चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 जुलै 2023

Date : 10 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रोहित शर्माने धोनी-सेहवागला मागे टाकत ‘या’ विक्रमाची केली नोंद
  • गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आपापले अर्धशतक पूर्ण करून परतले. त्याचवेळी जेव्हा टीम इंडियाने लंचनंतर बॅटिंगला सुरुवात केली, तेव्हा टीमचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एका मोठ्या विक्रमासह मागे टाकले आहे.

रोहितने धोनी-सेहवागला मागे टाकले -

  • भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. यासह रोहितच्या नावावर आता १७२९८ धावा झाल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १७२६६ धावांसह महेंद्रसिंग धोनी आणि १७२५३ धावांसह वीरेंद्र सेहवागला मागे टाकले.

सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन-विराट आघाडीवर -

  • भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिनच्या नावावर ३४३५७ धावा आहेत. जगातील कोणत्याही फलंदाजाने सचिनपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या नाहीत. विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने भारतासाठी २५४०० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत तिसरे नाव राहुल द्रविडचे (२४०६४ धावा) आहे. याशिवाय सौरव गांगुली १८४३३ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने डब्ल्यूटीसी दोन हजार धावांचा टप्पा पार केला -

  • रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात २००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितपूर्वी इतर कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम केला नाही. या सामन्यापूर्वी रोहितने २४ कसोटीत ५२.८३ च्या सरासरीने १९५५ धावा केल्या होत्या. पण उपाहारापूर्वी रोहित ६३ धावांवर नाबाद माघारी परतला होता, यासह त्याने २००० धावांचा टप्पा ओलांडला.
‘रिलायन्स’कडील पाचही विमानतळे सरकार ताब्यात घेणार
  • राज्यातील बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ, धाराशिव ही पाचही विमानतळे ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लि’. कंपनीच्या ताब्यात असून ही कंपनी व्यवस्थित काम करीत नसल्याने महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन हे सर्व विमानतळ सरकार ताब्यात घेईल.
  • तसेच राज्यांतर्गत विमानसेवा अधिक वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नवी मुंबई विमानतळ पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत सुरू होईल. त्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
  • राज्यातील १८ पैकी केवळ सातच विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध असल्याबद्दल अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, रोहित पवार, सुनील प्रभू, प्रणिती शिंदे,आदित्य ठाकरे आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. हे पाच विमानतळ रिलायन्स कंपनीस ३० वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र आता सरकार ते ताब्यात घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
यंदा मराठीमधून वैद्यकीय शिक्षण दूरच, अभ्यासक्रम भाषांतराचे काम संथ गतीने
  • शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्याची घोषणा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्यच तयार नसल्याचे उघडकीस आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणाची मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचा मराठीमधून अभ्यास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • अन्य राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण त्यांच्या भाषेतून मिळत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही मराठीतून वैद्यकीय शिक्षण मिळायला हवे, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठीमधून वैद्यकीय शिक्षण शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठीमधून अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने समितीही स्थापन केली. त्यानुसार मराठीमधून अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपविण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाचे इंग्रजी भाषेतील शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये भाषांतरित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपवण्यात आली. विद्यापीठाने ही जबाबदारी स्वीकारून भाषांतर करण्यासाठी नियुक्त करण्यात येणारे प्राध्यापक, मुद्रित शोधक आदींच्या मानधनासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. संचालनालयाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र सरकारने या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे मराठी भाषांतर करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे.
  • नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यनंतर राज्यामध्ये २० जुलैपासून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप मराठीमधून वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक साहित्यच उपलब्ध नाही.
  • वैद्यकीय शिक्षणासाठी मराठीमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. – डॉ. अजय चंदनवाले, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय.
देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे १,४१३ कोटींची संपत्ती, तर सर्वात गरीब आमदाराकडे फक्त १,७०० रुपये
  • देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे तब्बल १,४०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालमधील एका आमदाराच्या नावावर २,००० रुपयेसुद्धा नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालानुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत आमदारांची यादी पाहिली तर लक्षात येईल की, या यादीतले पहिले तिन्ही आमदार कर्नाटकमधील आहेत.
  • एडीआरच्या अहवालानुसार के. एच पुट्टास्वामी गौडा हे देशातले दुसरे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. गौडा हे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्याकडे १,२६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रिया कृष्णा यांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे १,१५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सपंत्तीबद्दल प्रश्न विचारल्यावर डी. के. शिवकुमार म्हणाले, मी सर्वात श्रीमंत नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सर्वात श्रीमंत नसलो तरी गरीबही नाही. मी स्वतःला श्रीमंत मानत नाही, कारण माझ्याकडे जी संपत्ती आहे, ती कमवायला मला खूप वेळ लागला आहे.
  • देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिल्या १० पैकी चार आमदार काँग्रेसचे आणि तीन भारतीय जनता पार्टीचे आहेत. या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस पक्षांमधील नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद म्हणाले, शिवकुमार यांच्यासारखे लोक व्यावसायिक आहेत आणि त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही भाजपा आमदारांकडे जरा पाहा. प्रामुख्याने खाण घोटाळ्यातील आरोपींकडे पाहा. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद यांच्या वक्तव्यावर भाजपाने पलटवार केला आहे. कर्नाटक भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश कुमार म्हणाले, काँग्रेसला श्रीमंत लोक आवडतात.

