते.
ज्यांना कसलाच मोह राहिला नाही, ते म्हणजे मोहन भागवत, असे मत बंगळुरू येथील श्रुंगेरी महासंस्थानचे मठाधिपती विद्याविश्वेश्वर भारती शंकराचार्य महास्वामी महाराजांनी व्यक्त केले. सूर्य मावळताना आपले तेज शमी वृक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे प.पू. पंडितकाका धनागरे महाराजांनी त्यांचे तेज प.पू. विजयकाका पोफळी महाराज यांच्यात प्रतिष्ठापित केले, असेही महास्वामी म्हणाले. करवीर संकेश्वर पीठाचे दगदगुरू शंकराचार्य सच्चितानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी महाराज यांनी ५० चातुर्मास्य याग केले आहेत, अशी माहितीसुद्धा श्रुंगेरीच्या शंकराचार्यांनी यावेळी दिली.
नागपूर : वैदर्भीय जितेशची भारतीय संघात निवड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० खेळणार…
विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार असून त्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
अमरावती शहरात जन्मलेल्या जितेशने २०१३-१४ साली विजय हजारे चषकात विदर्भाच्यावतीने ‘अ’ दर्जाच्या सामन्यात पदार्पण केले. २०१५-१६ साली रणजी ट्रॉफीमध्ये जितेशचे पदार्पण झाले. २०१६ मधील आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सकडून जितेश खेळला होता.त्यानंतर जितेशने पंजाब किंग्स संघातर्फे आयपीएलमध्ये फलंदाजीत चमक दाखवली.
जितेशने आजवर शंभर टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये दोन हजारांच्यावर धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतही भारतीय संघात समाविष्ट जितेश उत्तम खेळाचे प्रदर्शन करणार अशी अपेक्षा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.
नोव्हाक जोकोव्हिचला जेतेपद :
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तिसऱ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला पराभूत करत सहाव्यांदा ‘एटीपी’ दौऱ्यातील अखेरची स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने रूडवर ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत २०१५ नंतर पहिल्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आणि फेडररच्या सहा जेतेपदांची बरोबरी साधली.
जोकोव्हिचने गेल्या दोन हंगामांतही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्याला पराभूत व्हावे लागले. ‘‘सात वर्षांचा कालावधी खूप मोठा असतो.
या जेतेपदासाठी मी सात वर्षे प्रतीक्षा केली. त्यामुळे हे जेतेपद महत्त्वाचे आहे,’’ असे जोकोव्हिच म्हणाला. जोकोव्हिचने टेल अव्हिव्ह आणि अस्ताना येथे झालेल्या स्पर्धाचे जेतेपद पटकावले, तर पॅरिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. याशिवाय त्याने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले.
विमान प्रवासाच्या नियमावलीत मोठा बदल, आता भरावा लागणार नाही ‘हा’ फॉर्म :
मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तुरळक ठिकाणी करोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या नियमांत मोठा बदल केला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांना करोना लसीसंदर्भातील स्वयंघोषणा अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. करोना संसर्गात सातत्याने होत असलेली घट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.
नेमका निर्णय काय - नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना यापुढे एअर सुविधा पोर्टलवरील करोना लसीसंदर्भातील अर्ज भरणे बंधनकारक नाही. लसीसंदर्भातील स्वयंघोषणा अर्ज तूर्तास बंद करण्यात येत आहे. मात्र आगामी काळात करोना संसर्गाची स्थिती पाहता हा अर्ज भरणे बंधनकारक केले जाऊ शकते. मागील काही दिवसांपासून करोना संसर्गात सातत्याने घट होत आहे. तसेच भारत आणि जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरणात लक्षणीय वाढ झाली. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमांत हा बदल करण्यात आला आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
याआधी हवाई प्रवासाच्या माध्यमातून भारतात यायचे असेल तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर करोना प्रतिबंधक लसीसंदर्भातील फॉर्म भरणे बंधनकारक होते. यामध्ये प्रवाशांना त्यांनी लस घेतलेली आहे की नाही, लसीचे किती डोस घेतलेले आहेत, अशी माहिती भरावी लागत होती. मागील आठवड्यात हवाई वाहतूक मंत्रालयाने हवाई प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारनक नसल्याचे जाहीर केले होते. मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन हवाई मंत्रालयाने केले होते. याआधी हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक होते.
नासाचे ओरियन यान चंद्रालगत :
नासाचे ओरियन यान (कॅप्सुल) सोमवारी चंद्रापासून १३५ किलोमीटरवर पोहोचले. या यानात अंतराळविरांऐवजी चाचणीसाठी तीन मानवी प्रतिकृती ठेवल्या आहेत. हे यान चंद्राच्या पृथ्वीवरून दिसू न शकणाऱ्या विरुद्ध बाजूला पाठविण्यात आले आहे.
