चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मे २०२१

Updated On : May 22, 2021 | Category : Current Affairs


उच्च न्यायालयांनी व्यवहार्य आदेश द्यावेत :
 • उत्तर प्रदेशातील कोविड-१९ स्थिती व्यवस्थापनाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ज्या आदेशांची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असे आदेश देणे उच्च न्यायालयांनी टाळावे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

 • उत्तर प्रदेशातील गावे आणि छोटी शहरे येथील संपूर्ण आरोग्य यंत्रणा रामभरोसे असल्याचेही अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाने १७ मे रोजी दिलेला आदेश हा आदेश म्हणून पाळण्यात येऊ नये. तो उत्तर प्रदेश सरकारला दिलेला सल्ला आहे, या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे, असे न्या. विनीत सरण आणि न्या. बी. आर. गवई यांच्या पीठाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली असली तरी या न्यायालयापुढील ही सुनावणी आम्ही स्थगित केलेली नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

 • करोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिले होते. त्यातील एका आदेशानुसार, राज्यातील प्रत्येक गावामध्ये किमान दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात. यातील प्रत्येक रुग्णवाहिकेत अतिदक्षता विभागातील सुविधा उपलब्ध असाव्यात, असे म्हटले होते. यावर राज्य सरकारने सांगितले की, राज्यात ९७ हजार गावे असून त्या सर्व ठिकाणी एका महिन्यात याप्रकारे रुग्णवाहिका पुरविणे हे प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शक्य नाही.

 • राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत करण्याचे काम चार महिन्यांत पूर्ण करावे, असेही उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले होते. त्यावर, इतक्या अल्पकाळात असे करणे शक्य होणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार - उद्धव ठाकरे :
 • दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

 • दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं असून दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. ते सिंधुदूर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 • “परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अन्वी भुतानी विजयी :
 • मानव विद्या शाखेची मूळ भारतीय वंशाची विद्यार्थिनी अन्वी भुतानी ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय पोटनिवडणुकीत विजयी झाली आहे. भुतानी ही वांशिक जागरूकता व समानता मोहिमेची सहअध्यक्ष असून ऑक्सफर्ड इंडिया सोसायटीची अध्यक्ष आहे.

 • २०२१-२०२२ या वर्षासाठी ती अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात होती. तिला गुरुवारी रात्री विजयी घोषित करण्यात आले.

 • या निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले असून २५०६ जणांनी मतदान केले २०१९ च्या तुलनेत ही वाढ १४६ टक्के आहे. आताच्या निवडणुकीत एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. याआधी झालेल्या निवडणुकीत रश्मी सावंत ही भारतीय विद्यार्थिनी फेब्रुवारीत निवडून आली होती पण समाजमाध्यमावरील पोस्टमुळे तिने राजीनामा दिला होता.

शेतकरी संघटनांचे मोदींना चर्चेसाठी पत्र :
 • करोनाच्या दुसऱ्या लाटेतही दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून वादग्रस्त शेती कायदे रद्द करण्यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी केली.

 • २६ मे रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने तर, मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस देशभर ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले असून शांततेच्या मार्गाने यापुढेही आंदोलन सुरू राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले.

 • मागण्यासंदर्भात शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चेच्या ११ फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर दोन्ही बाजूकडून चर्चेचा कोणताही नवा प्रस्ताव दिला गेला नव्हता. मात्र, शुकवारी शेतकरी संघटनांकडून चर्चा सुरू करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली. 

 • आंदोलनामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती हरियाणा सरकारने व्यक्त केली होती. मात्र, आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे.

करोना नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा ५० अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव :
 • करोनामुळे संपूर्ण जगाचं अर्थचक्र थांबलं आहे. एका देशात करोनाची लाट ओसरल्यावर दुसऱ्या देशात करोनाची लाट येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन अशा सर्व बाबींवर परिणाम झाला आहे. यामुळे प्रत्येक देश चिंतेत आहे. हा करोनारुपी राक्षस कधी नष्ट करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. मात्र अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे हे शक्य होत नाही. आतापर्यंत जगात ३.५ दशलक्ष लोकांचा करोनामुळे जीव गेला आहे.

 • २०२२ मध्ये ही स्थिती आणखी चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मागणी जोर धरत आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं याबाबत काही सूचना केल्या आहेत. वर्षाअखेरीस जगातील जवळपास ४० टक्के लोकांचं लसीकरण आणि २०२२ या वर्षाच्या सुरुवातीला ६० टक्के लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला आहे.

 • आतापर्यंत अनेक देशात लोकसंख्येच्या केवळ १ टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे लसीकरणावर आर्थिक असमानतेचा मोठा प्रभाव दिसत आहे. जिथपर्यंत लसीकरण मोहीम वेगाने वाढत नाही तोपर्यंत करोनारुपी राक्षस नष्ट होणं कठीण आहे.

 • त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणे निधीनंं ५० अब्ज डॉलर्सची योजना आखत करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. यापैकी ३५ अब्ज डॉलर्स श्रीमंत देश आणि खासगी देणगीदारांकडून जमा केले जातील. तर उर्वरित १५ अब्ज डॉलर्स रक्कम विविध देशातील सरकारडून जमा करण्याचा प्रस्ताव आहे.

विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत :
 • दुसरी विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार आहे. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर ढकलण्यात आल्याचे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी सांगितले.

 • मुंबईत २०१९मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यामध्ये भारताव्यतिरिक्त १५ देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्या विश्वचषकाच्या समारोपाच्या वेळेस पुढील विश्वचषक २०२१मध्ये न्यूयॉर्क येथे होईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु जगभरात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरराष्ट्रीय प्रवासावरही र्निबध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाऐवजी हा विश्वचषक पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येईल.

 • अमेरिका मल्लखांब महासंघाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान स्पर्धेच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय विश्वचषकाच्या दृष्टीने आवश्यक त्या टप्प्यांची माहिती या बैठकीदरम्यान सादर करण्यात आली. यामध्ये मल्लखांब ज्योत, खेळाडूंचे शिबीर आणि पथप्रदर्शन (रोड शो) यांचा समावेश असेल.

२२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)