चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मे २०२०

Date : 22 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कर्जदारांना दिलासा, हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली :
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला.सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.

  • आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

  • करोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील आर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.

झुकती है दुनिया ! १२०० कि.मी. सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीला सायकलिंग फेडरेशन देणार अनोखी संधी :
  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशातील कामगार व मजूरांना बसला. रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुरांची अवस्था या काळात अत्यंत वाईट झाली होती.

  • अखेरीस केंद्र सरकारने या मजूरांना आपल्या घरी जाण्याची परवानगी दिली, रेल्वे विभागाने या मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्यांचीही सोय केली. मात्र रोजगार तुटलेल्या काही मजुरांसाठी संघर्ष संपलेला नाही. मिळेल त्या वाहनाचा आधार घेत हे कामगार आपल्या गावाकडे निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये १५ वर्षीय ज्योती कुमारीच्या संघर्षाची कहाणी आली होती.

  • लॉकडाउन काळात गुरुग्राममध्ये कामासाठी राहत असलेल्या ज्योतीने आपल्या वडिलांसह सायकलने प्रवास करत बिहार गाठायचं ठरवलं. वडिलांना मागच्या सीटवर बसवत १५ वर्षीय ज्योतीने गुरुग्राम ते बिहार हे १२०० किलोमीटरचं अंतर अवघ्या ७ दिवसांत पूर्ण केलं. तिने घेतलेल्या या अपार कष्टाचं फळ आता तिला मिळण्याची शक्यता आहे.

  • ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. “ज्योतीने Trials यशस्वीपणे पूर्ण केली, तर Nation Cycleing Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते.” सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला माहिती दिली.

राष्ट्रीय क्रीडा संघटना मात्र उदासीन :
  • नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सराव शिबिराला कसा प्रारंभ करायचा, यासाठी खेळाडूंनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे (आयओए) प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. मात्र प्रतिक्रिया पाठवण्याची अंतिम मुदत उलटली तरी बहुतेक राष्ट्रीय क्रीडा संघटना मात्र उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • टाळेबंदीदरम्यान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडूनच सरावाला कसा प्रारंभ करता येईल, याविषयी ‘आयओए’ने मते मागवली होती.

  • सध्या ४० राष्ट्रीय क्रीडा संघटनांपैकी ३५ संघटना ‘आयओए’शी संलग्न आहेत. त्यापैकी २० संघटनांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या. पण तिरंदाजी, हॉकी, रोइंग, स्क्वॉश, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि यॉटिंग या सात संघटनांचा अपवाद वगळता कोणत्याही संघटनेने अंतिम मुदतीआधी आपली प्रतिक्रिया पाठवली नाही.

आता आयसीसीमध्ये ‘दादा’गिरी? अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य उमेदवार – ग्रॅमी स्मिथ :
  • प्रशासकीय कारभारातील अनियमीतता आणि लोढा समितीच्या शिफारसींचं पालन करण्यासाठी केलेली दिरंगाई यावरुन सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर कारवाई करत, सर्वात श्रीमंत बोर्डावर क्रिकेट प्रशासकीय समितीची स्थापना केली.

  • यानंतर काही वर्षांनी नवीन संविधानानुसार बीसीसीआयच्या निवडणूका पार पडल्या, ज्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे बीसीसीआयचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं. अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गांगुलीने बीसीसीआयच्या कारभारात काही लक्षणीय बदल केले.

  • सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, सर्व क्रिकेट बोर्डांना आपलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या दौऱ्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ यांनी सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर : 
  • करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं. बांगलादेशच्या संघही या मालिकेत सहभागी होणं श्रीलंकेला अपेक्षित आहे.

  • श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे.

  • दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु असल्याचं फॉल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील भारतीय संघाचा प्रस्तावित टी-२० दौरा हा आयसीसीच्या नियमांनुसार नाहीये.

  • दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात फेब्रुवारी महिन्यात याविषयी चर्चा झाली होती. यानंतर २० मे रोजी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हा दौरा निश्चीत झाल्याचं फॉल यांनी सांगितलं. दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सरावाची संधी कशी उपलब्ध करुन देता येईल याची चाचपणी करत आहेत.

२२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.