नासाने ५० वर्षांपूर्वी अपोलो मोहीम राबविली होती. त्यानंतर प्रथमच हे यान चंद्रावर पोहोचले आहे. बुधवारी सुरू केलेल्या चाचणी मोहिमेचे हे मोठे यश आहे. या मोहिमेवर ४१० कोटी डॉलर खर्च केले जात आहेत.
चंद्रानजीक यान पोहोचल्यावर सुमारे अर्धा तास त्याचा ह्युस्टनमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. या यानाने पृथ्वीचे एक छायाचित्रही पाठविले आहे.
न्यूझीलंडमध्ये मतदानासाठी किमान वय १६ वर्षे :
मतदान करण्याची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय न्यूझीलंड सरकार लवकरच घेणार आहे. आतापर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला न्यूझीलंडमध्ये मतदान करण्याचा अधिकार होता, मात्र आता १६ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा हक्क मिळणार असल्याचे संकेत पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी दिले. वय कमी करायचे की नाही याबाबत न्यूझीलंड प्रतिनिधीगृहाचे सदस्य मतदान करतील, असे ऑर्डन यांनी सांगितले.
न्यूझीलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच १६ आणि १७ वर्षांच्या नागरिकांना मतदान करण्यास परवानगी देऊ नये, असे म्हटले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी याबाबत मत व्यक्त केले. मतदानाचे वय कमी करण्यास वैयक्तिकरीत्या अनुकूल असून अशा बदलांसाठी कायदेमंडळाच्या ७५ टक्के सदस्यांची सहमती आवश्यक आहे.
मात्र आमच्याकडे तेवढी संख्या नसल्याचेही पंतप्रधान ऑर्डन यांनी सांगितले. मतदानाचे वय कमी करण्याबाबत अनेक देशांमध्ये वादविवाद आहेत. १६ वर्षांच्या नागरिकांना मतदान करण्यास परवानगी देणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रिया, माल्टा, ब्राझील, क्युबा, इक्वेडोर यांचा समावेश आहे.
‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचं निधन :
‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचं शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असेही निवेदनात म्हटले आहे.
अरिज खंबाटा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. तसेच ते WAPIZ (वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्ती) चे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे अध्यक्षही राहिले होते.
उच्च किंमतीत विकल्या जाणाऱ्या शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी १९७०च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती. अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.
‘आयओए’ निवडणुकीत प्रथमच खेळाडूंना मतदानाचा अधिकार :
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आगामी निवडणुकीत प्रथमच खेळाडूंना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हा यांनी सोमवारी ‘आयओए’मध्ये मतदान करू शकणाऱ्या मतदारांची अंतिम यादी निश्चित केली. यामध्ये ७७ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. निवडणुकीत प्रथमच खेळाडू मतदान करणार असून, हेच या निवडणुकीचे वैशिष्टय़ असेल. निश्चित करण्यात आलेल्या ७७ मतदारांमध्ये ३९ महिला आणि ३८ पुरुषांचा समावेश आहे. खेळाडूंमध्ये पी. व्ही. सिंधू, गगन नारंग, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, एम. एम. सोमय्या या ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा समावेश आहे.
लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या आठ खेळाडूंमध्ये योगेश्वर आणि सोमय्याची निवड नव्या खेळाडू समितीने (अॅथलीट कमिशन) केली आहे. साक्षीचे नाव भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या वतीने देण्यात आले. सिंधू आणि नारंग यांनाही खेळाडू समितीने संधी दिली आहे. निश्चित करण्यात आलेल्या मतदार यादीतील ७७ पैकी ६६ मतदार हे ३३ राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी असतील.
प्रत्येक राष्ट्रीय महासंघाकडून एका पुरुष आणि महिलेला प्राधान्य देण्यात आले आहे. लक्षवेधी कामगिरी करणारे आठ खेळाडू (चार पुरुष, चार महिला) हे खेळाडू समितीमधील दोन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या नीता अंबानी असे एकूण ७७ मतदार या वेळी मतदान करतील. ज्या खेळांचा ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समावेश आहे अशाच क्रीडा महासंघांना मतदानाचा अधिकार नव्या घटनेनुसार मिळणार आहे.
मतदानाचा अधिकार मिळालेले खेळाडू
लक्षवेधी कामगिरी करणारे : योगेश्वर दत्त, एम. एम. सोमय्या, पी. टी. उषा, सुमा शिरुर, रोहित राजपाल, अपर्णा पोपट, अखिल कुमार, डोला बॅनर्जी
खेळाडू समिती : गगन नारंग, पी. व्ही. सिंधू
संघटनेचे प्रतिनिधित्व : शिवा केशवन, जान्हवी रावत (ल्युज महासंघ), कल्याण चौबे, थाँगम देवी (फुटबॉल), राहुल बोस (रग्बी), आदिल सुमारीवाला (अॅथलेटिक्स)