सर्वात कमी संपत्ती असणारे आमदार

  • देशातील आमदारांच्या संपत्तीवरून बनवलेल्या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक (सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार) पश्चिम बंगालमधील भाजपा आमदार निर्मल कुमार धारा यांचा आहे. त्यांची एकूण संपत्ती केवळ १,७०० रुपये इतकी आहे. तसेच ओडिशातील अपक्ष आमदार मकरंदा मुदुली यांच्याकडे केवळ १५,००० रुपये इतकीच संपत्ती आहे. पंजाबचे आम आदमी पार्टीचे आमदार नरिंदर पाल सिंह यांच्याकडे केवळ १८,३७० रुपयांची संपती आहे.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र अपात्र; ‘डब्लूएफआय’ची निवडणूक १२ ऑगस्टला
  • विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक १२ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी एम. एम. कुमार यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याला या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
  • भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. महासंघाच्या वतीने हंगामी समितीचीही स्थापना करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने निर्णय लागला. मात्र, त्यानंतर मुदत संपलेल्या कार्यकारिणीने विशेष अधिकार वापरून राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता काढून घेत हंगामी समिती कायम ठेवली होती.
  • ‘डब्लूएफआय’ची निवडणूक जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हंगामी समिती या दोघांच्याही वतीने मतदानासाठी हक्क सांगण्यात आला होता. असाच प्रश्न हरियाणा, तेलंगण, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश राज्यांबाबतही होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्वाचे म्हणणेही ऐकून घेतले होते. परंतु आसाम कुस्ती संघटनेने गुवाहाटी न्यायालयात धाव घेतल्याने याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. निवडणूक प्रक्रियेला नव्याने सुरुवात केल्यावर कुमार यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि हंगामी समिती या दोघांनाही निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.
  • निवडणुकीत सर्व मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमानुसार माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, ते निवडणुकीसाठी पात्र ठरू शकत नाहीत. अशा वेळी त्यांचा मुलगा करण निवडणूक लढवणार का, याकडे आता नजरा असतील. त्याचबरोबर मध्यंतरी क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांपैकी कुणालाच निवडणूक लढवता येणार नाही असे म्हटले होते.

 

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू ; ६४ टक्के मतांसह विजय, आदिवासी समाजातील पहिली व्यक्ती सर्वोच्चपदी :
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६,७६,८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला़  विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडय़ात केवळ ३,८०,१७७ इतके मतमूल्य जमा झाल़े

  • मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीतच मुर्मू यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा जादुई आकडा गाठला़  मुर्मू यांना ६४़ ०३ टक्के, तर सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली़  द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनणार असून, त्या पहिल्या आदिवासी-महिला राष्ट्रपती ठरतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत असून, २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

  • पहिल्या फेरीमध्ये खासदारांची मते मोजण्यात आली. मतदान करणाऱ्या ७४८ (५ लाख २६ हजार ६०० मतमूल्य) खासदारांपैकी ५४० मते (३ लाख ७८ हजार मतमूल्य) मुर्मूना मिळाली तर, २०८ मते (१ लाख ४५ हजार ६०० मतमूल्य) यशवंत सिन्हा यांच्या पारडय़ात पडली. १५ मते अवैध ठरली. त्यामुळे पहिल्याच फेरीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर दिल्लीमध्ये जल्लोष सुरू झाला. लोककलाकारांनी आदिवासी नृत्यावर ताल धरला, त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधानही सामील झाले.

  • संसदभवनात तसेच, राज्या-राज्यांच्या विधानसभेमध्ये १८ जुलै रोजी ९९ टक्के मतदान झाले होते. ७७१ खासदार व ४ हजार २५ आमदार मिळून ४ हजार ७९६ सदस्य मतदानासाठी पात्र होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर राज्या-राज्यांमधील मतपेटय़ा संसद भवनात आणल्या गेल्या होत्या. संसद भवनातील विशेष कक्षामध्ये सकाळी अकरा वाजल्यानंतर सर्व मतपेटय़ा उघडण्यात आल्या व दुपारी एक वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वप्रथम खासदारांची मते मोजण्यात आली. दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा मुर्मू यांना ५३ टक्के मिळाली होती़.

