चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ नोव्हेंबर २०२१

Date : 22 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती :
  • महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

  • दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केलं जात असल्याचं दिसत आहे. कारण, कालच बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आलं. त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय सस्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.

प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद :
  • दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येथील शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; तर ऑनलाइन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाने रविवारी जाहीर केले.

  • हवेचा दर्जा रविवारी सकाळी ‘अतिशय वाईट’ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स- एक्यूआय) ३८२ इतका होता. शनिवारी २४ तासांतील सरासरी एक्यूआय ३७३ इतका होता.

  • ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागांच्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याने दिले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी व खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील’, असे शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिता शर्मा यांनी सांगितले.

  • तथापि, ऑनलाइन अध्यापन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला केली होती. करोना महासाथीमुळे सुमारे १९ महिने बंद राहिल्यानंतर येथील शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या.

युगांडा पॅरा-बॅडिमटन स्पर्धा - सुकांतला सुवर्ण :
  • पीटीआय, कॅम्पाला भारताच्या सुकांत कदमने युगांडा आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडिमटन स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक पटकावले, तर प्रमोद भगतने तीन रौप्य पदकांची कमाई केली.

  • पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या कदमने भारताच्या नीलेश गायकवाडचा ३८ मिनिटांत २१-१६, १७-२१, २१-१० असा पराभव केला. क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या भगतला मात्र अंतिम सामन्यांत झगडावे लागले.

  • पुरुष एकेरीत भगतला सहकारी मनोज सरकारकडून १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मग पुरुष दुहेरीत भगत आणि सरकार जोडीने मोहम्मद अन्सारी आणि दीप बिसोयी जोडीकडून २१-१०, २०-२२, १५-२१ अशी हार पत्करली. त्यानंतर मिश्र दुहेरीत भगत आणि पलक जोशी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऋतिक रघुपती आणि मानसी जोशी जोडीने त्यांना २१-१९, २१-१६ असे नामोहरम केले.

तालिबानचे आता नविन फर्मान; महिला अभिनेत्रींसोबतच्या टीव्ही मालिका बंद करण्याच्या सूचना :
  • अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन ‘इस्लामिक मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. त्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये किंवा डेली सोपमध्ये अभिनय करता येणार नाही. तसेच अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या निर्देशात महिला टीव्ही पत्रकार त्यांचे वृत्तांकन करताना हिजाब परिधान करतील, असे म्हटले आहे. त्यामुळे आता तालिबानने नवे महिलांसाठी पुन्हा नविन नियम लागू केले आहेत.

  • हा आदेश अफगाणिस्तान मंत्रालयाने सद्गुणांच्या प्रचारासाठी आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी जारी केला आहे, असे तालिबानचे म्हणणे आहे. मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना प्रेषित मुहम्मद किंवा इतर आदरणीय व्यक्ती दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम दाखवण्यासही मनाई केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे रविवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.

  • तालिबान सातत्याने दावा करत आहे की आपल्या नवीन राजवटीत महिलांनाही स्थान मिळेल, पण असे असूनही, महिलांवर अनेक निर्बंध जाहीर केले गेले आहेत. याशिवाय वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक अफगाण महिला पत्रकारांवर हल्ले आणि शोषण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

UAE च्या राजकन्येनं ‘दहशतवादी’ म्हणत टीका केल्यानंतर पत्रकार सुधीर चौधरींना वक्त्यांच्या यादीतून वगळलं :
  • संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आलं आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला. सुधीर चौधरी हे वादग्रस्त व्यक्तीमत्व असून ते असहिष्णु दहशतवादी आहेत, अशा शब्दांमध्ये राजकुमारीने टीका केलेली.

  • राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, “सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आलं आहे.”

  • राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिलं असून ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिलं आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आलाय. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

२२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.