चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ जुलै २०२१

Date : 22 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण, ५०७ रुग्णांचा मृत्यू :
  • देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. रोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज करोनाबाधितांची संख्या करोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे.

  • महाराष्ट्र सरकारने करोना आकडेवारीत दुरुस्ती केल्याने काल देशभरात गेल्या २४ तासांत ३९९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार १५ जणांना करोनाची लागण झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. दरम्यान आज (गुरुवार) ४० हजाराच्यावर करोना रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे करोना रुग्ण आढळले.

  • केंद्रीय आरोग्यमंत्रालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. तर ३८ हजार ६५२ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ५०७ रुग्णांचा करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

भारत आणि चीनच्या सैन्यात पुन्हा चकमक :
  • थंडीतील काही काळाच्या विसाव्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे, असे वृत्तसंस्थांच्या बातम्यात म्हटले आहे. आतापर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यात एक चकमक झाल्याचेही सांगण्यात आले. या वेळच्या चकमकीत काही प्राणहानी झाली की नाही हे समजू शकले नाही.

  • गेल्यावर्षी १५ जूनला गलवान नदीच्या खोऱ्यात झालेल्या चकमकीत वीस भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.

  • चीनने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा घुसखोरी सुरू केली. त्या वेळी काही चिनी ड्रोन विमाने भारतीय हद्दीत आली होती व त्यांनी या भागाची टेहळणी केली असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.

  • मे व जून महिन्यात डेमचोक व चुमार या दक्षिण लडाखमधील भागात गस्त सुरू असताना तेथे नागरी वेशातील चिनी सैन्याचे अस्तित्व आढळून आले. मे महिन्याच्या मध्यावधीत  भारतीय सैन्याने चिथावणी दिली नसतानाही चिनी सैन्याने अनेक ठिकाणी संघर्षाचा पवित्रा घेतला, त्यामुळे तणाव निर्माण होऊन भारतीय सैन्य पुन्हा तैनात करण्यात आले.

मॅक्रॉन यांच्यासह १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत :
  • इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह सध्याच्या १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करीत असते.

  • मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोेबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.

  • एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता. २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे ‘ल माँद’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉन वेब सव्र्हिसेस या कंपनीने एनएसओला यात डिजिटल ओशनच्या माध्यमातून सव्र्हरची मदत केली होती. डिजिटल ओशन या कंपनीने आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल : 
  • राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत आज आणखी तीन विमानं फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली आहेत. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमानं भारतात आली आहेत. या विमानांचा भारतीय वायूसेनेच्या राफेल विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनमध्ये समावेश केला जाणार आहे.

  • भारतीय वायू सेनेने ही तीन विमानं भारतात दाखल झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या विमानांच्या प्रवासा दरम्यान हवाई मार्गात यूएईने त्यांना इंधन उपलब्ध करून दिलं. याबद्दल भारतीय वायू सेनेकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

  • फ्रान्सच्या इस्त्रेस एअर बेसवरून उड्डाण घेऊन न थांबता तीन राफेल विमानं काही वेळापूर्वीच भारतात पोहचली. हवाई मार्गात मदत पुरवल्या बद्दल यूएई वायू सेनेला भारतीय वायू सेना धन्यवाद देते. असं ट्विट वायू सेनेकडून ट्विट करण्यात आलं आहे.

  • राफेल विमानांची ही खेप भारतात पोहचल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमानं झाली आहेत. राफेल जेटची नवीन स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर असेल. पहिली राफेल स्क्वाड्रन अंबाला वायू सेना स्टेशनवर आहे. एका स्क्वाड्रनमध्ये १८ विमानं असतात.

ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद : 
  • २०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

  • बुधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत.

  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.

  • ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करू. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कसे केले जाते हे आम्हाला माहीत आहे.”

२२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.