तैपेई खुली बॅडिमटन स्पर्धा - क्रॅस्टोची दुहेरी आगेकूच; कश्यपही विजयी :
  • भारताची प्रतिभावान बॅडिमटनपटू तनीषा क्रॅस्टोने तैपेई खुल्या स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू राखताना महिला आणि मिश्र दुहेरी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारूपल्ली कश्यपलाही आगेकूच करण्यात यश आले.

  • १९ वर्षीय तनीषाने इशान भटनागरच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत चायनिज तैपेईच्या चेंग काय वेन आणि वांग यु क्विओ जोडीवर २१-१४, २१-१७ अशी सरशी साधली. मग महिला दुहेरीत तनीषाने श्रुती मिश्राच्या साथीने तैपेईच्याच जिया यिन लिन आणि लिन यु-हाओ जोडीचा २१-१४, २१-८ असा पराभव केला.

  • दुसरीकडे, अनुभवी कश्यपने पुरुष एकेरीच्या सामन्यात तैपेईच्या चिआ हाओ ली याच्यावर २१-१०, २१-१९ अशी मात केली. मिथुन मंजुनाथन आणि किरण जॉर्ज यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. मिथुनला चौथ्या मानांकित जपानच्या कोडाय नाराओकाने २४-२२, ५-२१, १७-२१ असे, तर किरणला चोउ टिन चेन याने २१-२३, २१-१६, ७-२१ असे पराभूत केले.

गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे धनाढय़ ; बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर :
  • अदानी ग्रुप’चे प्रमुख गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११५.४ अब्ज डॉलर असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि एकेकाळचे जगातील सर्वात धनाढय़ असलेल्या बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे.

  • ‘फोर्ब्स’ने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३४.४ अब्ज डॉलर आहे. बर्नाड अ‍ॅर्नो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस व्हुताँ हे १५५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या तर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझ हे १४९.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले. अंबानी या यादीत १० व्या क्रमांकावर घसरले आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर असून त्यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती ११ अब्ज डॉलरने अधिक आहे.

  •  गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जीशी संबंधित काही स्टॉक्सचाही समावेश आहे. अदानी समूहाने अवघ्या तीन वर्षांत सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एक चतुर्थाश हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे.

सिंगापूर दौऱ्यासाठी केजरीवाल परराष्ट्र मंत्रालयाकडे :
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांना नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सिंगापूर येथील विश्व नगर संमेलनात सहभागी होऊ नये, असा सल्ला दिला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या संदर्भात गुरुवारी सांगितले की, नायब राज्यपालांच्या या पवित्र्यामुळे दिल्ली सरकार परवानगीसाठी आता थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे जाणार आहे. 

  • पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये होणाऱ्या संमेलनात मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊ नये, असा सल्ला सक्सेना यांनी दिला आहे. हे संमेलन हे महापौरांसाठी आहे. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभागी होणे योग्य नाही, असे सक्सेना यांचे मत आहे.

  • सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,  ‘‘नायब राज्यपालांनी हे संमेलन महापौरांसाठी असल्याने त्यामध्ये केजरीवाल यांनी सहभाग घेऊ नये, असा सल्ला दिला असला तरी या अगोदर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री या संमेलनात सहभागी झाले होते. त्यामुळे हे ‘क्षूद्र राजकारण’ आहे. आता परवानगीसाठी आम्ही थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे जाणार असून परवानगी मिळेल, असा विश्वास वाटतो. ’’

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - अन्नू अंतिम फेरीत ;भारताच्या भालाफेकपटूला सलग दुसऱ्यांदा यश :
  • भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

  • अन्नूने पहिल्या प्रयत्नात सदोष फेक केली, तर दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर अंतर गाठले. त्यामुळे तिचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हे होती. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात तिने ५९.६० मीटर अंतर गाठले. जे यंदाच्या हंगामातील तिच्या ६३.८२ मीटर या सर्वोत्तम कामगिरीइतके नसले, तरी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होते.

  • अन्नूला ब-गटाच्या पात्रता फेरीत पाचवा क्रमांक तर दोन्ही गटांमध्ये मिळवून आठवा क्रमांक मिळाला. २९ वर्षीय राष्ट्रीय विक्रमवीर अन्नूला ६० मीटर अंतराचा टप्पा गाठण्यात अपयश आले. आता भारतीय प्रमाणवेळेनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी होणाऱ्या अंतिम फेरीकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • पात्रता फेऱ्यांमधील दोन्ही गटांतून ६२.५० मीटर अंतर गाठणाऱ्या तीन खेळाडूंसह सर्वोत्तम १२ जणींना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले. यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या मॅगी मॅलोनेला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. तिला ब-गटात १२वे आणि एकंदर २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या गतविजेत्या केल्सी-ली-बार्बरने अंतिम फेरीत स्थान पक्के करताना ६१.२७ मीटर ही पाचव्या क्रमांकावरील सर्वोत्तम कामगिरी साकारली.

22 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.